Monday , 15 October 2018
Breaking News
Home » बातम्या » खेळ » खेळाडूंना वाढीव मानधन मिळायला हवे – गांगुली

खेळाडूंना वाढीव मानधन मिळायला हवे – गांगुली

मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा अध्यक्ष सौरव गांगुलीने खेळाडूंच्या मानधनाच्या मुद्द्यावर विराट कोहलीची पाठराखण केली आहे. बीसीसीआयच्या नफ्यात खेळाडूंना हिस्सा मिळायला हवा, असे मत गांगुलीने व्यक्त केले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि धोनी यांनी केलेल्या वेतन वाढीची शिफारस बीसीसीआयच्या समितीने सोमवारी स्वीकारली आहे. गांगुलीने एका कार्यक्रमामध्ये खेळाडूंच्या मानधनामध्ये वाढ करणे गरजेचे असल्याचे म्हटले. जर बीसीसीआयच्या उत्पन्नात वाढ होत असेल तर खेळडूंनाही नफ्यात वाटा दिलाच पाहिजे, असे त्याने सांगितले.
गांगुली पुढे म्हणाला की, क्रिकेट संघातील खेळाडूंची कारकिर्द फारच छोटी असते. काही खेळाडू १५ वर्ष मैदान गाजवतात तर काहींच्या वाट्याला यापेक्षाही कमी काळ येतो. त्यामुळे खेळाडूकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फार कमी खेळाडू दोन दशके मैदानात छाप सोडण्यात यशस्वी होतात. त्यामुळेच खेळाडूंच्या मानधनाचा मुद्दा समर्थनीय असल्याचे गांगुलीने सांगितले. सध्याच्या घडीला बीसीसीआय खेळाडूंकडे सकारात्मकदृष्ट्या पाहत असल्याचे देखील त्याने स्पष्ट केले.
गांगुलीने त्याच्या कारकिर्दीतील मानधनाचा किस्साही सांगितला. १९९१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यानिमित्त ३० हजार रुपये मिळाले होते. ज्यावेळी २०१३ मध्ये मी निवृत्ती घेतली तेव्हा मानधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले होते, असे तो म्हणाला. नुकतेच बीसीसीआयने खेळाडूंचे मानधन दुप्पट केले होते. मात्र, या निर्णयावर खेळाडू संतुष्ट नाहीत. दुप्पट वाढ केल्यानंतर अ वर्गातील खेळाडूंचे मानधन १ कोटीवरुन २ कोटी इतके झाले आहे. बीसीसीआयच्या नफ्यातील ८ टक्क्यावरुनही कमी हिस्सा खेळाडूंना दिला जातो. बीसीसीआयच्या आगामी बैठकीमध्ये प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली खेळाडूंच्या मानधनाचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. बीसीसीआय यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg