Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » भाजपच्या मंत्र्यांनी पाश्चिमात्य कपडे परिधान करू नयेत, सुब्रमण्यम स्वामींचा सल्ला

भाजपच्या मंत्र्यांनी पाश्चिमात्य कपडे परिधान करू नयेत, सुब्रमण्यम स्वामींचा सल्ला

नवी दिल्ली – भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपच्या सर्व मंत्र्यांनी कोट-पँट परिधान करू नये असा सल्ला देत पाश्चिमात्य देशांकडून थोपवण्यात आलेला हा वेश गुलामीचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले.
ट्विट करून त्यांनी भाजपला हा सल्ला दिला आहे. पाश्चिमात्य कपडे हे विदेशी गुलामीचे प्रतीक आहे. भाजपने आपल्या मंत्र्यांसाठी एक नियमावली केली पाहिजे. आपल्या वातावरणानुसार प्रत्येकाने देशी कपडे घालावेत, असे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी भाजप नेत्यांनी मद्य प्राशन करणेही सोडण्यास सांगितले आहे. घटनेतील कलम ४९ हे दारूबंदी बाबत आहे. खरं तर मी दंडात्मक कारवाईच्या विरोधात आहे. भाजपने पक्षांतर्गत हा नियम लागू करावा, असे ते म्हणाले.

आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना स्वामी म्हणतात की, यामुळे फक्त भारतीय संस्कृतीला प्रोत्साहनच मिळेल असे नव्हे तर यामुळे देशातील अर्थव्यवस्थेला ताकदही मिळू शकते. विदेशी कंपन्या मेक इन इंडियाअंतर्गत भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. पण हे प्रत्यक्षात येत नसल्याचे ते म्हणाले. स्वामींनी यापूर्वीही भारतीय संस्कृती आणि देशी कपड्यांचे समर्थन केलेले आहे. यापूर्वी त्यांनी ट्विट करून केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधला होता.

तत्पूर्वी, तीन दिवसांपूर्वी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर आणि देशांतर्गत एकूण उत्पन्नावर (जीडीपी) प्रतिकूल प्रभाव पडला नसल्याचे दाखवण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या अधिकाऱ्यांवर सातत्याने चांगले आकडे देण्यासाठी दबाव आणते, असा आरोपच त्यांनी केला होता. सर्व आकडेवारी बनावट असल्याचेही ते म्हणाले होते.
मुडीज, फिच सारख्या आर्थिक संस्थांवर चुकूनही विश्वास ठेऊ नका, असा सल्लाही स्वामींनी चार्टर्ड अकाऊंटंट यांना दिला होता. अशी आकडेवारी तुम्ही पैसे देऊन मिळवू शकता. उल्लेखनीय म्हणजे मुडीजने नुकताच भारताला चांगले रेटिंग दिले होते.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg