आता या कंपन्या आपल्या शाळांना सम्पवू शकतात…
नव्हे नव्हे … शाळांना संपवण्यासाठीच ही सुरुवात आहे .
आता पालक व्हाउचर घेऊन या शाळात गेल्यास नवल वाटायला नको…
एका अस्ताची सुरुवात केव्हाच झाली आहे…
आधी सेमी आणि आता इंग्लिश माध्यमाच्या शाळांकडे पालक-विद्यार्थी निघाले आहेत. पटसंख्येअभावी मोठ्या शहरांतल्या ‘प्रतिष्ठित’ खासगी मराठी (माध्यमाच्या) शाळा बंद पडल्यात/पडताहेत. मोठ्या प्रमाणावर मुलांचे स्थलांतर सुरुये. नव्याने मराठी शाळा सुरु करायला घाई घाई परवानगी मिळत नाहीये!
महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या अनेक शाळांना तर आधीच टाळे लागलेत. आता तर शासनाने झेडपीच्या शाळांना टाळे ठोकायला सुरुवात केलीय. १३१४ ही केवळ सुरुवात आहे.
शिक्षणाची हमी देणारा कायदा आलेला असताना मोफत शिक्षणाची वाट लावली जातेय. शिक्षण भांडवलदारांच्या घशात घातले जातेय.कंपनी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. मराठी शाळा आचके देताय. मृत्यूशय्येवर आहेत… मला काय त्याचे, म्हणत. आम्ही सारे शांत, निवांत आहोत. काही जण तेवढे हळहळ व्यक्त करताय…
२०२१ साली मराठी माध्यमाच्या शाळा बंद झालेल्या असतील, असा अहवाल एका संस्थेने अलिकडेच प्रसिद्ध केलाय.
समाजात इतके सगळे क्रांतिकारी बदल अत्यंत वेगाने घडत असताना हे बदल नेमके कशामुळे घडताहेत? याविषयी काही संशोधन, अभ्यास होताना दिसत नाहीयेत. आपल्या हातातून या गोष्टी सूटून चालल्यात.
समाजातले धुरीण काहीही भूमिका घेताना दिसत नाहीयेत. संशोधन संस्था, अभ्यासक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, वृत्तपत्रे, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी याकडे खोलात जाऊन संवेदनशील नजरेने का बघत नसतील? त्यांनी गुळणी का धरलीय?(इथे अपवाद मान्य आहेत.)
फार मोठ्या संघर्षानंतर शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. आता लगेचच गरीबांच्या मुलांपासून शिक्षण हिरावून घेतले जात असताना समाजात याची काहीच चर्चा होताना दिसत कशी नाही? हा कळीचा प्रश्न एकाएकी इतका पोरका कसा काय झालाय?
समाजाच्या जाणिवाच बोथट झाल्यायेत? की याच्याने माझे काय बिघडणारय, या आत्मघातकी मध्यमवर्गीय आत्मकेंद्रित वृत्तीने तोंडं गप्प आहेत? ज्यांना समजते, ज्यांनी भूमिका घ्यायला हवी असे लोकही व्यवस्थेला शरण गेलेत की हतबल झालेत? की या प्रश्नाचे त्यांचे आकलनच मार खाते आहे? यातले गांभीर्य कोणाच्या लक्षात येत नाहीये, की लक्षात येत असूनही भूमिका घ्यायचे आणि त्यासाठी ‘किंमत’ मोजायला लागते म्हणून लोक बोलायचे टाळत आहेत लोक? नेमके काय आहे? मी केवळ अस्वस्थच नाहीये; तर व्याकूळ आहे. माझे काळीज कळवळतेय.
शिक्षणाच्या हक्काचे काय झाले?
मराठी शाळांचे काय होणार?
कोणी सांगेल का?
एक जागृत नागरिक!