Monday , 15 October 2018
Breaking News
Home » Breaking News » केंद्र सरकारला राहुल गांधींची भीती वाटते – शरद पवार

केंद्र सरकारला राहुल गांधींची भीती वाटते – शरद पवार

चंद्रपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार आणि विद्यमान राज्यकर्त्यांना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बदलत्या प्रतिमेची धास्ती वाटत असून गांधी कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी बोफोर्स सारखी जुनी प्रकरणे पुन्हा उघड करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे असे म्हणत शरद पवार यांनी सरकारची नीती आणि हेतूवर बोट ठेवले आहे. ते चंद्रपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.
पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, बोफोर्स प्रकरणी कोर्टाने राजीव गांधी यांना निर्दोष म्हटले आहे. राजीव गांधी आता हयात नाहीत. शिवाय ज्या इटालियन माणसावर ठपका होता तोही आता जिवंत नाही, असे असताना पुन्हा नव्याने बोफोर्स बाबतचा खटला दाखल करून हे प्रकरण उघडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. याचे कारण म्हणजे या सरकारला राहुल गांधींची चिंता वाटू लागली आहे आणि याच भीतीने हे सरकार राजीव गांधींना बदनाम करू इच्छिते असे दिसते, अशा शब्दात पवार यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे.
गांधी कुटुंबाचा गौरव करताना पवार पुढे म्हणाले की, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी देशाला विकासाच्या वाटेवर नेले. राजीव गांधी हा दूरदृष्टी असलेला नेता होता. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी देशातील गरिबी हटवण्यासाठी कार्य केले. सत्तेचा वापर हा देशातील गरिबांसाठी करायचा हे त्यांनी दाखवून दिले असे म्हणत पवार यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.
राजीव गांधींची प्रतिमा खराब व्हावी यासाठी केंद्रातील सरकार प्रयत्नशील आहे. राहुल गांधींवर बोफोर्स प्रकरणाचा ठपका ठेवण्याचा सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असा थेट आरोप पवार यांनी मेळाव्यात बोलताना केला. केंद्रातील सरकार गांधी कुटुंबाची बदनामी करत असून भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे, अशी जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg