Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » लोक सहभाग » लोक मत » भंडारा लोकसभा पोटनिवडणूक : आंबेडकरी राजकीय पक्ष आणि वस्तुस्थिती

भंडारा लोकसभा पोटनिवडणूक : आंबेडकरी राजकीय पक्ष आणि वस्तुस्थिती

अघोषित आणीबाणीचा सामना करित असलेल्या परिस्थितीत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुका या २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मिनी आवृत्ती म्हणून पाहिल्या जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीला राष्ट्रीय पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पालघर आणि भंडारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूककडेही त्याच अनुषंगाने पाहिले जात आहे.  परंतु त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत एका अत्यंत महत्वपूर्ण ऐतिहासिक निवडणुकीतील पराभवाचे स्मरण करून देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९५२  च्या निवडणुकीत भंडारा लोकसभा मतदारसंघातील पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी म्हणून या निवडणुकीत  आवाहन करण्यात आले  आहे.  अर्थात हे आवाहन सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात असणारे हे आवाहन निश्चितपणे आंबेडकरी विचारांच्या मतदारांना केले जात आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही. भंडारा जिल्हा हा उच्च शिक्षित आंबेडकरी अनुयायांचा आणि आंबेडकरी विचारांशी वैचारिक बांधिलकी मानणारा जिल्हा आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजपला ही जागा मिळाली, तर बऱ्याच वेळा या मतदारसंघातून राष्ट्रवादीला ही जागा मिळाली. या मतदारसंघातील एकूण मतदान आणि विजयी उमेदवार पाहता आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षाला आजपर्यंत विजय मिळालेला नाही. तरीही या पोटनिवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा काढण्याचे आवाहन,  भारिप-बहुजन-महासंघाकडूनच खास करुन करण्यात आले असल्याचे सोशल मीडियातून मांडलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. अर्थात यापूर्वी भंडारा लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांना झालेले एकूण मतदान लक्षात घेता केवळ आंबेडकरी विचारांच्या मतदारांच्या मतदानातून कोणत्याही उमेदवाराचा विजय दृष्टीपथात येत नसला तरीही हे आवाहन भाजप-काँग्रेसची झोप उडवणारे आहे. सध्या स्थितीत बहुजन समाज पक्ष, भारिप बहुजन महासंघ आणि बसपातून बाहेर पडून डॉ. सुरेश माने यांनी स्थापन केलेला  भारिसोप या तीन  पक्षांचाच सध्या आंबेडकरी विचारांचे पक्ष म्हणून विचार करता येईल. यातील बसपा च्या मतदारांची संख्या गेल्या निवडणुकीचा विचार करता अधिक आहे. परंतु डॉ. सुरेश माने बसपातून बाहेर पडल्यामुळे बसपाची शक्ती कमी झाली आहे. परंतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत डॉ. सुरेश माने यांच्या सोबत राहून निवडणूक लढवणारे माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी काँग्रेसची वाट धरल्यामुळे डॉ. माने यांची राजकीय ताकद कमी झाली असली तरी प्रामुख्याने विदर्भातील गोंड आदिवासी बांधवांना त्यांनी भारिसोपमध्ये आणले आहे. भारिप ने राज्याच्या राजकारणात ज्यांच्या विजयामुळे इतिहास निर्माण केला होता ते किनवट मतदारसंघातील माजी आमदार भिमराव केराम सध्या डॉ. माने यांच्या सोबत आहेत. तर विदर्भातील तरूण आदिवासी नेते दशरथ मडावी देखील डॉ. माने यांच्या सोबत आहेत तरीही त्यांचा पक्ष या पोटनिवडणुकीत दखलपात्र म्हणता येईल एवढेच. बहुजन समाज पक्षाने यापूर्वी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही आंबेडकरी विचारांच्या पक्षापेक्षा तुलनेने अधिक मतदान घेतले आहे. परंतु २०१४ च्या निवडणुकीचा विचार करता पक्षात बरिच पडझड झाली आहे. शिवाय विदर्भात  आंबेडकर थाॅट् या विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रमाला  मोठ्या प्रमाणात प्रवेश घेणारे तरूण  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करित असल्याने बहुजन या संकल्पनेला विरोध करित आहेत. ही बाब लक्षात घेता  आंबेडकरी विचारांच्या नव्या पिढीचे हे आव्हानही पक्षासमोर आहेच. परंतु एकंदरीत विदर्भ प्रदेशाचा विचार केला तर बसपा चा जनाधार अधिक आहेच. त्यातच बसपा चे विद्यमान अध्यक्ष विदर्भातून असल्याचाही फायदा पक्षाला मिळेल. परंतु लोकसभा निवडणूक म्हटली तर व्यापक जनाधार असावा लागतो. उत्तर भारतात बसपाला ओबीसी समाजातूनही जनाधार असला तरी महाराष्ट्रातील नेतृत्वाला अजून तरी ही किमया साधली नाही. या संदर्भात एक व्यापक भूमिका घेणारा पक्ष म्हणून अॅड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाचा विचार करावा लागेल. त्यांचा अकोला पॅटर्न संबंध महाराष्ट्राला चांगलाच परिचित आहे. बौद्धांना बेसमास म्हणून उभे करून त्या जिल्ह्य़ातील बौध्देतर बहुल संख्येने असणाऱ्या ओबीसी जातींना सोबत घेऊन भारिप –  बहुजन महासंघ अकोला जिल्ह्य़ातील सत्ताधारी पक्ष म्हणूनच नावारूपाला आला आहे. विदर्भातील ओबीसी जातींचा भारिप बहुजन महासंघाकडे बऱ्यापैकी ओढा आहे. परंतु या ओढ्यात पक्षाला मासबेस देणाऱ्या ओबीसी जाती त्या पक्षाचा बेसमास ठरलेल्या बौध्दांचा किती ओढा आहे यावर आपले गणित ठरवतात.  या अनुषंगाने विचार केला तर भिमा-कोरेगाव विजयस्तंभाला सॅल्युट करण्यासाठी आलेल्या निरागस, बेसावध भोळ्या जनतेवर ब्राह्मण्यग्रस्त हिंदूत्ववादींनी जो भ्याड हल्ला केला होता, त्या प्रश्नाला अॅड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने  हाताळला त्यानंतर महाराष्ट्रातील बौद्ध जनतेने त्यांच्या आव्हानाला आणि नेतृत्वाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वात बंद ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद असो कि एल्गार मोर्चा असो यावरून त्यांचे नेतृत्व सध्या बौद्ध जनतेसाठी पहिली पसंती ठरली आहे. त्यातच रिडल्स प्रकरणी तत्कालीन चार नेत्यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चाची आठवण अॅड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या एल्गार मोर्चाने करून दिली. महाराष्ट्रातील जनतळ विस्तारत त्यांनी एकूणच सर्व प्रस्थापित पक्षांसमोरही आव्हान उभे केले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा काढण्याचे आवाहन जनभावनेला साद घालताना दिसत आहे. मात्र व्यापक विचार करूनही प्रस्थापित पक्षांचा पराभव करण्याइतपत ताकद अजून निर्माण व्हावी लागेल, तरीही या निवडणुकीत करण्यात आलेले हे आवाहन नेमके का करण्यात आले, यावर थोडा प्रकाश टाकून या लेखाची सांगता करणे योग्य होईल. खरेतर भंडारा लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्याइतपत ताकद सकृतदर्शनी दिसत नसली तरी धक्कादायक निकाल लागणारच नाही, असेही नाही. तरीही या निवडणुकीत आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांचा बेसमास असणारा बौध्द समुदाय ज्या पक्षाकडे जाईल त्याच पक्षाला सन २०१९ च्या निवडणुकीत होणाऱ्या आघाड्यांमध्ये महत्वपूर्ण स्थान प्राप्त होईल, याचे भान सर्वच आंबेडकरी पक्षांना असल्याने भंडारा लोकसभा निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 
चंद्रकांत सोनवणे, संपादक,
3 Ways Media
 
 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg