Breaking News
Home » विश्लेषण » बुद्धीझम व पालीचे पहिले आधुनिक भारतीय विद्वान-धम्मानंद कोसंबी-

बुद्धीझम व पालीचे पहिले आधुनिक भारतीय विद्वान-धम्मानंद कोसंबी-

 

त्यांचा जन्म गोव्यात झाला. त्यांना पाली भाषा शिकायची होती. भगवान बुद्धाला भेटायचं होतं. लहान वयात लग्न झालं. पहिल्या मुलीचा जन्म झाला आणि ते घरातून पळाले.

ज्ञानाच्या-बुद्धाच्या,पाली भाषेच्या शोधात.

वाराणसीला जाऊन हालअपेष्ठा सोशित गंगेच्या घाटावर राहून धर्मशाळेत जेवत पंडीतांकडून संस्कृत शिकले.

त्यावेळी संपुर्ण भारतात पाली शिकवणारा एकही विद्वान नव्हता. केवळ त्यासाठी ते नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेशला गेले. तिथल्या धर्मगुरूंकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

ते श्रामनेर बनले. पुढे बौद्ध भिक्कू बनले. त्यानंतर आचार्य, स्थविर आणि महास्थविर बनले. ते बुद्धीझम आणि पालीचे पहिले आधुनिक भारतीय विद्वान ठरले. उमेदीच्या वयातली अनेक वर्षे त्यांनी बुद्धाच्या आणि पालीच्या शिक्षणात घालवली. आयुष्यातली ५० वर्षे त्यांनी बुद्धीझमला वाहिली.

लुंबिनीवनात ज्या ठिकाणी तथागतांचा जन्म झाला, तिथला सम्राट अशोकाने लावलेला शिलालेख वाचताना ते घळाघळा रडले. संपुर्ण बुद्धमय झाले. बुद्धगया, सारनाथ, कुशीनगरला रानावनात राहून त्यांनी बुद्धीझमची साधना केली.

त्यांच्या बौद्ध गुरूंनी त्यांना नाव दिले धम्मानंद. ते मराठी, कोकणी, पाली, अर्धमागधी, संस्कृत, इंग्रजी, रशियन अशा अनेक भाषांचे तज्ज्ञ होते.
आचार्य धर्मानंद कोसंबी, जन्म ९ आक्टोबर १८७६, निधन- २४ जून १९४७.

ते कलकत्याच्या नॅशनल कॉंलेजात पाली व बुद्धीझमचे पहिले भारतीय प्राध्यापक बनले. कलकत्ता आणि मुंबई विद्यापीठांमध्ये त्यांनी पाली विभाग सुरू करायला लावले. त्याकामात त्यांना ख्यातनाम विद्वान सर रा.गो. भांडारकर यांची खूप मदत झाली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना पाली आणि बुद्धीझम शिकवला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी कमी पगारावर नियुक्ती स्विकारून पालीचे विद्यार्थी घडवले.

मूळ पाली धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करून पहिले बुद्ध चरित्र त्यांनी लिहिले. त्यांनी आपलं संपुर्ण आयुष्य पाली आणि बुद्धविचारांच्य संशोधनाला वाहिलं.
बड्योद्याला महाराजा सयाजीरावांनी त्यांची पालीसाठी नियुक्ती केली. त्यांनी धम्मावर अनेक ग्रंथ लिहिले. गुजरात विद्यापीठात त्यांनी काम केले.

त्यांच्या व्यासंगाचा आणि ग्रंथांचा विचार करून अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठाने त्यांना अनेकवार निमंत्रित केले. तिथे त्यांनी अनेक वर्षे बौद्ध ग्रंथांवर लेखन-संशोधन केले. दरमहा २५० रूपये पगाराची प्राध्यापकाची सन्मानाची नोकरी सोडून अवघ्या ५० रूपये मानधनावर हा माणूस पाली व बौद्धविचारांचा प्रचार-प्रसार करीत राहिला.

बुद्धाच्या शोधात आयुष्य घालवणार्‍या या विद्वानाने आधुनिक भारतातला पहिला बुद्धविहार मुंबईत उभा केला. या बहुजन विहाराने पुढचा रस्ता घडवला. पी.लक्ष्मीनरसू, अनागरिक धम्मपाल यांचे ते सहकारी. सयाजीरावांना पाली साहित्याची त्यांनी गोडी लावली.

मराठीतले पहिलेवहिले सगळे बौद्ध साहित्य आचार्य धम्मानंद, सर भांडारकर आणि महाराजा सयाजीराव या तिघांच्या प्रयत्नातून तयार झाले. त्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला पालीची गोडी लावली. पुढे या कार्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे, चलो बुद्ध की ओर असा नारा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे स्नेही आणि सहकारी होते.

जागतिक किर्तीचे इतिहासकार, गणिती आणि शास्त्रज्ञ दामोदर तथा डी.डी.कोसंबी हे त्यांचे पुत्र होत.

-प्रा.हरी नरके, १५ सप्टेंबर, २०१८

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »