Breaking News
Home » विश्लेषण » माझी भूमिका – दिनकर मनवर

माझी भूमिका – दिनकर मनवर

दिनकर मनवर यांचे निवेदन

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागलेल्या माझ्या “दृश्य नसलेल्या दृश्यात” या कवितासंग्रहातील “पाणी कसं अस्तं” या कवितेत पाण्याच्या रंगांसाठी वेगवेगळ्या प्रतिमांचा उपयोग केलेला आहे. त्यातील एका प्रतिमेमुळे एका समाजगटाच्या भावना दुखावल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्याविषयी मी कवी या नात्याने निःसंदिग्धपणे स्पष्ट करू इच्छितो की ती विशिष्ट ओळ लिहिताना तसेच लिहिण्याआधी आणि लिहिल्यानंतरही माझ्या मनात कुणाच्याही भावनांशी खेळण्याचा किंवा कोणत्याही स्त्रीवर्गाची अवहेलना करण्याचा कोणताही हेतू नव्हता व नाही.

मी स्वतः आणि माझ्या कवितेचा आवाजही कायम नाही रे वर्गाच्या, शोषितांच्या, पिडितांच्या बाजूने व्यक्त होणारा आहे. समाजातल्या सर्व विषमतांविषयी बोलण्याचे आणि बंधुभावयुक्त अशा व्यापक मानवतेचे स्वप्न पाहाण्याचे एक माध्यम म्हणून मी कवितेकडे पाहातो. त्यामुळे आपल्या लिखाणातील एखाद्या ओळीमुळे आपलीच माणसे दुखावली जावीत याचा मलाही खूप त्रास होत आहे. कवी म्हणून माझी ही भावना आपण समजून घ्याल अशी मी प्रार्थना करतो.

“पाणी कसं असतं” या कवितेबाबत मी नम्रपणे हे सांगू इच्छितो की येथे ‘पाणी’ ह्या प्रतिमेचा वापर जगण्याच्या वेदनांविषयी आहे. शोषणाने नियंत्रित केलेल्या व्यवस्थेवर भाष्य करताना पाणी प्रतिमेचा वर्णनात्मक, उपमा, प्रतिक म्हणून वापर केलेला आहे. एका ओळीत “अंगठा छाटल्यावर उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीसारखं लाल पाणी” हे महाभारतातल्या आदिवासी नायकाची – एकलव्याची आठवण करून देण्यासाठी योजलेले आहे. “आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं पाणी” या ओळीत आदिवासी समाजाचं निर्मळ, निष्पाप, निष्कपट आणि नैसर्गिक आणि शोषणाचे निर्बंध नाकारणारं मुक्त जगणं याचं प्रतिक म्हणून वापरलेलं आहे. पाणी कसं असावं याचे अंदाज या कवितेत बांधले आहेत आणि या अंदाज बांधण्याचाच एक भाग म्हणून, कल्पना करण्याचा भाग म्हणून, ही ओळ आलेली आहे. इथे स्तन हे सृजनाचे प्रतिक आणि जांभळा रंग हा पहाडी कणखरपणा, खणखणीत अव्वल दर्जाची निर्मळता याचे प्रतिक म्हणून मनात आलेले आहेत. यातून कोणत्याही प्रकारची लैंगिकता, किंवा भावना चाळवण्याची, अवहेलनेची-उपमर्दाची कृती किंवा लैंगिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आदी कोणत्याही गैरवर्तन/दुर्वतनाचे सूचन दुरान्वयानेही झालेले नाही. मात्र दुर्दैवाने या कवितेचे अर्थनिर्णयन अस्मितेच्या राजकारणातून झाल्याने पूर्णपणे चुकीच्या दिशेने गेले आहे.

व्यवस्थेने धर्म आणि संस्कृतीच्या आडोशाने भूमी,जंगल, हवा,पाणी या निसर्गदत्त देणग्यांवर सत्ता प्रस्तापित केली आहे. परिणामतः *’पाणी*’ या निसर्गदत्त घटकापासून एका मोठ्या समूहाला वंचित ठेवण्यात आले आहे. हा आशय ह्या कवितेचा प्रधान आशय आहे. राहिला प्रश्न प्रस्तृत ओळीचा तर या ओळीत पाण्याची जी मंगलमय रूप आहेत त्यात आकाशासारखं निळंशार, पाथरवटाच्या श्रमासारखं काळंभोर, तर ‘आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं’ असं म्हणताना या ओळीतील प्रतिमा लक्षात घेणे गरजेचे आहे. ‘आदिवासी’ हा संबोध मी येथील मूळचे रहिवाशी या अर्थाने वापरला आहे. जात वा जातीवाचक अर्थाने वापरला असता तर तो गौंड , भिल्ल, ठाकर या सारख्या संबोंधनांनी सूचित केला असता. इथे ‘आदिवासी स्री’ ही या विश्वाची आदिमाया आहे व तिचे स्तन हे डोंगर आहेत. या स्तनातून म्हणजे डोंगरातून प्रवाहित होणारे पाणी हे जीवणदायीच आहे. निळ्या आकाशाखालील काळ्या डोंगराचा हा रंग जांभळाच आहे. परिणामतः हा आदिमायेच्या स्तनाचाच रंग आहे असे मला अभिप्रेत आहे. ही आदिवासी स्री जात संबोधातून विचारात घेतली जात असल्याने या ओळीचा वा कवितेचा चूकीचा अर्थ लावण्यात येत आहे जो कवी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून अपेक्षित नाही.

पाणी या आशयसूत्राला धरून मी आणखीही काही कविता लिहील्या असून त्यांचा संबंधही शोषणमुक्त संस्कृतीच्या शोधाशी आहे. या सर्व कविता एकमेकींच्या संदर्भात वाचायच्या आहेत. ज्यांनी कविता शिकवायची आणि समाजाला समजावून सांगायची त्यांनीच जर गैरसमजाच्या आहारी जाउन तिचा गैर अर्थ लावला तर ते फारच खेदकारक आणि वैषम्य वाटणारे ठरेल.

माझ्या *’दृश्य नसलेल्या दृश्यात’* या संग्रहातील *’पाणी कसं अस्तं’* या कवितेतील एका ओळीमुळे माझ्या बांधवाच्या आणि भगिनींना मानसिक क्लेष झाला. माझा काही हेतू नसताना या सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्यात याचे मला अतिशय दुःख झाले. मी मनापासून माफी मागतो.

अभ्यासक्रमातून या कवितासंग्रहातील ती विशिष्ट कविता वगळलेली आहे. माझी विद्यापिठाला विनंती आहे की, माझा हा कवितासंग्रह अभ्यासक्रमातून वगळावा.

*मला कल्पना आहे की, जे सगळे तरूण कवी, लेखक, अभ्यासक आणि समाजातील वेगवेगळया स्तरातील लिहिणारे/वाचणारे या काळात माझ्या मागे धिरोदात्तपणे उभे राहिले त्यांचाही मी मनापासून माफी मागतो.*

मी खरंच दूःखी झालो आहे. थकलो आहे. हतबल आणि अगतिक झालो आहे. माझ्यापुढे दुसरा अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही.

मी समजून उमजून हा निर्णय घेतला आहे.

तुम्ही सगळे सर्वज्ञ आहात. समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.

शेवटी कवी या नात्याने मी एवढीच कळकळीची विनंती करेन की आपण सर्वांनी या कविचेचा चांगला स्वच्छ नजरेने, पूर्वग्रहविरहीत अर्थ लावून तो समाजापुढे ठेवावा आणि हा वाद मिटवावा.

-दिनकर मनवर

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »