Breaking News
Home » बातम्या » तुळजाभवानीला इजा पोचवल्यास कुराणाची शपथ…

तुळजाभवानीला इजा पोचवल्यास कुराणाची शपथ…

 

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिराला इजा पोहचवू नये, तेथील पुजार्‍यांना त्रास देवू नये, मंदिराचे नुकसान करू नये, असा स्पष्ट उल्लेख असलेली पाचशे वर्षांपूर्वीची आदिलशाहीची अस्सल सनद तुळजापुरात सापडली आहे. असे कृत्य करणार्‍या मुस्लिमांना कुराणची, ब्राम्हणांना गायीची तर मराठ्यांना काशीची शपथ घालण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी १४० वर्षे अगोदर पहिल्या आदिलशहाने दिलेली ही सनद महाराष्ट्राच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाला छेद देणारी ठरणार आहे. या सनदीमुळे नव्या ऐतिहासिक मांडणीसाठी विश्वासार्ह प्रमाणही उपलब्ध झाले आहे.आदिलशाहीचा संस्थापक युसूफ आदिलशहा याने हिजरी ९१० म्हणजेच १४८९ साली तुळजापूरसाठी दोन महत्वाच्या सनद दिलेल्या आहेत. तुळजापूर येथील पुजारी विलास वाळके यांच्या घरी १९७१ साली घराचे बांधकाम करताना जुन्या बांधकामात ही सनद सापडली. घराच्या भिंतीत एका संदुकमध्ये ही सनद जपून ठेवण्यात आली होती. एक सनद १ फूट आकाराची तर दुसरी तब्बल ७.२ फूट लांबीची आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख प्रमाणपत्र धारकांकडून यातील मोडी लिपीचे मराठी भाषांतर करून घेण्यात आले आहे. औरंगाबाद येथील उच्च न्यायालयातील एका प्रकरणातही ही सदर वापरण्यात आली आहे.छोट्या सनदीमध्ये त्याकाळी आदिलशहाचा राज्य कारभार कसा चालत होता, याची चुणूक आहे. तर दुसर्‍या सनदीत आदिलशहाने तुळजापूर हे वतन ७०० होनाचा कर म्हणून आनंदराव कदम यांना दिल्याचा उल्लेख आहे. बहामणी राजसत्तेचा सुभेदार असलेल्या युसूफ आदिलशहा याने १४८९ साली आदिलशाहीची स्थापना केली. सलग २०५ वर्षे राज्य कारभार करून १६८५ पर्यंत आदिलशाही टिकली. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात त्याचा मोठा प्रभाव आहे, ही सनद त्याचे उत्तम उदाहरण होय.विलास वाळके यांच्या घरी सापडलेल्या या ऐतिहासिक ठेव्यामुळे महाराष्ट्राच्या तत्कालीन इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होण्यास मदत होणार आहे. तुळजाभवानी मंदिराला आदिलशहाचा सरदार अफजलखान याने १६५९ साली इजा पोहचविल्याचे उल्लेख अनेक बखरींमध्ये आढळतात. मात्र, इतिहासाचा अस्सल दस्तावेज असलेली ही सनद समोर आल्यामुळे आता नव्याने ऐतिहासिक मांडणी करण्यास विश्वासार्ह प्रमाण उपलब्ध झाला असल्याचा दावा तुलाजभवानी देवीचे अभ्यासक तथा तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. सतीश कदम यांनी केला आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »