Breaking News
Home » लोक सहभाग » दिल्ली विद्यापीठात काय शिकवतात कांचा इलय्याची पुस्तकं . . . .

दिल्ली विद्यापीठात काय शिकवतात कांचा इलय्याची पुस्तकं . . . .

दिल्ली विद्यापीठात काय शिकवतात कांचा इलय्याची पुस्तकं . . . .

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आपल्या निवृत्ती नंतर एका मुलाखतीत म्हणाले होते , “कुणी माझ्यावर किती टीका करावी ही बाब आक्षेपार्ह होऊ शकत नाही आणि आपण त्याच्या बोलण्यावर बंदीही आणू शकत नाही. कारण त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याची मी शपथ घेतलेली आहे.
तर प्रसिद्ध पाश्चात्य विचारवंत हॉल्टेअर म्हणतात “ मी आपल्या एखाद्या विचाराशी असहमत असलो तरी, तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याचा अधिकार असायला हवा, यासाठी संघर्ष करेल आणि त्यात मला मृत्यू आला तरी चालेल.”
वरील दोन्ही प्रथितयश प्रभुतींच्या मतांचे अवलोकन केल्यावर ‘स्वतंत्र अभिव्यक्ती’ किती महत्वाची असते याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. कला, साहित्य, नाट्य , अभिनय आणि लेखणीच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे व्यक्ती स्वतःला व्यक्त करत असतो. आपल्या स्वानुभूत जगण्याला आणि जगण्याच्या आकांक्षेला अभिव्यक्तीद्वारे वाट मोकळी करुन दिली जाते. मानवी जगण्यातला हा एक मूलभूत अधिकार आहे. एखाद्याच्या असहमत विचाराशी देखील सहमती ही सहजीवनाची खरी ओळख आहे. यात लोकतांत्रिक मूल्य आहे. म्हणूनच लोकशाही प्रक्रियेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक मुलभूत अधिकार आहे.
साचेबद्ध विचार परंपरेला आणि हितसंबंधाला एखाद्या नव्या विचाराने आव्हान दिले की अशा कृतीला आणि अभिव्यक्तीला विरोध करण्याची जुनाट जळमटलेली परंपरा समाजात अस्तित्वात असते. या परंपरेला नाविन्याचा वीट असतो. तसेच आपल्या हितसंबंधाना अडसर वाटले की नव्या विचारांचा विरोध विविध मार्गांनी सुरु होतो.
न्यायमूर्ती चेलमेश्वर आणि पाश्चात्य विचारवंत हॉल्टेअर यांच्या अभिव्यक्ती बाबतच्या मतांचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे सद्यस्थितीत देशभरात नव्या जाणीवेच्या आणि परंपरागत साचेबद्ध विचारसरणीला आव्हान देणा-या, श्रम आणि सृजन संस्कृतीचा सन्मान करणाऱ्या साहित्यकृतीला होत असलेला विरोध किती प्रतिगामी आहे आणि लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणारा आहे याचे अवलोकन होण्यासाठी.
मागील महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक्रमात अंतर्भाव केलेल्या दिनकर मनवर यांच्या “ पाणी कसं अस्तं” या कवितेवर आक्षेप घेऊन ती कविता अभ्यासक्रमातून वगळायला भाग पाडले. एका गंभीर आणि समाज स्वास्थ्यासाठी गुणात्मक लेखन करणाऱ्या साहित्य कृतीला विध्यार्थ्यांना मुकावे लागले. आणि आता दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात ऐच्छिक विषयात समावेश असलेल्या कांचा इलय्या शेफर्ड यांचे पुस्तकं वगळण्याची शिफारस दिल्ली विद्यापीठाच्या स्थायी समितीने केली आहे. अर्थात सदरची पुस्तकं अभ्यासक्रमातून वगळण्यासाठीची विद्यापीठाची एक लोकशाही प्रक्रिया आहे. या बाबतचा अंतिम निर्णय विद्यापीठाची शिक्षण परिषद(Academic Council) घेत असते.
कांचा इलय्या यांची तीन पुस्तकं एम ए राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात मागील दहा वर्षापासून अभ्यासली जात आहेत. त्यांची ‘व्हाय आय एम नॉट अ हिंदू, गॉड एज़ पॉलिटिकल फिलॉसफर आणि पोस्ट-हिंदू इंडिया’ ही तीन पुस्तकं म्हणजे भारतीय सामाजिक-आर्थिक संशोधनाचा व्यापक आधार असणारी आहेत. सेज सारख्या नामांकित अंतरराष्ट्रीय प्राकाशन संस्थेने ती प्रकाशित केलेली आहेत.
ऑक्टोबर,२०१७ मध्ये जेंव्हा त्यांच्या पोस्ट-हिंदू इंडिया या पुस्तकाचे तेलगु भाषेत भाषांतर झाले त्यावेळीही त्यावर वाद होऊन पुस्तकावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असता लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची राखण करत न्यायालयाने सदरची याचिका फेटाळली होती. या पुस्तकातल्या ‘मानवी तस्करी ‘या प्रकरणावर आक्षेप घेण्यात आलेले होते.

या पैकी ‘God as Political Philosopher’ हे पुस्तक त्यांच्या स्वतःच्या पीएचडी च्या प्रबंधावर आधारित असून संदर्भ दृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. इसवी सना पूर्वीच्या सहाव्या शतकातील गौतम बुद्धाच्या राजकीय विचारावर आधारित हे पुस्तक आहे. या पुस्तकात कांचा इलय्या यांनी बुद्धाला प्लेटो, अरीस्टोटल, कन्फ्युसियस,कौटिल्य आणि मनु यांच्याही पेक्षा अधिक गंभीर राजकीय विचारवंत म्हणून प्रस्थापित केलेले आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानात श्रम आणि श्रमिक याला जेवढी प्रतिष्ठा आहे तेवढी कुठेही नाही. म्हणूनच आजच्या परिस्थितीत देशाला एकात्म, एकसंध आणि मजबूत बनविण्यासाठी बुद्ध विचार महत्वाचा असल्याचा संदेश हे या पुस्तकाचे वेगळेपण आणि विशेष ओळख आहे.

‘व्हाय आय एम नॉट अ हिंदू’ हे १९९६ मध्ये प्रकाशित पुस्तक आहे. सद्यस्थितीत देश-विदेशातल्या अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातून ते अभ्यासले जातेय. या पुस्तकातून दलित बहुजन संस्कृती ही प्रस्थापित वर्गाच्या संस्कृतीपासून कशी वेगळी आहे या आशया भोवती हे पुस्तक फिरणारे आहे. त्यात बहुजनांच्या खानपानाची संस्कृती, त्यांच्या उत्पादन करण्याची संस्कृती, श्रम संस्कृती, त्याबाबत बहुजनांचे विचार, त्यांच्यातले स्त्री-पुरुष संबंध प्रस्थापित वर्गापेक्षा कशी वेगळी आहे याचे वर्णन केलेलं आहे.

त्यांचे तीसरे पुस्तक ‘पोस्ट हिंदू इंडिया’ हे असून त्यात आदिवासी, दलित, ओबीसी, शूद्र या समुदायांच्या ज्ञानाबाबतच्या धारणा काय आहेत, त्यांच्या उत्पादनाची साधने काय आहेत,सिंधू संस्कृती पासून आज पर्यंतच्या त्यांच्या सभ्यतेबाबत सविस्तर मांडणी केलेली आहे.अन्न उत्पादनापासून ते दुध-मांस आधारित या समुदायांची अर्थव्यवस्था याबाबत तपशीलवार मांडणी या पुस्तकात केलेली आहे.
वंचीतांच्या नजरेतून आणि त्यांच्या श्रम संस्कृतीला गौरवान्वित करणारे पर्यायी लेखन कंचा करतात. त्यांनी लिहीलेले मूळ लेखन इंग्रजीत असल्याने असल्याने बुद्धीजीवी वर्गापर्यंत सहज पोचते. म्हणूनच विदेशी विद्यापीठातही ती अभ्यासली जातात. स्थानिक तेलगू भाषेतही ते लिहित असतात. सद्यस्थितीत ते हैदराबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठात Centre for Study of Social Exclusion and Inclusive Policy (CSSEIP) चे संचालक आहेत. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाच्या अभ्यास गटावर ते कार्यरत राहिलेले आहेत. स्वत: पशुपालक ओबीसी समाजात जन्मलेले कांचा इलय्या तेलंगाना राज्याचे रहिवासी आहेत. उस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. भारतीय राजकीय विचारवंत, प्रथितयश लेखक, आणि दलित हक्क कार्यकर्ते म्हणून त्यांची राष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. आयुष्यात अनुभवलेले जीवन त्यांच्या लेखनीतून उधृत होते. ते स्वतःला श्रमिक आणि श्रमण संस्कृतीचे प्रतिनिधी मानतात. कांचा इलय्या यांच्या मते जगात ज्ञान आणि विज्ञानाचे सृजन श्रमिक वर्ग करतो तर ऐतखाऊ वर्ग त्याचा केवळ उपभोग घेत असतो.
त्यांच्या पुस्तकांना हिंदू धर्म विरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजातले वास्तव पुस्तक रूपाने मांडून त्याबाबत समाजाला भानावर आणण्याच्या आणि सामाजिक संवेदना विस्तारित करण्याला धर्म विरोधी म्हणून अभ्यासक्रमातून वगळण्याची शिफारस करणे म्हणजे विश्वची माझे घर आणि वसुधैव कुटुंबकमचा गजर करणा-या दांभिक वृत्तीची बौद्धिक दिवाळखोरी आहे. हे बंदबुद्धीकडे वाटचाल होत असल्याचे लक्षण आणि विचारविहीन युगाकडे घेऊन जाणारे पाउल आहे. साचेबद्ध आणि साचलेपणाचे विचार समाजाला गतिमंद करतात तर स्थिरावलेल्या आणि थिजलेल्या विचाराला आव्हान दिल्याने विचार संघर्षातून कायम ज्ञानाचे सृजन होते. लोकतांत्रिक आणि ज्ञानी समाजात प्रगल्भतेसाठी विरोधी विचाराचाही आदर करायचा असतो. विरोधी विचारातूनच नवा विचार जन्माला येत असतो. असे इलय्या मानतात. जस्टीस चेलमेश्वर आणि हॉल्टेअर यांनी विरोधी विचारांचा सन्मान करण्यासाठी उद्गारलेले वाक्य या अर्थाने महावाक्य ठरतात.
विध्यापिठे/विश्वविद्यालये विविध विचार आणि विचार प्रवाह अभ्यासायला आणि त्यातून नवा विचार जन्माला घालायला स्थापिलेली असतात. मळलेल्या विचारांचे पठन करण्यासाठी आणि बुद्धीला परंपरागत चौकटीत बंदिस्त करून ठेवायला नसतात याचे भान किमान विद्यापीठ स्तरावरील तथाकथित बुद्धीजीवी म्हणवणा-यांना कळायला हवे.

आर एस खनके

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »