Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » बातम्या » ज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे लढणारेच जिंकतात!

ज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे लढणारेच जिंकतात!

संध्याकाळचे सात, साडेसात वाजले असतील हाॅस्टेलवर साग्या आला होता स्कुटर घेवून,गडबडीत , “चल आवर, आपण गुरूजींनी भेटायला चाललोय.” बर्याचदा साग्याच्या बोलण्यातनं गुरूजींचा विषय निघायचा, त्यांचा त्याग, देश, धर्मप्रेम, शिवप्रेम सारं साग्या भारावून सांगायचा.साग्या एका मोहिमेला पण जावून आलेला तेंव्हा गुरूजींनी कसे खायला ड्रायफ्रुटस् दिले होते हे सांगताना साग्याच्या चेहर्यावर प्रचंड चमक दिसायची. नाव ऐकत होतो… संधी मिळतेय तर जावून भेटूया म्हटलं. आवरलं साग्याच्या स्कुटरवर ढ्यांग टाकली आणि साग्यानं स्कुटर दामटली… ती थेट मित्राच्याच घरी येवून थांबलो.
आमच्याच एक दोस्ताचं लहान घर होतं.बैठ.गुरूजी आणि तो मित्र आणि दोघं तिघं व मी व साग्या असे सारे बसलो. साग्याने जावून गुरूजींनी नमस्कार केला.शेजारी बसलो.कडकडीत शरीर, तसाच आवाज, झुबकेदार मिशा, धोतर शर्ट जरा प्रवासानं मळलेला होता… टाचा, पाय काटक गुरूजी शांत बसून होते… आणखी दोघं तिघे आले. चहापाणी झाल्यावर, आम्ही कोण कुठून आलो आहोत.. काय काय करतो.. अशा गप्पा सुरू झाल्या.. आणि मग गप्पांचा सुर शिवराय, इतिहास व आपसूक मुसलमान याकडे वळला/वळवला., “कसं आहे आपण रानातनं चाललोय आपल्याला साप चावला तर आपण जर त्या सापाला शोधत राहिलो तर आपण मरून जावू.. त्यामुळे त्या सापाला पहिलं ठेचलं पाहिजे मग तो विषारी बिनविषारी यावर चर्चा केली पाहिजे. साप बिनविषारी असेल तर त्याला मारता कामा नये. पण हे मुसलमान आहेत ना ते सरसकट विषारी साप आहेत. त्यांना ढेचलचं पाहिजे.. हेच धर्मकार्य, देशकार्य आहे वगैरे वगैरे.. हे सांगताना गुरूजींचा शांत चेहरा आवेशपूर्ण झाला होता. “देशद्रोही तितुके कुत्ते.. परी मारोनी घालावे परोते.” वगैरे प्रार्थना झाली.
जे काही गुरूजी बोलले ते मला तरी पटणारं नव्हतं.कारण गावाकडे आमच्या आसपास घराशेजारी मुस्लिम कुटूंब आमच्या घरी कोणी वारलं तर तीन चार दिवस त्यांची चुल पेटायची नाही. दिपवाळीला फराळाचं ताट पहिलं त्यांच्या घरी पोहचायचं साप, विषारी साप वगैरे लांबच्या बाबी होत्या.. नक्कीच काहीतरी गुरूजी सांगत होते ते चुकीचं होतं, खोटं होतं…
नंतर जेम्स लेन प्रकरण झालं. सारा महाराष्ट्र त्या मुद्द्यांवर पेटून उठलेली असताना शिवरायांचे निस्सिम भक्त असणारे गुरूजी मात्र शांत होते.. साग्या आणि बाकीचे दोस्त त्यांना भेटून आले. गुरूजींची ही जाणीवपूर्वक घेतलेली शांत भूमिका यांना हादरवून सोडणारी ठरली. साग्या करीयरच्या मागे लागला. जे क्षेत्र निवडलं आहे त्यात व्यवस्थित कष्ट करून कमावतो. ज्याच्या घरी जमलो होतो तो सत्यशोधक विचारांकडे वळला. मला जेम्स लेन प्रकरण त्यामुळे महत्वाचं वाटतं. अनेकांची आयुष्य त्यातून सावरली.. पोरं वाचू लागली, विचार करू लागली…
शिवरायांचे मला पण आकर्षण आहे,आदर आहे पण ते हिंदू/मराठा वगैरे असल्याने नाही तर धार्मिकसहिष्णूतेवर आधारीत अठरापगड जातींना सोबत घेवून कल्याणकारी राज्य स्थापन करणारा राजा म्हणून. पण त्यासोबतच मला फुले, शाहू, बाबासाहेब महत्वाचे वाटतात. ज्यांनी शिक्षण, ज्ञान मार्ग यावर भर दिला. आजचं युग ज्ञानयुग आहे म्हणून मला फुले, शाहू, आंबेडकर आजच्या काळाशी जास्त सुसंगत वाटतात. आपण शाहू, फुले, आंबेडकर स्विकारतो म्हणजे शिवराय नाकारतो असा त्याचा अर्थ नाही होतं उलट ह्या तिन्ही व्यक्ती आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर शिवरायांना आठवतात त्यांच्या कडून प्रेरणा घेतात.
आज युद्धं तलवारी, ढाली घेवून लढली जात नाहीत तर ती तंत्रज्ञान, ज्ञान व आर्थिक नाड्या ताब्यात ठेवून लढली जात आहेत… हो हे मिळवले तो पुढं असणार आहे आणि जो ढाल तलवारीत गुंतेल तो आपोआपच मागे पडणार आहे. आता आजच्या काळानुसार काय निवडायचं हे आपल्या हातात आहे. ढाल तलवार की ज्ञान… आणि माथी भडकावून ढाल तलवारी हातात घ्या सांगणारे की.. अभ्यास करा, शिका.. मोठे व्हा सांगणारे..!!

 

शरद पाटील

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg