Monday , 15 October 2018
Breaking News
Home » Breaking News » पी. व्ही. सिंधू चायना ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यपूर्व फेरीत

पी. व्ही. सिंधू चायना ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यपूर्व फेरीत

फूझॉ (चीन) – चीन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे अन्य बॅडमिंटनपटू अपयशी ठरले असताना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या पी. व्ही. सिंधूने मात्र उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सिंधूने चीनच्या १७ वर्षीय हान यूचा २१-१५, २१-१३ असा सहज पराभव केला.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सिंधूने गाठीशी असलेल्या प्रचंड अनुभवाच्या जोरावर हानवर मात केली. या दोघींमधील हा पहिलाच सामना होता. क्रमवारीत १०५व्या स्थानी असलेल्या हानने सुरुवातीला चांगली टक्कर दिली. पहिल्या गेममध्ये एकवेळ ५-६ अशी स्थिती होती. मात्र, सिंधूने आक्रमक खेळ करत ही आघाडी मोडून काढली व पहिला गेम २१-१५ अशा फरकाने जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासूनच हानला डोके वर काढू दिले नाही. सिंधूने ६-० अशी महत्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर हानला त्यातून सावरता आले नाही. ब्रेकपर्यंत ११-३ अशी स्थिती होती. त्यानंतर हानने चिवट खेळीचे दर्शन घडवत ९-१२ असा थोडाफार फरक भरून काढला. मात्र, सिंधूने लागोपाठ ५ पॉइंट्स जिंकत विजयाच्या दिशेने कूच केली. त्यानंतर २१-१३ अशा फरकाने सिंधूने दुसरा गेम आणि सामनाही जिंकला.
दरम्यान, सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्या पदरी अपयश पडले. सायनाला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर प्रणॉयचा चेक यू लीने पराभव केला. त्यामुळे भारतीयांना केवळ सिंधूकडून आशा उरल्या होत्या. त्यांची सिंधूने निराशा केली नाही.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg