Sunday , 16 December 2018
Breaking News
Home » Breaking News » दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात डॉक्टरानेच मांत्रिकाला बोलवून तंत्र-मंत्र केल्याची धक्कादायक घटना

दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात डॉक्टरानेच मांत्रिकाला बोलवून तंत्र-मंत्र केल्याची धक्कादायक घटना

आयसीयू’मधील रूग्णावर मांत्रिकाकडून उपचार, महिलेचा मृत्यू


पुणे- पुण्यातील प्रसिद्ध अशा दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात ‘आयसीयू’ मध्ये उपचार सुरू असलेल्या महिलेला फरक पडावा म्हणून डॉक्टरानेच एका मांत्रिकाला बोलवून तिच्यावर तंत्र-मंत्र केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसापूर्वीची ही घटना असून, या तंत्र-मंत्र केल्यानंतर महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला.

संध्याा सोनवणे (वय 24, दत्तवाडी) असे या महिलेचे नाव आहे तर, मांत्रिकाला बोलवून त्यांच्याकडून उपचार करून घेणा-या डॉक्टरचे नाव डॉ. सतीश चव्हाण असे आहे.

याबाबतची माहिती अशी की, संध्या सोनवणे यांच्या छातीत दुधाची गाठ झाल्याने स्वारगेटजवळ दवाखाना असलेल्या डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे त्या उपचारासाठी गेल्या. मात्र, या डॉक्टरने संध्या यांच्यावर चुकीची शस्त्रक्रिया केली. यामुळे संध्या या प्रकृती खालावू लागली. गडबड झाल्याचे लक्षात येताच डॉ. चव्हाण याने संध्या यांना मंगेशकर रूग्णालयात हलविण्यास सांगितले. सोबतच तो संध्या यांच्या कुटुंबियांसोबत तेथेही होता. यानंतर संध्या यांच्यावर उपचार करण्यासाठी एका मांत्रिकला बोलविण्यात आले. संबंधित मांत्रिकाने संध्या यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू असताना तंत्र-मंत्र हा अघोरी उपाय केला. यावेळी संध्या यांचे कुटुंबिय व डॉ. चव्हाण हा सुद्धा उपस्थित होता.

दरम्यान, संध्या सोनवणे यांचा मृत्यू सोमवारी पहाटे झाला. शस्त्रक्रिया चुकीची केल्याने रक्तस्त्राव झाल्याने संध्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर हा अघोरी प्रकार शिवसेनेचे पदाधिकारी सचिन तावरे यांना कळला. त्यांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर ही घटना समोर आली.

मात्र, हा मांत्रिक नेमका कुणी बोलावला याची माहिती पुढे आली नाही. मात्र, हा मांत्रिक डॉ. चव्हाण यानेच बोलविल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मंगेशकर रूग्णालयाने यासंदर्भात अधिक बोलणे टाळले आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg