Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » माला अडकवण्याचा डाव भाजपचा : राहुल गांधी

माला अडकवण्याचा डाव भाजपचा : राहुल गांधी

भिवंडी – माझ्या विरोधात भाजपकडून खोटे गुन्हे दाखल करून मला अडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे; मात्र मला त्याची पर्वा नाही. आमची लढाई विचारांशी आहे, ती आम्ही जिंकणार असल्याचा दावा करत याचिकेतील सर्व आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज फेटाळून लावले. भिवंडी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यास भाजप अपयशी ठरला आहे. इंधन व जीवनावश्‍यक वस्तूंची दरवाढ करून नागरिकांची पिळवणूक करण्यात येत आहे. भाजपच्या या मनमानी कारभाराविरोधात कॉंग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, असे राहुल यांनी सांगितले. या वेळी कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, भिवंडीचे महापौर जावेद दळवी यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कॉंग्रेसच्या येथील प्रचारसभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे संघाचे स्थानिक कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात राहुल यांच्याविरोधात मानहानी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी मंगळवारी सकाळी 11 वाजता भिवंडी दिवाणी न्यायालयात मुख्य न्यायाधीश ए. ए. शेख यांच्या समोर झाली. या वेळी याचिकेतील आरोप राहुल यांनी फेटाळले. राहुल यांच्या वकिलांनी समन्स ट्रायलप्रमाणे ही केस चालविण्यासाठी दाखल केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला असल्याची माहिती ऍड. नारायण अय्यर यांनी दिली. पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. न्यायालयातील सुनावणीनंतर आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी याचिकाकर्त्यावर आली आहे.

आचासंहितेचा भंग?
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात सुरू आहे. तरीही राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी न्यायालयाच्या परिसरात व मार्गावर मोठ्या संख्येने पोस्टर, बॅनर लावण्यात आले होते. त्यापैकी काही पोस्टर पोलिसांनी काढले. या प्रकरणी पोलिसांनी कोणावरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केलेला नाही.

मोदींच्या चुकीच्या धोरणांचा फटका
पंतप्रधानांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील शेतकरी त्रस्त आहे. युवकांना रोजगार नाही. या विरोधात आमची लढाई आहे. श्रीमंतांच्या बोलण्यानुसार सरकार चालवले जात आहे, त्यामुळे जनता त्रस्त आहे. शेतकऱ्यांचे रक्षण आणि तरुणांना रोजगार देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. महागाई, पेट्रोल, डिझेल व शेतकऱ्यांच्या संदर्भात पंतप्रधान मोदींनी मौन बाळगले आहे, अशी टीका राहुल यांनी या वेळी केली.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg