Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » बातम्या » अपघात / गुन्हा » मुंबईत पुन्हा आग, रे रोड परिसरातील गोदामे जळून खाक

मुंबईत पुन्हा आग, रे रोड परिसरातील गोदामे जळून खाक

मुंबई – मुंबईतील आगीचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सोमवारी सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली आगीची घटना ताजी असतानाच आता रे रोड परिसरातील एका वेल्डिंगच्या दुकानाला रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे सात दुकाने व गोदामे आगीत जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दुकानांचे मोठे नुकसान झाले असले तरी या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते.

मुंबईतील रे रोड परिसरातील एका वेल्डिंग दुकानाला रात्री उशिरा आग लागली. परिसरात गोदाम असल्याने आग लगेच पसरली. अग्निशामक दलाच्या ५ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आले. आग विझली असली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या आगीत ७ दुकाने जळून खाक झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईतील अग्नितांडवाचे सत्र सुरुच आहे. रविवारीही कांजुरमार्गावरील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg