Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद

मुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटले आहेत. भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या बंदची हाक दिली आहे. काही वेळापूर्वीच होणाऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच या महाराष्ट्र बंदला राज्यातील सगळ्या संघटनांनी सहकार्य करावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सोमवारी झालेल्या घटनेनंतर आज राज्यभरात कार्यकर्त्यांनी बंद पुकारला असेल तर मागे घ्यावा, आंदोलन थांबवावे असेही आवाहन त्यांनी केले.
सोमवारी उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात दुपारी दोन वाजेपर्यंत मिळालेली नव्हती असेही त्यांनी म्हटले आहे. शिवराज प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आघाडी यांनी हा हिंसाचार घडवून आणला असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी उद्या म्हणजेच बुधवारी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांना कोरेगाव ते शिरुर आणि कोरेगाव ते चाकण या पट्ट्यातील गावांनी मदत केल्याचा आरोपही त्यांनी केली. तसेच या गावांचे अनुदान पुढील दोन वर्षांसाठी बंद करावे अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
विजयस्तंभावर अभिवादन करणाऱ्या अनुयायांचा आणि हिंसाचार करणाऱ्यांचा एकमेकांशी संबंध नव्हता. मात्र आंबेडकरी अनुयायांना यामध्ये लक्ष्य करण्यात आले. तसेच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा केला असाही आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. हिंसाचार पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली.
आम्ही त्यादिवशी ग्रामीण एसपींना फोन करत होतो मात्र त्यांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज एरिया होता. पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे योग्यवेळी या ठिकाणी कुमक पोहचली असती तर या घटनेला हिंसक वळण लागले नसते. इमारतींच्या छतावरून दगडफेक करण्यात आली असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. आज राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या आहेत. मात्र आंदोलकांनी शांत रहावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg