Breaking News
Home » लोक सहभाग » लोक मत » आजकालचे पुरोगामीत्व हे वरवरचे उथळ, बेगडी

आजकालचे पुरोगामीत्व हे वरवरचे उथळ, बेगडी

काही दिवसांपूर्वीच तेलंगणामध्ये एका कुख्यात गँगला फक्त एक कोटीची सुपारी देऊन प्रणयची डोक्यात आणि मानेत खाटकाच्या सराईत शैलीने घाव टाकून दिवसाढवळ्या खुलेआम हत्या करण्यात आली. प्रणय आणि अमृताचे फेसबुकवरील एकमेकांच्या प्रेमाची नितांतनिर्मळसुंदर साक्ष देणारे व्हिडिओ व्हायरल होणे थांबत नाही तोवरच पाठोपाठ महाराष्ट्रात मालेगावात नेहाची झोपेच्या वीसेक गोळ्या जेवणात कालवून नंतर शांतपणे गळा दाबून कुणालाही सुपारी न देता थेट आईबापानीच पुढाकार घेऊन हत्या केली. ह्या धक्क्यातुन सावरायचे सांत्वनाचे ढोंग बजावताना ‘पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना’ वगैरे लिहिलेले वर्तमानपत्राच्या काळ्या निबर शाईचे अश्या बातम्यांना सरावलेले सफाईदार रकाने कोरडे फिक्कट होत नाहीत, वर्तमानपत्र रद्दीच्या गठ्ठ्यात पोहोचत नाहीत, तोवरच मंगळवेढ्यात अनुराधाचाही कुणालाही कसलीही सुपारी देण्याचा क्रूरपणा अजिबात न करता आईबापानीच निवांतपणे वेळ काढून ऐसपैस खून केला.

प्रणय, नेहा, अनुराधा ह्या तीन नावांच्या जागी देशभरातील अनेक पोरापोरींची नावं टाकून आपण ह्या घटनांकडे परत परत बघू शकतो. परत परत त्याच त्या बातम्या नावं बदलून वाचू शकतो. मरण बहाल करण्याच्या खुन्यांच्या कौशल्यातला थोडाफार फरक सोडला तर अशाच घटना गेल्या कित्येक वर्षात प्रत्येक महिन्यात देशभरात आपल्या आसपास वा जराश्या दूर, घडून आलेल्या दिसतील. मेलेल्या पोरापोरींची नावं, वेळ, सुपारी देऊन वा सुपारीशिवाय आणि मारण्याची रित हेच तेवढे संदर्भ फक्त बदलतील. सगळ्यात एक समान दुवा असेल तो म्हणजे मुलीच्या कुटुंबाची ‘समाजात होणारी बदनामी’ आणि आंतरजातीय प्रेमाला/प्रेमविवाहाला विरोध. आणि मग कुटूंबाच्या भंकस प्रतिष्ठेची रानकातडी वाचवण्यासाठी घडवून आणलेलं हत्याकांड. हे हत्याकांड काही ठिकाणी मुलीचे आईबाप जन्म दिलेल्या हातांनीच अगदी संन्यस्त थंड अवस्थेत डोळे झाकून मुलीचाच खून करून घडवतात वा मुलीचा तथाकथित खालच्या जातीतील प्रियकर वा नवरा ह्याचा अफाट रानटी ताकदीने मुडदा पाडून ‘समाजात होणारी बदनामी’ टाळण्याचे पवित्र सरंजामी कार्य मुलीचे आईबाप सिद्धीस नेतात. मुलीचा प्रियकर वा नवरा हा जर दलित समाजातील असेल तर ह्या रानटीपणातल्या क्रौर्याच्या कार्यभागाला अक्षरशः चार चांद लागावेत एवढे अद्भुत क्रौर्य दुप्पट जोमाने सादर करण्याचे कष्ट तथाकथित उच्च जातीच्या पोरींचे आईबाप हमखास घेतात. नगर जिल्ह्यातील काही हत्याकांड ह्या दुप्पट जोमाने साकारलेल्या क्रौर्याचा अक्षरशः मूर्तिमंत आविष्कार ठरलेले आहेत. दलित असून आमच्या पोरींशी सलगी करतो काय! मग हा पोरगा तर सडून ठेचून चेचूनच मेला पायजेल, त्याशिवाय पोरींच्या आईबापाच्या हळव्या मनाला सुकून लाभत नाही! तर काही ठिकाणी पोराला आणि पोरीला – दोघांनाही एकत्रच एकमेकांच्या समोरासमोरच डोळ्यादेखत मरायला भाग पाडण्याचे नशीब देण्याचा शेवटचा कनवाळूपणा हे खुनी आईबाप, भाऊभावकी, चुलते, नातेवाईक मंडळी अवश्य दाखवतात.

हत्याकांडामागून हत्याकांडं घडत जातात आणि वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने त्याच त्याच फॉरमॅट मध्ये पडत जातात. तर काहीजण जणू गढीवर बसून राज्यकारभार हाकलल्याच्या मस्तीत धुंदावलेले सर्किटशिरोमणी सैराट चित्रपटाची आठवण काढून नागराजनेच कसा सगळा समाज बिघडवला म्हणत चक्क खुनी आईबापाचीच बाजु घेऊन निर्लज्जपणे किंचाळत राहतात. आपण फक्त हताशपणे बघत राहतो आणि परत परत काही दिवस वाचत राहतो. तसेही सर्वसामान्य माणूस ह्यापेक्षा जास्त काय करू शकतो? कारण ह्या सर्वसामान्य जनतेतल्या बहुतांश माणसांकडे ‘जात’ नावाचे धारदार हत्यारचक्र डोक्यात निरंतर गरगर फिरवण्याची सोय इथल्या थोर धर्माने करून ठेवलेली आहे. म्हणूनच ‘आमच्या पोरी’ म्हणजे आमचीच तिजोरीबंद संपत्ती; ‘आमच्या पोरी’ म्हणजे आमच्या घराण्याची, जातीची, समाजाची हजारो वर्षांपासूनची इथल्या थोर सनातनी धर्मव्यवस्थेने ठरवून दिलेली ऐतिहासिक पारंपारीक खानदानी मालकीची उच्चप्रतीची ‘शुद्धता’ सांभाळलेली ‘वस्तू’ हा भ्रम आणि माज विकृतरीत्या सुदृढ होत जातो. मग असे असताना दुसऱ्याच भलत्याच खालच्या जातीतला शूरवीर प्रेमवीर लग्न वा प्रेम करून आमच्याच ‘वस्तू’ ला हात लावून, आमच्यासमोर येऊन, पळवून कसा काय निसटून जाऊ शकतो? ह्या अस्वस्थ करणाऱ्या बाटलेल्या खोट्या इभ्रतीच्या प्रश्नावरचे खतरनाक पवित्र धर्माधिष्ठित उत्तर, धर्ममान्य जातमान्य जालीम उपाय म्हणजे ही सर्रासपणे घडवली जाणारी हत्याकांडं. एकूणच भवतालातला समाजसुद्धा तेवढ्यापुरता किंचित हादरल्यासारखे थरथरतो, अजगरासारखा जागच्या जागी गदगदल्याचे दाखवतो आणि परत ‘काहीच विशेष घडले नाही’ ह्या आविर्भावात स्वतःभोवतीच दणकट वेटोळे मारत परत स्थिर होतो. जातीचा गाळ घट्ट मजबूत करीत उतरंडीतले आपले उच्चस्थान अबाधित राखत दलितांना जन्माची अद्दल घडवत, गवत उपटावे तसे सर्रासपणे गावातून, आयुष्यातून उपटत, त्यासाठी गरज पडल्यास आपल्यातल्याच एखाद्या पोरीचा स्व:खुशीने बळी देत धर्मव्यवस्था बळकट करीत राहतो.

जात नावाचं अफाट अचाट ताकदीचं हत्यार तथाकथित वरच्या जातीला खालच्या जातींवर बिनधास्त चालवता येण्याची जबरदस्त सोय इथल्या सनातनी हिंदू धर्मव्यवस्थेने करून दिली आहे. धर्माच्या ह्या उतरंडीतल्या सर्वात खालच्या तळाच्या लोकांनी फक्त वरून दहशतीचे वार झेलायचे काम गपगुमान इमानेइतबारे पार पाडायचे, उच्चजातीतल्या पोरींशी असणाऱ्या दोस्तीचा सिलसिला चुकून माकून प्रेमापर्यंत आणि नंतर लग्नापर्यंत गेलाच तर मग कुठल्याही क्षणी भर रस्त्यात अडवून, जीव सडवून सडवून मारला जाऊ शकतो हे कायम ध्यानात ठेवायचे ही आहे दहशत इथल्या सहिष्णू हिंदू धर्मव्यवस्थेची. ह्या अतीव सहिष्णु धर्मातल्या ह्या ‘वरच्या’ जाती तळातल्या जातींशी तोवरच सहिष्णुता जपतात जोवर त्या सत्तेत, संसाधनात समान नैसर्गिक वाटा मागत नाहीत, फेकलेल्या तुकड्यावरच चिडीचूप जगत राहतात. मग त्या दृष्टीने उच्चजातीची मुलगी ही तर त्या जातीच्या समाजाच्या सत्तेची, पवित्रतेची अतिशय जपून जातीतल्या जातीतच हस्तांतरण करण्याची सुवर्णकिल्लीच ठरते. तिला हात लावायचे डेरिंग कोण जातीबाहेरील माय का लाल करणार! आणि केलेच तर मग त्याचे हात पाय धड मुंडके का बरे कापले जाणार नाही?

जातीच्या वर्चस्व टिकवण्याच्या, नीच प्रतिष्ठा टिकवण्याच्या आणि पर्यायाने सनातनी धर्मव्यवस्था टिकवण्याच्या युद्धातले भयंकर डावपेच म्हणजे ही ‘ऑनर किलिंग’ म्हणून संबोधली जाणारी निर्घृण हत्याकांडं. एक देश म्हणून आपण ह्या घटनांना सवयीने सरावत चाललोय काय ह्याचा विचार कोण करणार? नुसते सद्गदीत होऊन श्वास ढाळत बसण्याने हा प्रश्न कधी सुटणारा आहे काय? माणसाला माणसाशी साधं प्रेम सुद्धा मोकळेपणाने करू न देण्याइतक्या निर्ढावलेल्या देशात आपण राहतोय. ह्या समस्येचं एकमेव मूळ आणि कुळ आहे – जात. इथला मिडिया, इथले न्यूजचॅनेल्सचे पॅनल, इथली वर्तमानपत्रं नुसत्या ‘पुरोगामी महाराष्टाला काळिमा’ ह्या मथळ्यापलीकडे झेप घ्यायचं धाडस करून जातव्यवस्थेच्या कधीही न संपू शकणाऱ्या क्रूरतेवर कधीतरी घडाघडा बोलणार आहेत काय? जब्याने भिरकावलेला दगड कधीतरी टीव्हीतून बाहेर पडून आपल्या डोक्यात फुटणार आहे काय?

कास्ट्स इन इंडिया ह्या निबंधात बाबासाहेबांनी स्त्रीचा, स्त्रीच्या लैंगिकतेचा वापर समग्र जातीव्यवस्था बळकट करण्यासाठी कसा केला गेलाय ह्याचे अतिशय सखोल विवेचन केले आहे. कुठल्याही मिडियात कोणत्याही स्वरूपात अशी हत्याकांडं घडल्यावर त्या मागच्या मानसिकतेचे मूलभूत विश्लेषण करताना ह्या निबंधाचे कधीतरी पुसटसेही संदर्भ आलेले आहेत काय?बाबासाहेबांच्या नावाची इथल्या मिडियाची आणि सवर्ण समाजाची ऍलर्जी कधी संपणार आहे? की त्यांना भय आहे बाबासाहेबांच्या विचारांचा दाखला दिल्यावर इथल्या धर्मजातव्यवस्थेची पूर्ण चिरफाड पोलखोल होण्याची? की इथल्या विचारवंतांना फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जयघोष करतानाच फक्त संविधान आणि बाबासाहेब आठवतात? ज्या देशात वर्चस्ववादी जातींच्या नीचपणामुळे साधं प्रेमही व्यक्त करता येण्याची, प्रेमात पडण्याची आणि प्रेमात जगण्याचीसुद्धा भयंकर दहशत आहे, त्या देशात फक्त लिहिण्या-वाचण्याच्या, कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने झळकणारे आजकालचे पुरोगामीत्व हे फार फार वरवरचे उथळ, बेगडी आणि प्रचंड बोगस असेच म्हणावे लागेल.

— लेखक : Mayur Lankeshwar

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »