Breaking News
Home » बातम्या » मुंबई विद्यापीठाच्या ४७७ पैकी ४६९ परीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या ४७७ पैकी ४६९ परीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या ४७७ पैकी ४६९ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. १७ लाख ३२ हजार ९४९ उत्तर पत्रिका तपासण्याचे काम बाकी होते, ज्यापैकी ३५ हजार उत्तरपत्रिका तपासणे उरले आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे आणि इतर सहकारीही हजर होते.
आत्तापर्यंत २२ हजार २७५ अर्ज हे पुनर्मुल्यांकनासाठी आले आहेत. तांत्रिक चुकांमुळे अनेक निकालांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळामुळे काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळणे, काही विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचे दाखवले जाणे हे प्रकार घडल्याची माहिती अर्जुन घाटुळेंनी दिली. ज्या २ हजार ६३० विद्यार्थ्यांना विदेशात जायचे होते त्यांचे निकाल आम्ही लवकरात लवकर लावून दिले, असेही परीक्षा नियंत्रक घाटुळे यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत त्या निकालांवर युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. अनेकांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, गहाळचा अर्थ ‘हरवल्या आहेत’ असा घेऊ नका तर या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका एका गठ्ठ्यातून दुसऱ्या गठ्ठ्यात गेल्या आहेत असाच त्याचा अर्थ असल्याचेही कुलगुरूंनी सांगितले. ३५ हजार १८८ उत्तर पत्रिकांचा शोध सुरू आहे. साधारण २८ हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा सावळागोंधळ मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे. यासंदर्भात पहिल्यांदाच कुलगुरूंनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रजेवर असल्याने माझ्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. ती पूर्ण करणे हे माझे काम आहे, मागील १ महिन्यात काय घडले ते सांगण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सगळ्या परीक्षांचे निकाल ३१ जुलै पर्यंत लावण्यात येतील, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र विनोद तावडे यांनी दिलेल्या सगळ्या डेडलाईन चुकल्या. १५ ऑगस्टचीही डेडलाईन चुकली होती. सगळ्या डेडलाईन चुकल्यानंतर १९ सप्टेंबरपर्यंत सगळे निकाल लावण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. ज्यानंतर नेमक्या किती परीक्षांचे निकाल लागले, महिन्याभरात काय काय घडले या सगळ्याची माहिती देण्यासाठी प्रभारी कुलगुरू शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.
हास्यास्पद दावे
मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात हास्यास्पद दावेही करण्यात आले होते. गणेशोत्सव, बकरी ईद या सगळ्यामुळे निकाल रखडल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने कोर्टात केला होता. तसेच खूप पाऊस पडल्यामुळेही निकाल रखडल्याचे कारण विद्यापीठाने दिले होते. हे सगळे ऐकल्यानंतर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मुंबई विद्यापीठावर टीका केली होती. ‘नशीब डोकलामचा प्रश्न सुटला’ नाहीतर विद्यापीठाने ते कारणही पुढे केले असते, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. इतकेच नाही तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल का करू नये? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला होता.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »