Breaking News
Home » Breaking News » मंत्रालयाचा दारात ‘भोपळे फुटले ‘.

मंत्रालयाचा दारात ‘भोपळे फुटले ‘.

सुशिक्षित तरुणांना नुसत्या रोजगार देण्याच्या केलेल्या घोषणा, उद्योग क्षेत्रातून कोणत्याही रोजगारांच्या संधी उपलब्ध होत नसणे आणि सरकारी नोकरीत पाच वर्षे कंत्राटावर नेमणूक करण्याची केलेली घोषणा याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या दारात ‘भोपळा फोडो’ आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

मंत्रालयाचे कामकाज नियमित सुरू असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारी अचानक मंत्रालयाच्या दारात आले. त्यांनी सोबत भोपळे आणले होते. त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत ‘भोपळे फोडाय’ला सुरुवात केली. मंत्रालयाच्या दारात बंदोबस्तावर असणा-या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेत करीत काही तरुणांना ताब्यात घेतले.

यावेळी बोलताना या तरुणांनी सांगितले की, दरवर्षी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारकडून घोषणा केल्या जातात. खूप मोठे उद्योग येत आहेत आणि त्यातून राज्यात लाखोंनी रोजगार वाढणार असल्याची आकडेवारी जाहीर केली होते. मात्र राज्य सरकारला साडेतीन वर्षे पूर्ण झाली. मात्र केलेल्या घोषणेची पूर्तता झालेली नाही.

सरकार नुसत्या घोषणा करीत आहे. मात्र प्रत्यक्ष बेरोजगार तरुणांच्या पदरात नुसते भोपळे पडत आहेत. सरकारने ३६ हजार नोकर भरतीची घोषणा केली. मात्र त्यात पाच वर्षे कंत्राटीपद्धतीने काम करण्याची अट घातली. ही अट म्हणजे तरुणांची घोर फसवणूक आहे.

केवळ लाखो रोजगार उपलब्ध करून देण्याच्या घोषणा केल्या जातात आणि हातात मात्र भोपळा पडतो. म्हणूनच आम्ही इथे भोपळा फोडो आंदोलन केले आहे, असे या कार्यकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना मरिन ड्राईव्ह पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »