Breaking News
Home » देश-विदेश » माहिती तंत्रज्ञान, बीपीओंतील कर्मचाऱ्यांसाठी बुरे दिन?; ७ लाख नोकऱ्यांवर संक्रांतीची शक्यता

माहिती तंत्रज्ञान, बीपीओंतील कर्मचाऱ्यांसाठी बुरे दिन?; ७ लाख नोकऱ्यांवर संक्रांतीची शक्यता

नवी दिल्ली – माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कमी कुशल कर्मचाऱ्यांना येत्या काही वर्षांमध्ये ऑटोमेशन (स्वयंचलन) आणि आर्टिफिशियल इंटलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) मोठा फटका बसणार आहे. या क्षेत्रातील ७ लाख नोकरदारांना याची झळ बसू शकेल. या क्षेत्रातील कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना २०२२ पर्यंत नोकरी गमवावी लागू शकते. एचएफएस रिसर्च या अमेरिकेन कंपनीने केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. मात्र ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे सर्वांचे नुकसान होणार नाही, असे देखील एचएफएस रिसर्चचा अहवाल सांगतो. याच कालावधीत मध्यम आणि उच्च कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना असलेली मागणी वाढेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याआधीही ऑटोमेशनमुळे अनेक क्षेत्रांमधील लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी, उत्पादन, माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग यासाख्या क्षेत्रांमधील नोकऱ्यांवर ऑटोमेशनमुळे संकट निर्माण झाले आहे. ऑटोमेशनचा वेग वाढल्याचा परिणाम उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा सेवा आणि कृषी क्षेत्रावर दिसून येत आहे. ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ उद्योगातील कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २०२२ मध्ये १७ लाखांवर येईल. २०१६ मध्ये ही संख्या २४ लाख इतकी होती.
२०२२ पर्यंत कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून नारळ देण्यात येईल. मात्र याच कालावधीत मध्यम आणि उच्च कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीत वाढ होईल. २०१६ मध्ये मध्यम कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची ९ लाख असलेली संख्या २०२२ पर्यंत वाढून १० लाखांपर्यंत पोहोचेल. याशिवाय उच्च कौशल्य असलेल्या व्यक्तींसाठीही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील. २०१६ मध्ये उच्च कौशल्य असलेल्या लोकांसाठी ३ लाख २० हजार नोकऱ्या उपलब्ध होत्या. २०२२ मध्ये हे प्रमाण ५ लाख १० हजार इतके होईल, असे या अहवालात म्हटले आहे.
जागतिक पटलावर निर्माण झालेल्या परिस्थितीचे प्रतिबिंब भारतातदेखील पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावर कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध नोकऱ्यांच्या प्रमाणात ३१ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. तर मध्यम कौशल्य आवश्यक असलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढेल. याशिवाय उच्च कौशल्य आवश्यक असलेल्या नोकऱ्यांच्या प्रमाणात ५७ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »