Monday , 15 October 2018
Breaking News
Home » Breaking News » कार्ती चिदंबरम यांना परदेशी जाण्यास सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

कार्ती चिदंबरम यांना परदेशी जाण्यास सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

नवी दिल्ली – माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर आर्थिक घोटाळ्यांचे आरोप असल्याने त्यांना परदेशात जाण्यास बंदी घालण्याची मागणी नुकतीच सीबीआयने केली होती. मात्र, लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात त्यांच्या मुलीला प्रवेश घ्यायचा असल्याने तिच्यासोबत जाण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना आज परवानगी दिली.
न्यायालयाच्या परवानगीनुसार, २ डिसेंबर रोजी कार्ती चिदंबरम लंडनला जाणार आहेत. त्यानंतर १० डिसेंबर रोजी ते भारतात परततील. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या प्रकरणी सुनावणी करताना ही परवानगी दिली. मात्र, १० डिसेंबरपर्यंत त्यांना भारतात परतण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. जर, कार्ती चिदंबरम १० डिसेंबरपर्यंत भारतात परतले नाहीत तर त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. परदेशात जाण्यासाठी परवानगी देताना न्यायालयाने कार्ती यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले आहे.

कार्ती यांचे वडील पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री असताना २००७ मध्ये INX Media Ltd या कंपनीला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून मंजुरी मिळवून देण्यात कार्ती यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याचबरोबर कार्ती यांची परदेशातील अनेक बँकांमध्ये खाती असल्याचेही सीबीआयच्या चौकशीत समोर आले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रडारवर असल्यानेच कार्ती यांना परदेशात जाण्यापासून रोखावे, अशी विनंती नुकतीच सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात केली होती.
सीबीआयच्या आरोपांचे खंडन करताना कार्ती यांनी सीबीआयवर टीका केली. २६ ऑगस्टनंतर सीबीआयने आपली कुठलीही चौकशी का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सीबीआय सांगते त्याप्रमाणे परदेशातील त्या ६ बँकांच्या खात्यांच्या तपशीलाची मागणीही त्यांनी केली आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg