Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » लोक सहभाग » लोक मत » आंबेडकरी चळवळीची दोन चाके…; एक धार्मिक आणि दुसरे राजकीय

आंबेडकरी चळवळीची दोन चाके…; एक धार्मिक आणि दुसरे राजकीय

आणि या दोन्ही चाकांना भक्कम असा वैचारीक बेस किंवा ओळख आहे याबाबत कुणाचेही दुमत होणार नाही.
परंतु प्रॉब्लेम असा आहे की भक्कम वैचारीक बेस आणि ओळख असलेल्या या तलम कापडाच्या अनेक ओळखी असलेल्या चिंध्यामधे रूपांतर झालेले आपणास दिसून येते.
दलित हा शब्द तितकाच घृणास्पद आहे जितका की अस्पृश्य..! मी भलेही आर्थिक दृष्टीने गरीब असेल, शोषित असेल परंतु मला स्वतःला downtrodden, दबलेला, पिचलेला म्हणवून घेणे किंवा माझी अशी ओळख करवून घेणे भूषणावह वाटणार नाही कारण मनाने मी प्रबळ आहे, बुद्ध विचाराने मी सामर्थ्यशाली आहे.
‘भाकरी पेक्षा स्वाभिमान महत्वाचा असतो’ या मुद्द्यावर डॉ. बाबासाहेबांनी अनेक वेळा भाषणे दिलेली आहेत. आत्मसन्मान असलेल्या ओळखीचे महत्त्व विषद करण्यासाठी त्यांनी त्यावेळच्या अखिल मुम्बई इलाखा (म्हणजे आजचा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशचा काहीसा भागाची) परिषद घेऊन मुक्ती कोणत्या दिशेने आहे हे स्पष्ट करून सांगितले होते. तरी सुद्धा कसलाही आत्मसन्मान व स्वाभिमान नसलेल्या दलित ओळखीला आपल्यातीलच काही नेत्यांनी व कार्यकर्त्यानी मताच्या राजकारणासाठी का चिकटून राहावे?
ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या समाजाला स्वाभिमानाचे स्थान; स्वाभिमानी बौद्ध ओळख प्राप्त करवून देण्यात खर्ची घातले त्या बौद्ध ओळखीला दूर सारून इतर तत्सम जातीच्या ओळखीला आपण का चिकटून राहायचे?
का आपण एकमेव ग्लोबल सामर्थ्य असलेली बौद्ध ओळख व बौद्ध विचार घेऊन पुढे जायला कचरत आहोत?
कशाला जाती अस्तित्व असलेल्या इतर ओळखी स्वीकारून त्यात समाजाचे विभाजन करण्याची आवश्यकता आहे?
म्हणून ज्या ओळखीमधे आत्मसन्मान आहे, स्वाभिमान आहे, उच्चतम विचारांची मूल्ये आहेत, मानवी मुक्तीचा मार्ग आहे अशी जागतिक दर्जाची बौद्ध ओळख घेऊनच मी पुढे जाणार. मला इतर ओळखींशी काही देणघेण नाही, इतर ओळखीची मला काडीमात्र आवश्यकता नाही कारण माझ्या मुक्तीदात्याने मला माझी ओळख दिलेली आहे.
राहिला प्रश्न राजकीय ओळखीचा तर मी बहुजन आहे की मूलनिवासी? मी पैंथर (म्हणजे काळा वाघ) आहे की माणूस? मी बहुजन सोशालिस्ट आहे की फक्त सोशालिस्ट? बहुजन सोशालिस्ट म्हणजे काय? सोशालिस्ट रिपब्लिकन म्हणजे काय? रिपब्लिकन हा सोशालिस्ट नसतो का? सोशालिस्ट हा रिपब्लिकन असतो का? मी रिपब्लिकन पार्टीचा आहे की रिपब्लिकन सेनेचा? सेना या शब्दात लोकशाही आहे का वानरशाही?
या अत्यंत मूर्खपणाच्या लेबलिंग किंवा ओळखीमधे राजकीय पक्ष देखील विभागलेले आहेत.
डॉ. बाबासाहेबांनी अत्यंत विचारपूर्वक ‘रिपब्लिकन’ ही सर्वसमावेशक राजकीय ओळख दिलेली असताना राजकीय ओळखीची व विचारधारेची देखील काही स्वार्थी पुढाऱ्यांनी व त्यांच्या आंधळ्या कार्यकर्त्यांनी खिचडी करून समाजाचे तुकडे तुकडे करून टाकले आहेत.
रिपब्लिकन हा एकमेव शब्द भारतातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील राजकारण व अर्थकारणातील ओळख आणि विचारधारा प्रस्तुत करण्यास समर्थ आहे, परिपूर्ण आहे. त्याला कसल्याही ‘बहुजन महासंघ’ किंवा ‘बहुजन सोशालिस्ट’ सारख्या शेपूट लेबलची आवश्यकता नाही. परंतु काही वकील पुढाऱ्यांना देखील याचा अर्थ कळू नये म्हणजे कमाल झाली!
रिपब्लिकन म्हणजे समाजाच्या सर्वच क्षेत्रात गणतंत्र असणे; कोणत्याही एका व्यक्तीची अथवा वर्गाची मक्तेदारी नसणे. भारत हा रिपब्लिक आहे आणि माझी राजकीय ओळख देखील रिपब्लिकनच आहे! हे ठासून सांगता आले पाहिजे. भारतीय राज्यघटनेतील सर्वच तत्वांचा म्हणजे सोशालिस्ट, लोकशाही आदी तत्वांचा समावेश रिपब्लिकन या एका शब्दात होतो. भारतीय राज्यघटनेची सर्व जनतेच्या दृष्टीने अम्मल्बजावणी करण्याची क्लीअरकट लिखित ध्येय उद्दिष्टे असलेला ‘रिपब्लिकन’ शब्द सोडून बिनकामाचे बहुजनवाद, दलित वाद, मूलनिवासीवाद, सेना-फेना, बहुजन महासंघ-बहुजन छोटासंघ, पैंथर-जनावर- कोब्रा असल्या ओळखीमधे डॉ. बाबासाहेबांच्या राजकारणाला आटवू नका ही सर्व समाज बांधवांना आणि भगिनीना माझी नम्र विनंती आहे.
जर खरच डॉ बाबासाहेबांनी दाखवलेल्या दिशेने जायचे असेल तर जागतिक दर्जाच्या बौद्ध आणि रिपब्लिकन या दोनच ओळ्खी घेऊन पुढे चला धार्मिक पातळीवर बौद्ध ओळख आणि राजकीय पातळीवर देखील एकच ओळख, एकच विचारधारा, एकच पक्ष, फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष ही डीमांड पुढे आणा…
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी औफ इंडिया च्या माध्यमातून आम्ही तर हे विचार पुढे घेऊन जात आहोत. त्यासाठीच पुण्यात २८ तारखेला बालगंधर्व रंगमंदिर येथे आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन देखील केले आहे.
आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हावे आणि शक्य असल्यास आपापल्या परीने आर्थिक सहकार्य देखील करावे ही नम्र विनंती.

आपला धम्म बांधव
सचिन शुभ्रसागर
संस्कार विभाग
‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’
रजि नं ३२२७/५५ एफ ९८२
रिपब्लिकन डेमोखासीचे व्यंगचित्रकार
९१४६१४३३३४

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg