Breaking News
Home » लोक सहभाग » प्रवेश मंदिराच्या चौथ-यावर नाही….समाजमनाच्या उंबरठ्यावर हवा

प्रवेश मंदिराच्या चौथ-यावर नाही….समाजमनाच्या उंबरठ्यावर हवा

स्त्री स्वातंत्र्य ही एक व्यापक संकल्पना आहे. तिला अनेक पैलू आहेत. या स्वातंत्र्याची संकल्पना संक्षिप्त स्वरूपात मांडणे शक्य नसले तरी मानवी जीवन मुल्यांच्या अनुषंगाने या संकल्पनेला शब्दस्वरूप देताना स्त्री स्वातंत्र्य म्हणजे माणूस म्हणून स्वातंत्र्य, समता आणि मूलभूत अधिकार स्त्रीला सहज स्वाभाविकपणे समाजात उपलब्ध असणे म्हणजे स्त्री स्वातंत्र्य म्हणता येईल.
भारतीय सामाजिक इतिहास पाहता आपल्या स्त्रीला सातत्याने समाज व्यवस्थेच्या चौकटीत ठेवण्याचा सामाजिक संस्कार भारतीय समाज मनावर पूर्वापार होत आलेला आहे. पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान व्यवस्थेत या संस्काराला बळ मिळत गेलेले आहे. मातृसत्ताक परंपरेच्या जागेवर पितृसत्ताक समाज व्यवस्था जेंव्हापासून रुजू व्हायला लागली तेंव्हा पासून स्त्रीकडे पुरुषी मानसिकतेतून बघायला आरंभ झाला आणि ती दुय्यम बनत गेली. स्त्री देवतांपासून पुरूष देवतांपर्यंतचा हा प्रवास याचे प्रतिक आहे.
तिच्या स्वातंत्र्याचा इतिहास जेवढा जुना तितकाच स्वातंत्र्याचा आणि मुक्तीचा संघर्षही जुना आहे. पण त्याला गती मिळाली ती यंत्र युगात. आधुनिक काळात सतीची प्रथा बंद करणे, विधवा विवाहास मान्यता, स्त्री शिक्षण यामुळे तिला मुक्त होण्याला दिशा लाभली. स्वातंत्र्योत्तर काळात प्रौढ मतदानाचा अधिकार,संपत्तीत वारसाहक्कने वाटा आणि अलिकडे 73 व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेले निम्मे प्रतिनिधीत्व या प्रमुख बाबी स्त्री स्वातंत्र्याला कायद्याने आधार देणा-या मैलाच्या दगड ठरल्या आहेत.
कायद्यातल्या स्वातंत्र्यापेक्षा समाजमनानं बहाल केलेलं आणि स्वीकारलेलं स्वातंत्र्य दैंनंदिन जगण्याला स्पर्श करणारं आणि जगण्याला पोषक असं असतं. त्याची सुरूवात राहत्या घरातून आणि आपल्या परिवेशातल्या, ज्ञातीतल्या लोकांनी मनस्वी स्वीकारलेल्या व्यापक समजूतदारपणातून होत असते.
मंदिराच्या चौथ-यावर आणि गाभा-यात प्रवेश मिळणे हे स्त्री सन्मानाचे आणि तिला बरोबरीने स्वीकारण्याचे प्रतिक आहे. स्त्री प्रती व्यष्टी आणि समष्टीच्या मनमस्तिष्कात समतेचा भाव निर्माण होणे आणि त्याचा अंगिकार सर्व स्तरावर रोजच्या जगण्यात होणे हे त्याचे फ़लीत आहे.
मागच्या महिन्यात भांदवि च्या कलम 497 मधील तरतुदी रद्दबातल ठरवताना, स्त्री ही पुरुषाची मालमत्ता नाही आणि केरळातील स्त्रीयांच्या मंदीर प्रवेशाला विरोध करता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे स्त्रीयांच्या स्वातंत्र्य आणि व्यक्ती प्रतिष्ठेच्या दृष्टीने मैलाचे दगड ठरले आहेत.
वरील दोन्ही निवाड्याचे समर्थन करणारे जसे आहेत तसे त्याचा विरोध करणारेही हयात आहेत. आपल्या परंपरेची दुहायी देत केरळात निवाड्याला नाकारण्यासाठी होत असलेली आंदोलने या विरोधाची साक्ष आहेत. व्यापक आणि सर्वसमावेशकतेच्या अभावात मानसिकता अडकली की समुदायाची अस्मिता प्रखर होत असते त्याला गोंजारत विरोध उभा केला जातो. पण असा विरोध करताना गतकाळात अशा कितीतरी रूढी आणि परंपरा, ज्यांचे समर्थन केले गेले होते, त्या कशा कालबाह्य झालेल्या आहेत. जिवंतपणी चितेवर जाणारी सती परंपरा आपण गाडलीच ना ? तिचा आज कोण स्त्री अंगिकार करेल ? नाकारलेल्या परंपरा आपण कशा दूर सारल्या आहेत याचे सिंहावलोकन होताना दिसत नाही. अशा प्रसंगी त्याचे स्मरण होण्याची गरज असते. परंतु परंपरेच्या जोखडात मन-मस्तिष्क जखडल्याने मनपटलावर आणि बुद्धीच्या विवेकावर तसा सिंहावलोकनाचा प्रचोदय होत नसल्याने विरोधाला धार येते.
सबरीमला मध्ये प्रजननक्षम स्त्रियांनी आयप्पाचं दर्शन घेऊ नये ही तिथली ‘परंपरा’ आहे आणि त्यात तुम्ही ढवळाढवळ करून वातावरण का बिघडवता.? इतर मंदिरं नाहीयेत का तुम्हाला? किंवा तुम्ही तर नास्तिक, तुम्हाला काय फरक पडतो..! मंदिरात सर्व महिलांना दर्शन घेऊ द्या, याबाबत आग्रही का? असे युक्तिवाद वारंवार केले जातात.. पण इथे प्रश्न श्रद्धा-अंधश्रद्धेचा किंवा परंपरा असा दोन्हींचा नाहीच आहे.. प्रश्न ‘डावलले जाण्याचा” आहे. . . तेथे प्रश्न समानतेचा आहे… येथे प्रश्न सामाजिक न्यायाचा आहे.. प्रश्न भेदाभेद करण्याचा आहे… लैंगिक मुद्द्यावर केल्या जाणाऱ्या भेदभावाचा आहे.. विटाळासारख्या भ्रामक समजूतींना धडा शिकवण्याचा आहे…प्रश्न विटाळाचं निमित्त साधून स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या मानसिकतेला लगाम घालण्याचा आहे…प्रश्न स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा आहे… प्रश्न धर्माआडून चालवलेल्या भंपकगिरीचा आहे..
पुरातन काळात लोकांचं स्त्रियांच्या मासिक पाळीबाबत अज्ञान होतं, आज शहरी भागातून ते दूर फ़ेकलं गेलंय…. पण आज या विज्ञानयुगातही आपण ते केवळ परंपरेच्या नावाखाली पाळावं, हा दुराग्रहच म्हणावा लागेल.असा आग्रह काळाच्या कसोटीवर टिकणारा नाही.
मंदिरात स्त्रीला प्रवेश नाकारत, “यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते तत्र देवता” आणि ‘दुर्गेचं रूप’, ‘लक्ष्मीचं रूप’ असा घोष शुद्ध दांभिकपणा आहे. स्त्री प्रतिष्ठा ग्रांथांमधून बाहेर पडून रोजच्या जगण्यात आली पाहिजे. वागण्या बोलण्यात आणि रोजच्या व्यवहारात आली पाहिजे. तिचा सन्मानपूर्वक प्रवेश आमच्या समाजमनाच्या उंबरठ्यावर होणे अधिक महत्वाचं आहे. चौथ-यावरचा प्रवेश प्रतिकात्मक आहे. तो सकल मुक्तीसाठी आवश्यक आहेच पण घरा-घरात लिंगभेद न करता तिला माणूस म्हणून गौरव प्राप्त होण्यात खरं स्वातंत्र्य आणि व्यक्ती प्रतिष्ठा आहे. हीच प्रकाशमान दिपावली आहे.

आर एस खनके

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »