नवी दिल्ली – गुप्तहेरी केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा नवा व्हिडिओ पाकने जारी केला असून त्यात जाधव यांनी आपण आजही भारतीय नौदलाचा अधिकारी असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने हा नवा व्हिडिओ आज जारी केला. त्यात कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानचे कौतुक केल्याचे दिसते. तसेच मागील आठवड्यात त्यांच्या आई व पत्नीबरोबर झालेल्या भेटीचा उल्लेखही त्यांनी आपल्या व्हिडिओत केला आहे. आपण एकदम ठणठणीत असून पाकिस्तानकडून चांगली वागणूक मिळत असल्याचे जाधव यात सांगतात. त्याचबरोबर आई जेव्हा मला भेटली तेव्हा भारतीय अधिकारी तिला ओरडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाकिस्तानने नव्याने जारी केल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने जारी केलेला हा व्हिडिओ म्हणजे खोटेपणाचा डाव असल्याचे बोलले जात आहे.
But I have to say one very important thing to the Indian public & Indian govt, and for people in Navy that my Commission has not gone, I am a commissioned officer of Indian Navy: Kulbhushan Jadhav in an apparent new video by Pakistan pic.twitter.com/4I6SONL2Xu
— ANI (@ANI) January 4, 2018
व्हिडिओत जाधव म्हणाले की, आईबरोबर झालेल्या भेटीवेळी मी तिला काळजी करू नको असं म्हटलं. माझी तब्येत पाहून आईला आनंद झाला. ते (पाकिस्तान) माझी योग्य काळजी घेत आहेत. त्यांनी मला स्पर्शही केलेला नाही. तिनं मला पाहिलं, माझ्यावर विश्वास ठेवल्याचे ते म्हणाले. आज मी सर्व भारतीय नागरिक, सरकार आणि नौदलातील लोकांना सांगू इच्छितो की, माझं नौदलातील कमिशन अजून गेलेले नाही. मी भारतीय नौदलाचा एक कमिश्नड अधिकारी आहे, असा दावा जाधव यांनी या व्हिडिओत केला आहे. तसेच भेटीवेळी भारतीय अधिकारी जे पी सिंग हे माझ्या आई आणि पत्नीला घाबरवत होते, त्यांच्यावर ओरडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कुलभूषण जाधव यांच्या यापूर्वीच्या व्हिडिओवर जगभरातून अनेक शंका व्यक्त केल्यानंतर पाकिस्तानने यंदा पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसून येते. या व्हिडिओत जाधव हे अत्यंत खुल्या मनाने बोलत असल्याचे भासवण्यात येत होते.