Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » विश्लेषण » भाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा; एक जगवणं

भाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा; एक जगवणं

पहिला  मानवी जीव या प्रूथ्वीवर जन्माला आला असेल तेव्हा त्यानं पहिली भाषिक हालचाल काय केली असेल बरं!  ‘टँह्या’ करून रडणं हीच त्याची पहिली भाषिक हालचाल की भूक लागली म्हणून उजव्या हाताची (की डाव्या हाताची) बोटं तोंडाकडे नेली तो क्षण….तिच असेल का पहिली भाषिक हालचाल? मूक असली तरी तिच ठरते पहिली भाषिक हालचाल! सतत रडून  रडणं, ‘रडणं’ ठरलं असेल नि सतत हात तोंडाकडे नेल्यामुळं ती मूक क्रूतीच, ‘भूक ‘
ठरली असेल वा ठरवली गेली असेल! अशा प्रकारे भाषा उभी राहिली. पण सर्वप्रथम ती कुठं उभी राहिली असेल? आणि ती भाषा कोणती? कुठेही  का असेना नि ती भाषा कोणतीही का असेना , माणसाला भाषा गवसली हे महत्त्वाचं  आणि आपण इथं बोलणार आहोत ते परंपरेनं उभी राहिलेल्या मराठी  भाषेबद्दल! 
                  भाषा माणसाला गवसली आणि जगण्याचे रोजचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरली आणि सततच्या बोलण्यामुळं भाषा घडत गेली. कोट्यावधी, लाखो, हजारो वर्ष पार करत -माणूस- आजचा मराठी माणूस जी मराठी बोलतो ती मराठी पूर्णत: सुसंस्कारित आहे पण ती सुसंस्कारित होण्यापूर्वी, आज जो काही भाषा इतिहास ज्ञात आहे त्यानुसार; भारतापुरता विचार करता आपल्याला ज्ञात आहे ती….सिंधूलिपी, जिचा विकास सिंधू नदीच्या परिसरात झाला. पण ही आहे ‘चित्रलिपी’. उदा. एखाद्या बैलाचं चित्र काढलेलं आहे नि सोबत वरच्या बाजूला ‘रेषावजा’ काही रेषा, ज्या त्या चित्रलिपीचा अर्थ  समजावून देतील पण आजही, पाच हजार वर्षानंतर (डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भारताचा इतिहास आठ हजार वर्ष) सदर चित्र मस्त खोंड असलेल्या सांडाचं आहे हे दिसतं पण वरचा मजकूर मात्र आजही आपल्याला कळत नाही. काळ पुढं सरकत आला. अनेक  बोलीभाषा  विकसित होत आल्या. सिंधू संस्कृतीच्या चित्रलिपी नंतर बोलीभाषा प्रचलित राहिली, नेमकं माहीत नाही पण जिला प्राकृत म्हटलं जातं…….प्राकृत म्हणजे तत्कालीन प्रजा बोलत असते ती बोली भाषा. उदा.पाली,  म्हणजे प्रजेनं पालन केली ती बोलीभाषा.
                  पाली भाषे बरोबरच आपल्याला दिसते ती, संस्कृत. बोली भाषांवर संस्कार केलेली संस्कृत. उदा. दोन हजार वर्षापूर्वीचा एक ग्रंथ, ‘गाथासप्तशती’…  हा प्राकृत भाषेची महती गाणारा ग्रंथ. यातील या ओळी… ‘ परूसा सक्कअबंधा पाउअबंधो वि होई सउमारो। पुरिसमहिलागं जेत्तिअमिहंतरं तेतिअमिमाणं।।      आता या ओळींचं संस्कृत रूप……’पुरूषा: संस्कृतगुंफा: प्राकृतगुंफोsपि भवती सुकुमार:।  पुरूषमहिलानां यावदिहान्तरं तेषु तावत्।।’  यावर आम्ही काही भाष्य करावं असं नाही  पण या सगळ्याचा अर्थ पहा :  ‘संस्कृत कठोर व प्राकृत सुकुमार; राकट पुरूष व नाजूक स्री यामध्ये आहे तेवढे अंतर संस्कृत व प्राकृत यामध्ये आहे.’ (प्रूष्ठ ४९, हालसातवाहनाची गाथासप्तशती    संपादक:स.आ.जोगळेकर)
                      भारतात पुरातन काळी पाली, संस्कृत प्रमाणेच, मागधी, अर्धमागधी, शौरसेनी अशा बोलीभाषाही अस्तित्वात होत्या. तशीच महाराष्ट्र देशी
मराठी होती नि ती महाराष्ट्री, मर्हाटी, मरहट्ठ अशा नावांनी रूढ होती. त्या बोली भाषा पुढं रूप बदलून 
वैदर्भी (नागविदर्भ), मालवणी (कोंकण), अहिराणी (मराठवाडा) कोल्हापूरी (दक्षिण महाराष्ट्र), पुणेरी (पुणे) या बोली भाषा आजच्या प्राकृत भाषा आहेत आणि या बोली भाषांवर संस्कार करून सिद्ध केली ती … प्रमाण मराठी भाषा…
                     गेली काही वर्ष मराठी भाषा मरू लागली चे वारे जोरकस आहेत. या क्षणी मला माझं बालपण आठवतंय. मी नागविदर्भातील एका छोट्या गावचा. एखाद्या माणूस काहीतरी करतांना दिसतो पण नेमकं काय करतो हे कळत नाही तेव्हा त्याला विचारलं जातं, ” का करून रायला बे?”, मालवणीत विचारतात, ” काय करतालाव?”,  अहिराणीत विचारतात, ” काय करी राईना?”, कोल्हापूरीत विचारतात, ” काय करतो रं?”, पुणेरी भाषेत विचारतात, ” शिंचा, कांय करतोंस बरें?” आणि प्रमाण भाषेत विचारतात, ” काय करतोस?”
                  आज आत्ता २०१८साली, पुणेरी भाषेचं
विडंबन करायचं झालं तर ‘शिंच्या’ असं अनुनासिक बोललं जातं आणि आता बोली भाषा मरू द्यायच्या नसतील तर,  “रात्रीस खेळ चाले” असा मालवणी खेळ खेळावा लागतो. किंवा वैदर्भी बोली वाचवण्यासाठी, भारत गणेशपुरेंंना, “काय करून रायला बे? म्हणत हंशा निर्माण करावा लागतो. यामुळं मरू लागलेल्या बोलीभाषा कशा वाचतील हे आम्हाला तरी उमगलं नाही. ते एक असो पण बोली भाषा जपणाऱ्यांना प्रमाण भाषे विषयी काय वाटते हेही एकदा समजून घेतलं पाहिजे.
                   दि.२७ फेब्रुवारी, कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस, जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. विद्यासागर राव यांनी , या दिनाच्या पूर्वसंध्येला काही मराठी साहित्यिकांना चहापानासाठी बोलावलं होतं. हेतू हा की मराठी भाषेचे प्रश्न समजून घेणं. आम्हीही एक प्रश्न राज्यपाल महोदयासमोर ठेवला, ” प्रमाण मराठी भाषा प्रत्येकाला यायला हवी. ती खेड्यातील लोकांनाही यायला हवी.” तर लगेच एक कवी म्हणाले, “प्रमाण भाषा शिकण्याची गरज नाही. बोली भाषा आहेत.” तरी बरं हा कवी प्रमाण भाषेतच कविता करतो. माणसाला खरं तर नवनवं शिकण्याची ओढ हवी पण साहित्यिकच असं म्हणत असतील तर……(पूर्वी सर्वसामान्य लोकांना संस्कृत शिकू दिली जात नव्हती.त्या संस्कृत च काय झालं हे आपण जाणतो.) आपलं साहित्य सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊच नये असं वाटतं की काय या साहित्यिक  लोकांना. बोलीभाषेसकट प्रमाणभाषाही समजली तर एकूण भाषिक देवाण-घेवाण वाढेल आणि कोंकणातील मालवणी नि तिथली संस्कृती विदर्भातील लोकांना कळेल त्याचप्रमाणें वैदर्भीय संस्कृती कोंकणवासींना कळेल.पण हे होणे नाही, असे दिसते.
                    गेली काही वर्ष मराठी भाषा मरू लागली आहे असे आपण म्हणतो आहोतच आणि आपल्या डोळ्यासमोर मराठी शाळा धडाधड बंद पडताहेत हेही आपण पाहात आहोत आणि  मराठी भाषेला,  ‘अभिजात मराठी भाषेचा दर्जा ‘
मिळावा म्हणून दिल्ली दरबारी आपण प्रणपूर्वक लढतोही आहोत.  या अशा द्विधावस्थेत मराठी भाषेचं ‘मरूपण’ आपण कसं थांबवणार आहोत, हा खरा प्रश्न आहे. 

                        –  प्रेमानंद गज्वी

                       9821771884

 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg