Breaking News
Home » Breaking News » बॅनरबद्दल बसपचे कडक धोरण
बॅनरबद्दल बसपचे कडक धोरण

बॅनरबद्दल बसपचे कडक धोरण

लखनौ- आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन बसपने आपल्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकांसंदर्भातील प्रचारासंदर्भात काही नियम आखून दिले आहेत. बॅनरवर पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या फोटोबरोबर कोणत्याही नेत्याचा किंवा कार्यकर्त्याचा फोटो छापला तर संबंधित व्यक्तीची पक्षामधून हकालपट्टी केली जाईल असा नवा नियम काढण्यात आला आहे.

बसपचे आमदार आणि पक्षाने स्थापन केलेल्या मंडळाचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी या नियमांची माहिती लखनौ येथील बैठकीमध्ये दिली आहे. पक्षाच्या जुन्या नेत्यांना बॅनरबद्दल पक्षाचे धोरण ठाऊक आहे. मात्र निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी पक्षातील नवीन नेते आणि कार्यकर्ते अति उत्साहामध्ये चुकीच्या पद्धतीने पक्षाची जाहिरात करतात. अनेकदा बॅनरवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते महापुरुषांच्या तसेच मायावती यांच्या फोटोपेक्षा स्वत:चा फोटो मोठ्या आकाराचा छापतात. अनेकदा यावरुन पक्षाची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे पक्षाने असले प्रकार थांबवण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेत नियमावली जारी केली असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले आहे.

कोणतेही बॅनर छापण्याआधी ते मंडळ अध्यक्षांना दाखवून त्यांच्याकडून परवाणगी घेणे बंधनकारक असणार आहे अशी माहितीही आंबेडकर यांनी दिली. बॅनरवर मायावतींच्या फोटो छापल्यास त्याबरोबर कांशीराम यांचा फोटो आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह म्हणजेच हत्तीचा फोटो छापला जावा असेही या नियमांमध्ये सांगण्यात आले आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »