नवी दिल्ली – चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांना सुनावण्यात येणाऱ्या शिक्षेचा निकाल पुन्हा एकदा लांबला आहे. विशेष सीबीआय न्यायालय आता शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात येईल. यापूर्वी दोनदा लालूंच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
Sentence will be announced at 2 pm, tomorrow, via video conferencing: Chittaranjan Sinha, #LaluPrasadYadav's lawyer #FodderScamVerdict pic.twitter.com/JyBijWmowc
— ANI (@ANI) January 5, 2018
#FodderScam Case: Hearing over quantum of sentence for the 5 accused, including #LaluPrasadYadav, completed at Ranchi Special CBI Court. Sentence yet to be announced.
— ANI (@ANI) January 5, 2018
न्यायालयाने शनिवारी झालेल्या सुनावणीत त्यांना दोषी ठरवले होते. तब्बल २१ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच ६९ वर्षीय लालूप्रसाद यांना अटक करण्यात आली होती. यानंतर लालूंच्या शिक्षेची सुनावणी दोनदा टळली होती. त्यामुळे लालूंना आज काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र, आज पुन्हा एकदा लालूंची शिक्षा टळली. दरम्यान लालूंनी माझ्या प्रकृतीचा विचार करून कमीत कमी शिक्षा करावी, अशी विनंती न्यायाधीशांना केली आहे. राजदने यापूर्वीच न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले जाईल आणि राजकीय संघर्षही सुरूच राहील, असे जाहीर केले होते.
चारा वितरणाच्या नावाखाली महसूल विभागाच्या देवघर कोषागारातून १९९१ ते १९९४ या वर्षांत ८९ लाख २७ हजार रुपयांचा हा गैरव्यवहार झाला होता. पाटणा उच्च न्यायालयाने १९९६मध्ये या घोटाळ्याच्या तपासाचे आदेश दिले होते. २७ ऑक्टोबर १९९७ ला देवघर कोषागारातील गैरव्यवहारावरून ३८ जणांवर आरोपपत्र दाखल झाले होते. त्यातील ११ जणांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला, तीनजण साक्षीदार बनले तर २००६-०७मध्ये दोघांनी गुन्हा स्वीकारून शरणागती पत्करली. लालूप्रसाद यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी तीन प्रकरणे दाखल आहेत. त्यात दुमका कोषागारातून ३.९७ कोटी रुपयांचा, छैबासा कोषागारातून ३६ कोटी रुपयांचा आणि दोरांदा कोषागारातून १८४ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.