Breaking News
Home » Breaking News » डिसेंबरमध्ये राहुल गांधींचा राज्याभिषेक?

डिसेंबरमध्ये राहुल गांधींचा राज्याभिषेक?

नवी दिल्ली – अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रक्रियेला येत्या १ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन नव्या अध्यक्षाची घोषणा होणार आहे. दरम्यान, ४ डिसेंबर रोजीच पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे अध्यक्ष बनण्याची शक्‍यता आहे.
विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. ही बैठक संपल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते रणजित सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, १ डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात येणार असून ४ डिसेंबर रोजी अर्ज दाखल करायचे आहेत. तसेच १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी नवा अध्यक्ष जाहीर केला जाईल.
४ डिसेंबर रोजी केवळ राहुल गांधी यांचाच अर्ज आल्यास त्याच दिवशी ते अध्यक्ष बनल्याचे स्पष्ट होईल. जर राहुल यांच्याशिवाय पक्षातील अन्य कोणी उमेदवारी अर्ज दाखल केला तर रितसर निवडणूक होईल आणि १९ रोजी नवा अध्यक्ष निवडला जाईल. मात्र, राहुल यांच्याविरोधात कोणी अर्ज दाखल करण्याची शक्‍यता कमीच असल्याचे बोलले जाते.
राहुल यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये विविध राज्यामधील प्रचार मोहिमेचे केलेले आक्रमक नेतृत्व लक्षात घेता लवकरात लवकर ते पक्षाची सूत्रे पूर्णपणे हाती घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर, राहुल हे पक्षाध्यक्ष झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात काँग्रेस सध्या करत असलेला संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »