Monday , 15 October 2018
Breaking News
Home » Breaking News » काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचं निधन

काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचं निधन

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचं आज प्रदीर्घ आजारानं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं. गेल्या नऊ वर्षापासून ते कोमातच होते. येथील अपोलो रुग्णालयात आज त्यांची प्राणज्योत मालवली.
२००८ पासून आजारी असलेले प्रियरंजन दासमुन्शी नऊ वर्षापासून कोमातच होते. त्यांच्यावर नऊ वर्षापासून अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेत असताना त्यांना लकवा मारला होता आणि हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यामुळे त्यांना बोलताही येत नव्हतं. ते कुणाला ओळखतही नव्हते. त्यांच्या मेंदूचा रक्त पुरवठाही थांबला होता. गेल्या काही दिवसापासून तर त्यांच्या शरीराची हालचालही मंदावली होती. शरीरातील अनेक भाग निकामी झाले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. दासमुन्शी यांच्या मागे पत्नी खासदार दीपा दासमुन्शी आणि मुलगा प्रियदीप असा परिवार आहे. दासमुन्शी यांच्या उपचाराचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दासमुन्शी यांच्या निधनावर सर्वच राजकीय पक्षांनी शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसनेही दासमुन्शी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. फुटबॉल या खेळासाठी दासमुन्शी यांनी दिलेलं योगदान न विसरता येण्यासारखं असल्याचं काँग्रेसनx शोकसंदेशात म्हटलं आहे. ‘दासमुन्शी यांच्या रूपाने अत्यंत चांगला माणूस आणि बुद्धीमान राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला आहे. पश्चिम बंगाल आणि काँग्रेस एका मोठ्या नेत्याला मुकले आहेत,’ अशी भावना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.

१९८५ मध्ये तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातही त्यांनी मंत्री म्हणून कामगिरी बजावली होती. १३ नोव्हेंबर १९४५ रोजी जन्मलेले दासमुन्शी १९७१ मध्ये पहिल्यांदा दक्षिणी कोलाकाता लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. वयाच्या २५ व्या वर्षीच ते पश्चिम बंगाल यूथ काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. त्यांनी २००४ मध्ये रायगंज लोकसभा मतदारसंघातून शेवटची निवडणूक लढवली होती आणि विजयी झाले होते. या शिवाय तब्बल २० वर्ष ते ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्षही होते.
२००४ मध्ये तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री असताना दासमुन्शी यांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यांनी ‘एएक्सएन’ आणि ‘फॅशन टीव्ही’वर बंदी घातली होती. खेळांच्या थेट प्रसारणांचे अधिकार त्यांनी दूरदर्शनला दिले होते. त्यांना मीडियावरही काही बंधनं असावीत असं वाटत होतं. त्यासाठी कायदा करण्याच्याही ते तयारीत होते. मात्र ते आजारी पडल्याने हा कायदा झाला नाही.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg