Sunday , 16 December 2018
Breaking News
Home » Uncategorized » नारी,

नारी,

नारी,
किडा असतोना,
तो सुध्दा चालतो कुणाचाही आधार न घेता.
बिनकण्याचं गांडूळ सुध्दा जगत असतं स्वतंत्रपणे.
मग तू तर माणूस,
तुला का जगता येऊ नये माणसासारखं?
लहानपण बापाच्या पहा-यात,
तरुणपण पतीच्या आदेशात,
म्हातारपण मुलाच्या आधाराने.
नारी,
तू गांडूळाहून लाचार आहेस काय?
की किड्यामुंग्याहून क्षुद्र?
हाडामासाचा देह तुझा.
दोन हात,
दोन पाय,
दोन डोळे,
दोन कान.
अगदी माझ्याच सारखं………,
तसा तुझ्यात आणि माझ्यात फरक काहीच नाही.
प्रत्येकाला असतं तसं……….,
तुझ्याही छातीच्या बाजूला असणारं धडधडणारं -हुदय आणि थरथरणारं संवेदनशील मन.
तरीही आम्ही आभाळात आणि तू पिंज-यात?,
आम्ही उघड्यावर आणि तू पडद्यात?,
आम्ही दारात आणि तू घरात?,
आम्ही स्वामी आणि तू दासी?,
आम्ही व्याभिचारी आणि तू कोठ्यावर?
ढोल गवार क्षुद्र पशू नारी,
ये सब ताडनके अधिकारी.
या आमच्या आदरणीय संतांचे श्लोकही तुझ्या विरोधात?
आमच्या पुराणातील प्रत्येक पान तुझ्या बलात्काराने रंगलेलं?
आमची प्रत्येक शिवी तुझ्या स्त्रीत्वाची छिद्रे उसवणारी?
आमचा प्रत्येक धर्म तुला गुलाम बनविणारा?
नारी,
तुझा धर्म कोणता?,
तुझे श्लोक कोणते?,
तुझी संस्क्रुती कोणती?
आता तुझा धर्म तुच निर्माण करायला हवा,
तुझे श्लोक तुच रचायला हवेत,
तुझी संस्क्रुतीही तुच घडवायला हवी.
येशू,पैगंबर,बुध्द,नानक,झरुत्राष्ट्र,महावीर आणि ब्रह्मा विष्णू महेश.
मला सांग, यातला आहे का गं कोणी तुझ्या जातीतला?
नाहीना!
मग आता तुझा इतिहास तुच लिहायला घे.
तुच लिही आता तुझे रामायण आणि……,
सितेबरोबर रामालाही अग्निपरिक्षा घ्यायला लाव,
तुच लिही आता तुझे महाभारत आणि……,
धर्मराजासकट पाचही पांडवांना पणाला लाव,
लिही तुच आता कुराण पैगंबर बनून आणि….,
समस्त पुरुषांना बुरखा घालायला लाव,
लिही तुच आता धम्मपद आणि…….,
सिध्दार्थाचा त्याग करुन बोधीव्रुक्षाखाली जाऊन बैस,
लिही तुच आता जीनसुत्र आणि…….,
होऊन जा जैनांची आद्य तिर्थकर,
लिही तुच आता ग्रंथसाहिबा आणि……..,
शिखांची गुरु हो,
आणि लिहुन टाक ते बायबलसुध्दा आणि…..,
देवाची एकमेव लाडकी पुत्री हो.
तुझ्या पायातल्या जोडव्या,
तुझ्या पायातलं पैंजण,
तुझ्या हातातल्या बांगड्या,
तुझ्या गळ्यातलं मंगळसुत्र,
तुझ्या कानातले डूल,
तुझ्या नाकातली नथ आणि……..,
तुझ्या कपाळावरचं कुंकू.
नारी,
ह्याच त्या आम्ही पुरुषांनी तुझ्या अंगावर घातलेल्या श्रुंखला.
कधी सौंदर्याच्या नावाने तर कधी सौभाग्याच्या नावाने.
तोड, नारी तोड ह्या गुलामगीरीच्या श्रुंखला….,
आणि मुक्त होऊन घे झेप स्वातंत्र्याच्या आभाळात.
मात्र झेप घेताना एक कर.
तुझ्यातलं वात्सल्यानं ओथंबणारं मात्रुत्व तेवढं हरऊ देऊ नकोस.
कारण ते फार मौलीक आहे,
अगदी तुझ्या स्वातंत्र्यापेक्षाही,
अगदी तुझ्या स्वातंत्र्यापेक्षाही!
                                     – विवेक मोरे
                              मो. 8451932410
(आजचा बेगडी महिला दिन नष्ट व्हावा व प्रत्येक दिन महिलांचा व्हावा, यासाठी सर्वांना हार्दिक सदिच्छा

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg