Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » लोक सहभाग » लोक मत » फुले – सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?

फुले – सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?

“विद्ये विना मति गेली,
मती विना नीती गेली
निती विना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले
एवढे अनर्थ एका अविद्येने केले”

भारतीय स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात विविध जबाबदा-या अतिशय समर्थपणे पेलत आहेत. पूर्वी मुलगी शाळेत गेली तर धर्म बुडायचा म्हणून महिलांना चूल आणी मुल या चाकोरीत अडकवून ठेवले होते. त्या सर्वच महिलांना या चाकोरीतून पहिल्यांदा बाहेर काढून त्यांच्या शैक्षणिक विकासाची मुर्हूर्तमेढ ज्ञानज्योती सावित्रीमाई फुलेंनी रोवली मात्र त्यांची ओळख आजही फक्त तात्यासाहेब महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पत्नी एवढीच सांगितले जाते. पण त्या भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, एक प्रतिभावंत शिक्षणतज्ञ, नामवंत कवयित्री, कुशल संघटक, प्रभावी वक्त्या, ज्ञानज्योती, स्त्री मुक्तीच्या जनक होत्या पण आज अनेक उच्च पदे भूषवित असलेल्या सुसंस्कृत, सुक्षिशित स्त्रियांना याची कल्पना देखील नाही व जाणून घेण्याची इच्छा बहुतांश महिलांना झाली आहे. सावित्रीमाई फुलेंनी भारतात शिक्षणाचे दरवाजे उघडल्या मुळेच आज आपण या विविध पदावर आहोत हे अनेक महिलांना माहित नसावं? ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे असे खेदाने म्हणावे लागते. आजच्या सुसंस्कृत स्त्रीला जर विचाराले की, तुझा आदर्श कोण आहे? तर ती म्हणते” संतोषीमाता “ती पुढे असे हि म्हणते की संतोषीमातेचे 16 उपवास केले तर चांगळा नवरा मिळतो असे म्हणतात पण उपवास केल्याने किती किती महिलांना चांगला नवरा मिळाला हे अजून तरी समजले नाही पण ज्ञानज्योती सावित्रीमाईँ फुलेंनी दिलेल्या मार्गाने जाऊन आपल्या मुलां-मुलींना” डॉक्टर, इंजिनीअर, वकिल, प्रशासकिय अधिकारी, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री , न्यायमूर्ती, ऑफिसर बनविले तर बघा किती किती नव-याची लाईन त्यांच्या मागे लागते कि नाही ?.
सावित्रीमाई फुलेंमुळे आज महिलांची देशातच नाही तर जगात प्रगती होत आहे तरीही आजच्या सुशिक्षित महिलां सत्यवान सावित्रीच्या वडाला फे-या मारुन जन्माजन्मी एकच पती मिळावा असा बालहटट् वडाच्या झाडाला घालते. आज आपण विज्ञान युगात वावरत असताना आपल्या अज्ञाणाचे प्रदर्शन करुन आपण कोणाकडे कशाची अपेक्षा करावी याचे कारणमिमांसा करणे गरजेचे आहे. जर आजच्या स्त्री ने ज्ञानज्योती माईंचा आदर्श घेतला तर या देशाचा सर्वागीन विकास व्हायला अजिबात वेळ लागणार नाही.
सावित्रिमाई फुले यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही म्हणून फुले दाम्पत्यांनी शैक्षणिक संस्था काढल्या. मात्र मागील आठवड्यात खाजगी कंपन्यांना शाळा सुरु करण्याचे विधेयक नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान सभेत मंजूर झाले ज्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हापरिषदेतील शाळांना टाळे ठोकाव लागेल. तसेच दुसऱ्या बाजुने उच्च शिक्षणासाठी असलेला निधी देखील कमी करून बहुजन समाजातील ओबीसी, एस.सी, एस.टी. मायनोरीटी, एन.टी अशा प्रवर्गातील अठरापगड जातीतील विखुरलेल्या विद्याथ्यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतून सुतारकाम, गवंडीकाम, वेल्डिंग, वाहनदुरुस्ती, रंगकाम, साईट सुपरवायझर अशी कामे करायची व उच्चवर्णीय धनधांडग्यानी उच्चशिक्षण घेऊन विद्यापीठे, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, इत्यादी वरिष्ठ पदावर काम करायचे हि सुद्धा एक नवीन जातीव्यवस्थाच निर्माण होते कि काय? या कडे देखील डोळसपणे लक्ष देण्याची गरज आहे असे मला वाटते.
भारतीय स्त्री अजुनही किती गुलामगीरीत, अंधश्रध्येत जीवन जगत आहे. हे आपण रोजच पहातो. महिलांवरील अन्याय – अत्याचाराच्या हजारो घटना वृत्तपत्रात रोजच वाचतो. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला राज्यघटना अर्पण केली भारतीय राज्य घटनेने सर्वाना समान अधिकार दिलेले आहेत. गरीब वा श्रीमंत असा कोणता ही भेदभाव न ठेवता एक व्यक्ती एक मत ही संकल्पना त्यांनी दिलेली आहे पण हा अधिकार केवळ मतदानाच्या अधिकारासाठीच वापरला जातो हि एक खंत आहे.
सावित्रीमाई फुलेंनी अंगावर शेण, दगड, गोटे झेलून महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले ते काय ते काय फक्त नवऱ्याची सेवा करणे, गोड धोड पदार्थ बनवायला शिकणे, एकत्र कुटुंबात फुट पडून कोर्ट कचेऱ्यांच्या माध्यमातून घटस्फोट घेणे, ढोंगी बुवा – बापूंच्या सेवा करणे, या साठी का? याचा हि असे प्रकार करणाऱ्या महिलांनी गांभीर्याने विचार करावा म्हणून म्हणावे लागते कि “सरकारी हुदद्यावर मुलगी बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?”
सावित्रीमाईंचा जन्म :- क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगांव येथील ता. खंडाळा, जि. सातारा येथील खंडोबा सिदूजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई यांना कन्यारत्नाच्या रुपाने झाला. खंडोजी पाटील हे व्यवसायाने फुलमाळी व त्यांचे इनामदार घराणे होते. माई ह्या त्यांचे पहिले अपत्य होत्या माईंना सिंदूजी, सखाराम, आणि श्रीपती हे तीन लहान भावंडे होती.
मंगलपरिणय :- फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) मध्ये नायगांवला तात्यासाहेब महात्मा ज्योतीबा फुले व झानज्योती सावित्रीमाई फुले यांचा मंगलपरिणय झाला. त्या वेळी माईंचे वय अवघे नऊ वर्ष तर तात्यांचे वय तेरा वर्षाचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
पहिल्या मुख्याध्यापिका :- तात्यासाहेब फुले हे शेतात काम करता करता फावल्या वेळात आंब्याच्या झाडाखाली त्यांची विधवा मावस बहीण सगुणाबाई क्षिरसागार व सावित्रीमाईंना शिक्षणाचे धडे देत असत. त्या नंतर मिसेस मिचेल यांनी सगुणाबाई व माईंची परीक्षा त्यांच्या नॉर्मल स्कुळमध्ये 1846-1847 मध्ये तिस-या इयत्तेत प्रवेश दिला ह्या दोघीनी ही इ.स.1846 -47 मध्ये चौथे वर्ष पुर्ण केल्यावर त्यांना प्रशिक्षीत शिक्षिका व मुख्याध्यापक बनवले. पुराभिलेखागारातील मुंबई इलाख्याच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या १९५२-५३ च्या अहवालात महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंची शिक्षिका म्हणून नोंद केल्याचे आढळते

“पिता रक्षती कौमर्य
भर्ता रक्षती यौवने
रक्षन्ती स्थाविरे पुत्र :
न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती”

या पुर्वी भारतीय स्त्रीयांना मनुस्मृतीने चुल आणि मुल अशा मर्यादित विचारांत अडकवुन ठेवले होते हे तात्यासाहेबाच्या चानाक्ष बुध्दीला पटत नव्हते.
मुलींची प्रथम शाळा व वाचनालय :- भारतात पहिली मुलींची शाळा व वाचनालय स्थापना करण्याचे श्रेय सावितीमाई फुलेंना जाते असे एका सरकारी अहवालात म्हटले आहे. अहमदनगरच्या मिशनरी मिस फरार यांच्या महाविद्यालयातून सावित्रीमाईंनी शिक्षण घेतल्याची माहिती गार्डियन ने असल्याचे प्रो. हरी नरके यांच्या लेखात समजते. भारतात प्रथम मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात प्रथम शिक्षणाची मुर्हुर्तमेढ रोवली त्यात 1) अन्नपुर्णा जोशी 2) सुमती मोकाशी 3) दुर्गा भागवत 4) माधवी थत्ते 5) सोनु पवार 6) जनी कार्डीले ह्या 4 ब्राम्हण, 1 मराठा व 1 धनगर जातीच्या मुलीना प्रवेश दिला त्यातील मुक्ता साळवे ही अकरा वर्षाची चिमुरडी आपल्या निबंधात लिहते की, “लाडु खाऊन ब्राम्हण लोक म्हणतात वेद आमचे मात्र आम्हाला धर्मग्रंथ वाचायची परवानगी नसेल तर आमचा धर्म आहे तरी कोणता”?
असा प्रश्न इ.स. 1885 मध्ये विचारते. त्याचा हा निबंध 1 मार्च 1885 च्या” ज्ञानोदय “या पत्राने छापला. मुक्ता साळवे पुढे लिहितात की , “अहो, दारिद्रयाने दु:खाने पिडीत महार मांग लोक हो तुम्ही रोगी आहात तुमच्या बुध्दीला ज्ञानरुपी औषधाचा डोस द्या म्हणजे तुम्ही चांगळे ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कु-कल्पना जाऊन तुम्ही नितीमान व्हाल “ शुद्रातीशुद्रांना शिक्षणाची ज्ञानगंगा सुरु केली तेव्हा प्रवेश देताना कोणाचीही जात, धर्म, पंथ, पहिला नाही. फातीमा बेग सारख्या कार्यकर्त्या हि त्यांच्यात शाळेतून घडल्या.
आजही सावित्रीमाईच्या विद्यार्थिनीची नोंद केंब्रिज, हावर्ड, ऑक्सफर्ड विद्यापीठात गाजत आहे. आद्य स्रीवादी लेखिका, विचारवंत ताराबाई शिंदे या कुणबी समाजातील विद्यार्थीनीने 1882 मध्ये “स्त्री- पुरुष तुलना” हा जगातील क्रांतिकारी ग्रंथ लिहुन पुरुषांवर ताशेरे ओढले. हा ग्रंथ केंब्रिज विद्यापीठा च्या डॉ. रोझलिंड ओहेन्लन यांनी इंग्रजीत भाषांतरीत केलेला ग्रंथ ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसने प्रकाशित केल्यानंतर अनेक पाश्च्यात्त्य संशोधकांचे व भारतीय अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले. डॉ. रामचंद्र गुहा यांनी त्यांचा समावेश आधुनिक भारताच्या प्रमुख शिल्पकारात केला आहे.
भारतातील पहिल्या महिला संपादक तान्हुबाई बिर्जे ह्या कुणबी समाजातील महिलेने 1906- 1912 साली “दिनबंधु” ह्या अंकाची यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली.
सावित्रीबाई रोडे या रामोशी रामोशी समाजातील महिलेने 1915 ला “आखिल भारतीय महिला समाजाची” धुरा सांभाळली. ही मुलगी धोंडीबा रोडे या महात्मा फुलेंच्या मारेक-याची सुन होती.
लक्ष्मीबाई नायडु या विद्यार्थीनीने 1925 साली पहिली “भारतीय महिला परिषद” भरविली त्यात 500 महिला सहभागी झाल्या होत्या.
सावित्रीमाईंनी 15 मे 1848 ला अस्पृश्यांच्या मुलांसाठी प्रथम शाळा काढुन 1 मे 1849 ला पुणे येथील उस्माणशेख वाड्यात पौढासाठी शाळा काढली त्या शैक्षणिक प्रचार आणी प्रसार करतात त्यांच्या या कृत्यामुळे सनातन्यांन्या कडुन माईंना नेहमीच अंगावर शेण दगड झेलुन घाणेरड्या शिव्या ऐकाव्या लागत म्हणून माई नेहमी सोबत दोन लुगडे ठेवत असत. इतका त्रास देऊन ही माई आपल्या हातातील शैक्षणिक कार्य सोडत नाही हे लक्षात आल्यावर सनातन्यांनी त्यांच्या कडे 1) धोंडीराम कुंभार व 2) रामोशी रोडे नावाचे भाडोत्री मारेकरी पाठवले मात्र त्याचा परिणाम उलट झाला. त्यातील धोंडीराम कुंभार हा तात्यासाहेबांच्या प्रेरणेने पंडित झाला त्याचे ” वेदाचार” हे पुस्तक फार गाजले तर रामोशी रोडे हा “भक्षकच” तात्याचा रक्षक झाला.
अशा प्रकारे शुद्र – अतिशिद्राना शिक्षण देत असल्याच्या कारणाने तात्यासाहेबांना व माईंना इ.स. 1849 ला गृहत्याग करावा लागला तसेच 14 जानेवारी 1852 मध्ये महिला सेवा मंडळा तर्फे पहिला तिळगुळ सभारंभ साजरा केला.तर 16 नोव्हेंबर 1852 ला मेजर कँडी च्या अध्यक्षते खाली विश्रामबाग वाड्यात फुले दाम्पत्याचा इंग्रज अधिका-या कडुन शैक्षणीक कार्यात उल्लेखणीय कार्य केल्या प्रित्यर्थ शाल आणी पुष्प देऊन गौरव केला गेला. इ. स. 1848 – 1852 या काळात पुणे, सातारा, नायगांव, नगर, ओतुर, सासवड, भिंगार , मुंढवे , शिरुर, शिरवळ, हडपसर, तळेगांव इत्यादी 18 ठिकाणी शाळा तर 1 डिसेंबर 1854 ला अध्यापक शाळा काढली १२ फेब्रुवारी १८५३ रोजी पुण्यातील विश्रामबागवाडा चौकात ३००० हून अधिक लोक आल्याची नोंद मिळते. प्रथम क्रमांकांत आलेली मुलगी अस्खलित इंग्रजी बोलली आणि तिने खाऊ, कपडे, खेळणी या ऐवजी ग्रंथालयाची मागणी केली तसेच गळतीच्या प्रश्नांवर उपाय म्हणून गरीब मुला-मुलीना दरमहा पगार दिला जात अशी नोंद शासकीय अहवालात असल्याचे समजते. शाळेतील सर्व मुला-मुलीना जीवनात पुढे स्वतंत्र व स्वावलंबी जीवन जगता यावे या साठी उद्योगाचे शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा द्रष्टेपणा त्यांच्या कडे होता. “Industrial Development should be attached to the school in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves and independently”
आजच्या काळात त्यांचा हा द्रष्टेपणा पाहून थक्क व्हायला होते, निरक्षर पालक हा शिक्षणातला मोठा अडथला असतो हे ओळखून स्वतच्या घरात सावित्रीमाईनी १८५४- ५५ साली कामगारांच्या व शेतक-यांसाठी रात्रशाळा सुरु केल्याची माहिती तात्यासाहेब महात्मा फुलेंनी उल्लेख केल्याचे दिल्याचे कळते. प्रार्थमिक शिक्षण हे सक्तीचे मोफत व सार्वत्रिक करावे अशी देशातील व आशिया खंडातील पहिली मागणी १९ ऑक्टोबर १८८२ रोजी हंटर शिक्षण आयोगाकडे महात्मा फ़ुलेनी केली होती.
पुर्वीच्या काळी अतिशय लहाण वयातच लग्न होत असत तसेच दोघांच्या वयातील अंतरात देखील कमालीची तफावत असल्यामुळे बिजवर म्हाता-यांशी कोवळ्या मुलींशी विवाह होत असे. तसेच पुर्नविवाहास देखील बंदी असल्याने साहजिकच तारुण्यात वाकडे पाऊल पडत असल्यामुळे अनेक बालविधवा गर्भवती राहत असत एका निकर्षावरुन असे आढळले आहे की, तिशीच्या आतील 21 लाख महिला तर चार वर्षाच्या 13878 विधवा होत्या त्या मुळे अशा प्रसंगात सापडलेल्या विधवांना एकतर आत्महत्या नाही तर भ्रृणहत्या कराव्या लागत असत.
तात्यांच्या गोवंडे नावाच्या ब्राम्हण मित्राकडे काशीबाई नावाची महिला धुणी भांड्याचे काम करणा-या महिलेला एका भटाने फसवल्याने ती गर्भवती राहिल्याने भटजींचा समाज त्यांना जगू देणार नाही या भितीने त्या कोवल्या बालकाच्या पोटात सुरी खुपसुन त्याला ठार मारले व त्या मुळे त्या महिलेला अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा झाली अशी शिक्षा झालेली ती पहिलीच महिला होती. मात्र ज्या भटाने हा अत्याचार केला तो भटजी मोकाट फिरत होता हा अन्याय आहे म्हणुन माईंनी पुढाकार घेऊन तेथील प्रत्येक तिर्थस्थळांवर पोस्टर लावुन अशा प्रकारचा अन्याय झालेल्या महिलासाठी आपल्या राहत्या घरी म्हणजे 397 गंजपेठ पुणे येथे 28 जानेवारी 1863 रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापणा केली. त्या वेळी 35 ब्राम्हण विधवांनी त्याचा लाभ घेतला. “माईना आई होता आले नाही मात्र हजारों नातवंडांची दाई म्हणुन त्यानी उत्कृष्ठरित्या जबाबदारी पेलली”
कवितासंग्रह
1854 साली माईंचा काव्यफुले नावाचा कविता संग्रह प्रकाशीत झाला त्यात 41 पैकी 12 कविता मोडी लिपीत आहेत . आधुनिक कवितेचे जनक म्हणुन ज्या केशवसुतांना ओळखतात त्यांचा जन्म 1866 सालचा जर त्यांच्या जन्माच्या पुर्वीपासुन माईंचा कवितासंग्रह आहे तर आधुनिक कवितेचे जनक कोण ? हे शोधण्या साठी इतिहासाचे पुन:उत्खनन करायची गरज आहे ? अधश्रध्देवर कविता लिहिताना सावित्रीमाई लिहितात.

“नवस करिती! बकरु मारीन
बाळ जन्मी! धेंडे मुल देती
नवसा पावती! लग्न का करती! नर – नारी!!

(नवस करून दगडधोंडे जर मुले देत असतील तर स्त्री – पुरुषांना लग्न करण्याची
गरजच काय आहे?)
पिण्याच्या पाण्यासाठी अस्पृश्यांना किती भयानक संघर्ष करावा लागतो हे लक्षात येताच तात्यांनी आपल्या घरातील हौद 1868 साली अस्पृश्यासाठी खुला केला. 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची समाजाची स्थापणा करुन 25 डिसेंबर 1873 ला बिनहुंड्याचा व बिनभटाचा मंगलपरिणय केला. 1873 मध्ये अहमदनगरला पुर आल्याचे समजताच माईंनी 325 रुपये देणगी दिली व त्या वेळी सोन्याचा भाव 15 रुपये तोले असा होता.
इ.स.1874 साली काशीबाई नावाची दुसरी महिला आत्महत्या करायला गेल्याचे तात्यांना समजतात त्यांनी तिला स्वत:च्या घरी आणले.तसेच तिच्या बाळंतपणाची सर्व काळजी माईंनी स्वत:च्या मुलीप्रमाणे घेतली. व तिचा मुलाला आपलाच मुलगा समजुन दत्तक घेऊन त्याचे नांव यशवंत ठेवले. नावाप्रमाणे त्याला डॉक्टर बनविले व आपले व्याही ग्यानबा ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी पहिला आंतरजातीय विवाह 4 फेब्रुवारी 1879 साली सत्यशोधक पध्दतीने लावला.
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात :- इ.स. 1876 मध्ये भीषण दुष्काळ पडला असताना माणसे तडका – फडकी मरत होती त्यावेळी माईंनी आपल्या मैत्रीनींच्या सहकार्याने रुपये 2000 वर्गणी जमा करुन 1877 ला पुणे जिल्हातील धनकवडी येथे “व्हिक्टोरिया बालकाश्रम उभारले व तेथे अन्नछत्रे उभारुन दररोज 1000 मुलांना जेवणाची व इतर मदत केली.
नाभिकांचा ऐतिहासिक संप :- त्यावेळी विधवा महिलांचे केशवफन करून त्यांना विद्रुप केले जाई. त्यामुळे नारायण बंधु लोखंडे यांनी आपल्या दिनबंधु या वृत्तपत्रात 23 मार्च 1890ला आवाहन करुन न्हाव्यांचा ऐतिहासिक संप घडवुन आणला. त्या वेळी केस कापण्यासाठी 50 रुपये घेतले जात असत तरी देखील 500 नाभिक या मध्ये सहभागी झाले होते. ह्या बातमीची दखल लंडन टाईम्स ने घेऊन त्यांना अभिनंदन पर पत्र पाठवले.
तात्याचे अनंतात विलिन :- 28 नोव्हेंबर 1890 रोजी तात्यासाहेब यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी तात्यांच वय 63 वर्षे 7 महिने 17 दिवस होते. नेहमीच त्यांच्या कार्याला विरोध करणारे तात्यांचे नातेवाईक महादजी व बालाजी फुले यांनी संपत्तीच्या लोभापायी दत्तकपुत्र यशवंत यांस विरोध केला त्या वेळी माईंनी स्वत: हातात टिटवे घेऊन तात्यांच्या शवास अग्नी दिला. तात्यासाहेंबांची इच्छा होती की त्यांना मिठात घालुन पुरावे व त्या करिता त्यांनी अगोदरच तसा खडडा् ही खोदुन ठेवला होता परंतु पुणे महानगर पालिकेने परवानगी नाकारल्याने त्यांना अग्नी द्यावा लागला. त्या नंतर इ.स. 1890 ते 1897 पर्यंत तात्यांच्या कार्याची धुरा सांभाळली. इ.स. 1893 मध्ये सासवड येथील सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्ष होत्या.
प्लेगची साथ :- इ.स. 1897 पुणे व परिसरात ला प्लेगची साथ पसरल्याने इंग्रज सरकार कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नाही हे लक्षात आल्यावर माईंनी ग्यानबा ससाणे यांच्या धनकवाडी – घोरपडी येथील मोकळ्या जागेत प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या रुग्णांकरिता हॉस्पीटल काढुन डॉ. यशवंत ला नगरहुन रजा काढुन बोलवले व रुग्णाची सेवा करावला सांगीतले.
मुंढवा येथील प्लेगपिडित रुग्ण पांडुरंग बाबाजी गायकवाड या बौध्द वस्तीतील मुलाला पाठीवर घेऊन डॉ. यशवंत कडे घेऊन जात असताना सावित्रीमाई फुलेंना प्लेगचा संसर्ग झाल्याने 10 मार्च 1897 रोजी रात्रौ 9.00 वाजता वयाच्या 66 व्या त्यांची प्राणज्योत मालवली.मृत्युसमयी माईंचे वय 66 वर्षे 2 महिने 7 दिवस होते.
महात्मा फुलेंचे सहकारी ग्यानबा कृष्णा ससाणे यांची मुलगी महात्मा फुलेंनी दत्तक घेतलेल्या डॉ. यशवंतची पहिली बायको अपघातात पुरात वाहून गेली म्हणून डॉ. यशवंत ने दुसरे लग्न केले. माईंच्या सुनेला घरात खायला नसल्याने त्यांच्या सुनेने तात्यासाहेबांची पुस्तके, भांडी, घर, शंभर शंभर रुपयाला विकुले. माईंची सुन व नातवंडे दोघे ही घर सोडुन फुटपाथवर राहिले. यशवंतची बायको 1833 ला पुण्याच्या रामेश्वर मंदिराच्या फुटपाथवर मयत झाल्याने नगरपालिकेने बेवारस म्हणुन त्यांचा विधी केला.
महात्मा फुलेंच्या सुनेला एक मुलगी झाली. ह्या महात्मा फुलेंच्या नातीचे लग्न हुले सोबत झाले त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती त्यांचे हि निधन झाले. म्हणजे महात्मा फुलेंचे पणती व पणतू व डॉ. यशवंतचे नात आणि नातू हे सुद्धा आत्ता ह्यात नाहीत. महात्मा फुल्यांची सून म्हणंत होत्या की, आमच्या साठी माईंनी व तात्यांनी काय केले आहे फक्त एक तांब्या आठवण म्हणुन आहे. तात्यासाहेबांनी त्यांच्या नंतरच्या पिढीसाठी गडगंज संपत्ती कमावली नाही, हे जरी खरे असले तरी तुमच्या – आमच्या सारख्या करोडो पिढ्यांना आपल्या न्याय हक्काच्या स्वातंत्र्याची जाणीव करुन दिली आहे
महाराष्ट्र शासनाने सावित्रीमाईंचा “काव्यफुले“ हा कवितासंग्रह 1934 ला तर बावनकाशी सुबोध रत्नाकर हा 1982 ला प्रकाशित केले. तसेच 10 मार्च 1998 ला भारतीय पोस्टचा तिकिट काढुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. सावित्रीमाई फुलेंनी शैक्षणिक कार्यात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन त्यांना भारत सरकारने त्यांना “भारतरत्न” या सर्वोच्य पुरस्काराने सन्मानित करावे आणि हीच त्यांच्या भरीव शैक्षणिक कार्याला उचित अभिवादन ठरेल.
भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, एक प्रतिभावंत शिक्षणतज्ञ, नामवंत कवयित्री, कुशल व उत्तम संघटक, प्रभावी वक्त्या, भारतीय स्त्री मुक्तीच्या प्रणेत्या,
झानज्योती सावित्रीमाई फूले यांच्या १८७ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मुर्तीना विनम्र अभिवादन

आयु : रविंद्र थोरात (पत्रकार)
मो.९८१९८७३६०
Email :- thoratr25@gmail.com

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg