Breaking News
Home » बातम्या » आर्थिक » उद्योगनगरीच्या मागे समस्या, आंदोलनांचा ‘फटका’! 

उद्योगनगरीच्या मागे समस्या, आंदोलनांचा ‘फटका’! 

उद्योगनगरीच्या मागे समस्या, आंदोलनांचा ‘फटका’ 

अवघ्या सात महिन्यांत पाच हजार कोटींचा फटका

औरंगाबादच्या उद्योगनगरीमागे चालू वर्षाच्या पहिल्या दिवसापासून समस्या आणि आंदोलनांचा शनि लागल्याचे चित्र आहे़ सतत कोणत्या न कोणत्या कारणांमुळे होत असलेली आंदोलने, कचऱ्याची समस्या, ग्रामपंचायतींचा वाढीव कर, विजेची समस्या, दंगल, प्लास्टिक बंदी, वाहतूकदारांचा संप आदी साऱ्यांचा मोठा फटका यंदा उद्योगांना बसला आहे. यंदा एक जानेवारीपासून आतापर्यंतच्या सात महिन्यांत थोडाथोडका नव्हे तर तब्बल सुमारे ५ हजार कोटींचा तोटा औरंगाबादच्या उद्योजक, व्यावसायिकांना सहन करावा लागला आहे.
सुरक्षित राज्य, सवलतींच्या योजना, जमीन, पाणी व विजेची उपलब्धता असल्याने प्रारंभीच्या काळात देशातील मोठे तसेच आंतरराष्ट्रीय उद्योग औरंगाबादेत दाखल झाले. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्वदीच्या शतकात औरंगाबादेत उद्योगांचा झपाट्याने विकास झाला. नंतर पंचतारांकित औद्योगिक वसाहत शेंद्रासह, डीएमआयसी प्रकल्पाचा ‘श्रीगणेशा’ झाला. सरकारने उद्योजकांपुढे सवलतींच्या पायघड्या घातल्याने देश-परदेशातून अनेक कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास सकारात्मकता दर्शविली. रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा, पैठण आदी औद्योगिक वसाहती निर्माण होऊन स्थानिकबरोबरच राज्य, देश अन् विदेशातील कंपन्यांनी येथे विस्तार केला. सद्य:स्थितीत औरंगाबादेत चार हजार उद्योग अस्तित्वात आहेत. यातील तब्बल तीन हजार लघुउद्योग असून, बहुराष्ट्रीय कंपन्यांची संख्याही १०० पेक्षा अधिक आहे. या सर्व कंपन्यांची मिळून एका दिवसाची उलाढाल तब्बल तीनशे कोटींच्या घरात आहे.
मात्र, हीच उद्योगनगरी सध्या समस्या आणि विशेषत: वेगवेगळ्या आंदोलनांमुळे भयभीत झाली आहे. विशेषत: लाखो कामगारांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांचा आधार असलेल्या उद्योगांवर गुरुवारी ( दि.९) आंदोलकांनी हल्ला केला. उद्योगांतील वाहने जाळणे, दुचाकींची मोडतोड, मशिनरीची तोडफोड केली़ वाळूज औद्योगिक वसाहतीत लागलेल्या हिंसक वळणात ६० मोठ्या आणि १५ लहान उद्योगांचे आकड्यांत मोजता न येणारे नुकसान झाले. गेल्या सात महिन्यांत सामना कराव्या लागलेल्या समस्यांच्या तुलनेत गुरूवारी झालेला हल्ला उद्योगनगरीतील उद्योजकांच्या जिव्हारी लागला. ही उद्विग्नता उद्योजकांनी गुरूवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलूनही दाखवली. शिवाय अशा समस्या आणि हिंसक आंदोलनांमुळे औरंगाबादेतून काढता पाय घ्यावा की काय, असे वाटू लागल्याचेही बोलून दाखवले. एवढेच नाही तर औरंगाबादेतील उद्योगांवर झालेल्या हल्ल्याची माहिती बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुख्यालयापर्यंत गेल्याचे सांगतानाच हा सगळा प्रकार नवीन गुंतवणूक होण्यासाठी घातक ठरणार असल्याची भीतीही व्यक्त केली. तसेच केंद्र व राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘डीएमआयसी’मध्ये येणाºया गुंतवणुकीवर देखील याचा भविष्यात परिणाम होण्याची भीती असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
———————————-

या कारणांमुळे शहर होते बंद
यंदा जानेवारी महिन्यात प्रारंभीलाच भीमा कोरेगाव प्रकरणानंतर तीन दिवस शहर पेटले. २३ फेबु्रवारीला सातारा परिसरात शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले फलक फाडण्यात आले. त्यानंतर दिवसभर बंद पुकारण्यात आला. २६ मार्चला मिटमिटा येथे कचरा प्रश्नावरून वाद उफळून शहर बंद होते. मनपाच्या पथकाने नळ कापण्याच्या कारणावरून जुन्या औरंगाबाद शहरात दंगल पेटल्यानंतर आठ दिवस शहरात धग कायम होती, तर मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर दोन वेळा औरंगाबाद बंद होते. याशिवाय वाहतूकदारांच्या संपामुळे उद्योजकांना आपले उत्पादन वा कच्चा माल आयात-निर्यात करण्यास अडचणींचा सामना करावा लागला होता. एकीकडे शासन उद्योग आणण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे प्रकल्प हाती घेत आहे. तर दुसरीकडे आंदोलनामुळे नकारात्मकतेचे ‘मॅग्नेट’ सातासमुद्रापार पसरत आहे. हे रोखण्याचेही आता सरकारपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

———————————-
एका दिवसामुळे ‘साखळी’ बिघडते

एखाद्या दिवसाच्या संपामुळे त्या दिवसापुरती उद्योगाची चाके बंद असली तरीही पुढील दोन दिवस त्याचा परिणाम जाणवत असतो. मालाचे उत्पादन, आयात-निर्यात आदी बाबींवर त्याचा हमखास परिणाम जाणवतो़ केवळ एका दिवसाच्या बंदमुळे त्यानंतरची सर्वच साखळी बिघडते. वेगवेगळ्या समस्या, अडचणी, आंदोलनांमुळे वर्षभरात औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राला ५ हजार कोटींच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. शिवाय याचा भविष्यात औरंगाबादमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

४००० : औरंगाबादेतील उद्योग
३००० : लघुउद्योगांची संख्या

१०० : बहुराष्ट्रीय कंपन्या
७५ : बंंददरम्यान हल्ला झालेल्या कंपन्या

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »