Sunday , 16 December 2018
Breaking News
Home » महाराष्ट्र » भारतीय महिलांचा व्यवस्थेविरोधात एल्गार!

भारतीय महिलांचा व्यवस्थेविरोधात एल्गार!

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १२०व्या स्मृतिदिनी नागपूर येथे मनुवाद, ब्राह्मणवाद, हिंदुत्ववादाविरोधात भारतीय नारीची ललकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. फुले-आंबेडकरी महिला संघटनांसह डाव्या चळवळी व समाजवादी आंदोलनातील महिलांचा सहभाग या परिषदेच्या आयोजनात व उपस्थितीत असल्यामुळे या परिषदेचे नेमके आयोजन कोणी केले, हा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचप्रमाणे नागपूरला का आणि १० मार्च रोजीच का? हा प्रश्न देखील जाणकारांनी उपस्थित केला होता. यावर संयोजकांनी स्पष्टीकरण देताना नागपूर हे संघाशी निगडीत शहर असल्याचे सांगत येथूनच त्यांना आव्हान देण्याचे कार्य करावे लागेल, अशी भूमिका मांडली तर १० मार्च हा दिवस क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा १२०वा स्मृतिदिन असल्याचे सांगत या दिवसाची निवड केल्याचे संयोजकांनी सांगितले.
नागपूर येथील इंदोरा चौक या बौध्द बहुल वसाहती जवळ असलेल्या इंदोरा मैदानातच या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. डाव्या चळवळीपासून दहा हात लांब राहणाऱ्या नागपूरच्या बौध्द बहुल वसाहती जवळ आयोजित केली गेलेली ही एल्गार परिषद आश्चर्यात आणखी भर घालणारीच होती. त्यातच सकाळी दहा वाजेपासून तर दुपारी चार वाजेपर्यंत आयोजित या परिषदेची साधारणत: ११ वाजता सुरूवात झाली. परिषदेला सुरूवात होण्यापूर्वी सभा मंडपात दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांतील महिलांचा सहभाग नजरेत भरण्यासारखा होता. पण उत्तर भारतातील राज्यातून आलेल्या महिला या डाव्या व समाजवादी चळवळीच्या नावावर आलेल्या व खासकरून एनजीओशी जुळलेल्या असल्या तरी त्या सकृतदर्शनी उच्चभ्रू समाजातील असल्याचे जाणवत होते; परंतु महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील महिलांचे आगमन सुरू झाले तसे महिलांचे सामाजिक वास्तव अधिक स्पष्ट होवू लागले. साधारणत: बारा वाजेच्या सुमारास डॉ. मनिषा बांगर यांच्या नेतृत्वात महिला रॅलीचे सभामंडपात आगमन होताच महिला परिषदेत चैतन्य संचारले. परिषदेच्या संयोजिकांपैकी एक असणाऱ्या डॉ. मनिषा बांगर यांनी अभिन्या कांबळे, छायाताई खोब्रागडे, यांच्यासह या परिषदेवर पूर्णपणे बहुजन महामानव आणि महानायिकांच्या विचारांशी जोडून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपति शाहू महाराज यांच्या विचारांशीच परिषदेची बांधिलकी राखण्यात यश मिळवले. मात्र या परिषदेत मोठ्या प्रमाणात सामिल झालेल्या डाव्या व समाजवादी चळवळीतील महिला या प्रामुख्याने ब्राह्मण-बनिया समुदायातून असल्याचे स्पष्टपणे जाणवत होतेच; पण यावर खात्री पटली ती सोलापूरहून आलेल्या देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या नेत्या किरण यांच्या भाषणाने. सोलापूरहून आलेल्या किरण यांनी वेश्या व्यवसायाचे उदात्तीकरण करताना ‘इतर व्यवसायांसारखाच हाही एक प्रतिष्ठेचा व्यवसाय असल्याचे सांगत या व्यवसायाचा आम्हाला अभिमान आहे,’ अशी भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेविरोधात फुले-आंबेडकरी विचारांच्या अभिन्या कांबळे, छायाताई खोब्रागडे, विमल थोरात आदी महिला नेत्या डॉ. मनिषा बांगर यांच्या नेतृत्वात एकत्र आल्या. त्यानंतर अभिन्या कांबळे यांना विचार मंचावर निमंत्रित करण्यात आले. विचार मंचावर येताच अभिन्या कांबळे यांनी माईकचा ताबा घेवून वेश्यावृत्तीला व्यवसाय म्हणून उदात्तीकरण करण्याच्या भूमिकेचा निषेध केला. त्यांनी वैचारिक आक्रमण करताच सभा मंडपात उपस्थित असलेल्या डाव्या व समाजवादी चळवळीच्या नावाखाली आलेल्या एनजीओच्या महिला कार्यकर्त्यांमधील ब्राह्मण्य जागे झाले. त्यामुळे दोनशे ते अडीचशे महिलांनी अभिन्या कांबळे यांचे भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी छायाताई खोब्रागडे या मंचावर अभिन्या कांबळे यांच्या विचारांची पाठराखण करण्यास धावून गेल्या; पण ब्राह्मण, बनिया महिलांनी विरोध सुरूच ठेवला; परंतु परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून डॉ. मनिषा बांगर यांनी विचार मंचावर जाऊन थेट माईकचा ताबा घेत वेश्यावृतीला व्यवसाय म्हणून उदात्तीकरण करण्याच्या भूमिकेचा जाहीर निषेध तर नोंदविलाच; परंतु त्यांनी परिषदेत घुसखोरी करणाऱ्या ब्राह्मण-बनिया महिलांची भूमिका ही बहुजन समाजाच्या महिलांचे खच्चीकरण करण्याचीच नाही तर बहुजन महिलांना गुलामीतच ठेवण्याचे ब्राह्मणी षडयंत्र असल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर या पुढील काळात बहुजन महिलांचे राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र आंदोलन उभे करण्याची भूमिका घेऊन ब्राह्मण-बनिया महिलांनी बहुजन समाजाच्या महिलांचे नेतृत्व करण्याचे स्वप्नही पाहू नये, अशी सरळ भूमिका मांडली.
यानंतर सभामंडपात ब्राह्मण-बनिया महिला व बहुजन महिला असे थेट आणि स्पष्ट विभाजन झाले.

– डॉ. अमोल जाधव,
3waysmedia

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg