Breaking News
Home » Breaking News » भाजपाध्यक्ष यांच्यासमोर पेट्रोल दरवाढीचा प्रश्न उपस्थित केल्याने भाजप कार्यकर्त्यांची रिक्षाचालकाला मारहाण

भाजपाध्यक्ष यांच्यासमोर पेट्रोल दरवाढीचा प्रश्न उपस्थित केल्याने भाजप कार्यकर्त्यांची रिक्षाचालकाला मारहाण

तामिळनाडूमध्ये एका रिक्षाचालकाने पेट्रोलच्या दरावर प्रश्न उपस्थित करताच त्याला भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित मारहाण केली.हिंदू मुन्नानी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गणपती चतुर्थीच्या कार्यक्रमाला तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन या उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या ठिकाणी उपस्थित असलेले रिक्षाचालक साईदापेट यांनी ‘ताई, पेट्रोलचे दर खूप वाढत आहेत’, असे म्हटले. भाजपाध्यक्ष यांच्यासमोर पेट्रोल दरवाढीचा प्रश्न उपस्थित केल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला धक्काबुक्की करीत मारहाण केली तसेच त्याला या कार्यक्रमातून हाकलून लावले.

पेट्रोलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महागाईची झळ बसत असल्याचे रिक्षाचालकाने म्हटले आहे. रिक्षाचे भाडे म्हणून १५० रुपये द्यावे लागतात तर ३०० रुपयांचं पेट्रोल भरावं लागतंय, त्यामुळे घर चालवणं खूप अवघड झालं आहे, असं रिक्षाचालकानं म्हटलंय. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तमिलसाई सुंदरराजन यांच्यासमोर लेखिका लूई सोफिया यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली होती. भाजपने लूईविरोधात तक्रार दाखल केली होती. लूई यांना कोर्टाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती व त्यांची कोकिराकुलम जेलमध्ये रवानगी केली होती. या अटकेनंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »