Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » भय्यू महाराजानी केली आत्महत्या

भय्यू महाराजानी केली आत्महत्या

 

राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिलेले अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास येथील सिल्वर स्प्रिंग या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ते ५० वर्षांचे होते. भय्यू महाराज यांना चिंताजनक अवस्थेत येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्यांच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये, असे म्हटले आहे.

भय्यूजी महाराज अध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अतिशय सक्रीय होते. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, त्यांच्यातील समेट, आंदोलने, उपोषणे यांच्यातील मध्यस्थ म्हणून त्यांनी अनेकदा महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हटले जायचे. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस असायची. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. मात्र हा सन्मान भय्यू महाराज यांनी नम्रपणे नाकारला होता. संतांसाठी पद महत्त्वाचे नाही तर लोकांच्या सेवेलाच माझ्यालेखी अधिक महत्त्व आहे, अशी भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

भय्यू महाराज यांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख असे होते. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये भय्यू महाराजांचा २९ एप्रिल १९६८ रोजी जन्म झाला. भ्रष्टाचाराविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आमरण उपोषण सुरू केले तेव्हा त्यांची मनधरणी करण्यासाठी यूपीए सरकारने भय्यू महाराज यांना बोलावले होते.

‘सियाराम’साठी केलेल्या मॉडेलिंगमुळे सर्वात आधी भय्यू महाराज चर्चेत आले. नंतर हळूहळू त्यांचा अध्यात्माकडे ओढा वाढत गेला आणि भय्यूजी महाराज अशी त्यांची ओळख बनली. शेतीबरोबरच तलवारबाजी आणि घोडेस्वारीचाही त्यांना छंद होता. ‘फेस रीडर’ म्हणूनही त्यांच्यावर राजकारण्यांचा विश्वास होता.

भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र अध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात त्यांनी केली. या ट्रस्टच्या माध्यमातून स्कॉलरशिप देत. तसेच, कैद्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करत. शेतक-यांना बियांणांचे वाटप असो किंवा शेतक-यांना विविध मदत करण्यासाठीही त्यांनी अनेकदा मदत केली.

भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीने अहमदनगरमधील कोपर्डी येथे बलात्कार पीडित चिमुकलीचे स्मारक बांधण्यात आले आहे.

इंदूरमध्ये भय्यू महाराजांचे मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.

चार वर्षांपूर्वी भय्यू महाराज यांच्या वडिलांचे आणि दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणींनी लग्नासाठी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर भय्यू महाराज यांनी गेल्या वर्षी ३० एप्रिल २०१७ रोजी दुसरे लग्न केले होते.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गानकोकीळा लता मंगेशकर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी इत्यादी अनेक दिग्गज भय्यू महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत.

दुसरे लग्न आणि आरोप

भैय्यूजी महाराजांचे पहिले लग्न औरंगाबादच्या माधवी निंबाळकर यांच्याशी झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी काही वषार्नंतर दुसरे लग्न केले होते. दुसरे लग्नादरम्यान एका महिलेने त्यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांचे दुसरे लग्न चर्चेचा विषय ठरले होते.

आत्महत्येपूर्वी केले ट्विट

भय्यू महाराज यांनी मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास गोळी झाडून आत्महत्या केली अशी बातमी पसरली. परंतु, त्यांनी त्याआधी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी शेवटचे ट्विट केले होते. ट्विट केल्यानंतर त्यांनी अवघ्या अर्ध्या तासानंतर आत्महत्या केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करताना त्यांनी मासिक शिवरात्री अर्थात महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. ट्विट केल्यानंतर अर्ध्या तासात त्यांनी आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात त्यांनी लिहिले आहे की, आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. तणाव आल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यात त्यांनी लिहिले आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg