Wednesday , 15 August 2018
Breaking News
Home » विश्लेषण » अनैसर्गिक ‘सोबत’! 

अनैसर्गिक ‘सोबत’! 

अनैसर्गिक ‘सोबत’

काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी काँग्रेसनेच प्रणव मुखर्जी यांना मिळवून दिली होती, हे आज कोणीही नाकारू शकत नाही. व्यक्तीच्या पाठीशी असणाऱ्या संघटन बळामुळेच सार्वजनिक जीवनात व्यक्ती सर्वोच्च पदावर विराजमान होतो, हे त्यातले अधोरेखित होणारे सत्य! काल नागपूर च्या रेशीम बागेत झालेल्या संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जी यांना समारोपाच्या कार्यक्रमात बोलवताना त्यांच्या पाठीशी पक्षीय संघटनेची ताकद नसतानाही संघाने त्यांना बोलवले आणि काहीसे विजनवासात गेलेले मुखर्जी अचानक राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले. यावर पेड प्रसार माध्यमांनी नेहमीप्रमाणे आक्रस्ताळेपणा चर्चेत कायम ठेवला. खरे तर मुखर्जी हे संघाच्या विचारसरणी विरोधातील व्यक्तीमत्व असल्याचे उर बडवून सांगणाऱ्यांना एक लक्षातच आणून द्यावे लागेल की,  संघाच्या सनातन दबावातूनच काँग्रेसने मुखर्जी यांना राष्ट्रपती पदावर आणण्याची खेळी केल्याचे परिस्थितीजन्य आपणास म्हणता येईल. मुखर्जी यांच्या आधी सलग तीन राष्ट्रपती अनुक्रमे डॉ. के. आर. नारायणन, डॉ. अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील या तीन नॉन ब्राह्मिण व्यक्तींनी देशाचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले. या तिन्ही व्यक्तिमत्वांचे तीन विशेष गुण सांगता येतील! डॉ. के. आर. नारायणन यांनी राष्ट्रपती पदाच्या केवळ रबरी स्टँप असण्याची भूमिका नाकारली. लोकशाही व्यवस्था मजबूत कशी करता येईल, याच भूमिकेतून त्यांनी कार्य केले. प्रसंगी बरखास्त केलेले भाजप च्या राज्य सरकारांनाही त्यांनी पुनरुज्जीवन दिले. त्यांच्या रूपात एका प्रतिभावंत दलित व्यक्तिने राष्ट्रपती पदाचे कार्य कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठ दिला.  तर डॉ. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदावर असताना अणू शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी केलेल्या राष्ट्रीय कार्याचा अभिमान देशवासियांमध्ये निर्माण केला. प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून गौरवान्वित झाल्या. पण त्यांच्या निवडणुकीच्या काळात संघ-भाजपाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मुद्दे पुढे आणले होते. डॉ. नारायणन यांचा राष्ट्रपती पदाचा देदीप्यमान कार्यकाळ विस्मरणात नेण्यासाठी संघ-भाजपाने त्यांना दुसरा कार्यकाळ न मिळू देण्यासाठी डॉ. अब्दुल कलाम यांच्या शास्त्रज्ञ असण्याचा मुद्दा चर्चेत आणला होता. त्यातून राष्ट्रीय सहमती निर्माण होवून ते निवडून आले. तर त्यांच्यानंतर पहिल्या महिला राष्ट्रपती पदाची संधी काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांना देताना संघ-भाजपाने प्रचारात आणलेले मुद्दे देशाच्या अजून विस्मरणात गेले नाहीत. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्या नावावर काँग्रेसवर  आलेला दबाव हा काँग्रेसमधील हार्डकोर संघवाद्यांचाच होता,  हे म्हणण्यास बराच वाव आहे. परंतु त्याची चर्चा करण्याचे हे स्थान नाही. या काहीशा संदर्भ सदृश स्थितीचे आकलन झाल्याशिवाय माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना रेशीम बागेतून मिळालेल्या निमंत्रणाचा संदर्भ लागू शकत नाही. कालचे नागपूर येथे झालेले मुखर्जी यांचे भाषण म्हणजे राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यांचा आदर्श वस्तुपाठ असल्याचा साक्षात्कार मात्र अनेकांना झाला आहे. या देशात फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा स्विकार-अंगिकार केल्याशिवाय परिवर्तनाचा विचार मांडताच येणार नाही. सार्वजनिक जीवनातून काहीशी निवृत्ती स्वीकारलेल्या व्यक्तिमत्त्वावर जगातील सर्वाधिक तरुणाई असलेल्या देशात सलग आठवडाभर चर्चा व्हावी, हे राष्ट्राच्या अधोगतीचे लक्षण म्हणावे लागेल! अर्थात हे नमुद करण्यासाठी देखिल हा लेखन प्रपंच नाही. खरे तर देशात प्रणव मुखर्जी यांच्या निमित्ताने झालेली चर्चा आणि त्यांनी संघाच्या कार्यक्रमात मांडलेले विचार हे जणूकाही खऱ्या लोकशाहीवादी, संविधान प्रेमी आणि बहुसंख्याक असणाऱ्या बहुजनांवर उपकारच! आपणा सर्वांच्या स्मरणात असेलच, साधारण पस्तीस वर्षांपूर्वी म्हणजे विसाव्या शतकाच्या आठव्या दशकात सोबत नावाच्या साप्ताहिकात बेहरे-गांगल प्रवृत्तींनी महात्मा ज्योतिबा फुले यांची बदनामी करणारे लेखन केले होते. त्यावेळी महाराष्ट्रात उसळलेल्या सामाजिक त्वेषाने बेहरे-गांगल यांना माफी-याचना करावी लागली होती. यानंतर सोबत’चे संपादक ग. वा. बेहरे यांनी उद्वेगाने परंतु अहंकारातून म्हटले होते, ब्राह्मणांवर जर या देशात कोणतेही संकट ओढवले तर ते विदेशात जाऊन स्थायिक होण्याइतपत सक्षम असल्याचे म्हटले होते! माफीनामा, विदेशात जाऊन राहण्याचा अराष्ट्रीय विचार ते आता थेट त्यांचा तथाकथित राष्ट्रवाद मांडून जो या देशातल्या सामान्य नागरिकालाच अराष्ट्रीय ठरवण्याची मक्तेदारी घेऊन ऊभा आहे, अशा मंचावर जाऊन प्रणव मुखर्जी यांनी लोकशाहीवादी व संवैधानिक पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीची  भूमिका न निभावता संघाच्या मंचावर जाऊन अनैसर्गिक ‘सोबत’ केली, हे म्हणण्यास प्रत्यवाय उरला नाही!

______________________________________

चंद्रकांत सोनवणे, संपादक, 3 Ways Media.

About Admin