Breaking News
Home » लोक सहभाग » मुर्दा घरातला मामा – वैभव छाया

मुर्दा घरातला मामा – वैभव छाया

मूर्दाघरातला मामा…

मूर्दाघरातला मामा तंबारल्या डोळ्यांनी
फिरत असतो मुर्द्यान्मधून एकटाच भुतासारखा
रात्री बेरात्री
पीकलेल्या केसांना छातीवर मिरवत
मावा खाऊन पचापच थुकतो
तेव्हा माझा मेंदू ईथर नी केशरच्या वासाचं
पृथःकरण करत त्याला घाम पुसताना पाहत असतो आरपार

मूर्दाघरातला मामा नसतो तुमच्या माझ्यासारखा
मृत्यूला पाहून घाबरणारा
फाशीवाला जल्लाद मला वाटतो त्याच्याच भावासारखा
दोन्ही चालून बोलून सैतानच
या मामात नी माझ्यात बरीच साम्यंयेत
त्याचं नी माझं कास्ट सर्टिफिकेट सेमंय
तो मला जयभीम करतो नी मी त्याला
तो मला हुडकून सांगतो एकेक खबर
नी बदल्यात मी देतो त्याला डीएसपी क्वाटर

मामा काम करतो हॉस्पीटलात
त्याचे खाकी कपडे मला त्याची कातडी वाटते
रक्त पु उडालं जखमेतून की लपून जातं त्या रंगात
मामाचा डॉक्टर पण हुशार
मामा बॉडी आणतो, मामा कट मारतो,
हिरवा मास्क असतो, धुतलेला पिवळसर ग्लोव्हज असतो
मामा रबरानं हात झाकून घेतो
हातानं कोथळा बाहेर काढतो
पोटात ढवळून बघतो
मामा सडलेल्या जखमेला कट मारतो
रबरावर रक्त गळू देतो, रिचू देतो
मामा श्वास घेत राहतो
वास सुटलेल्या मुडद्यांमध्ये
रबरी ग्लोव्ह्ज घालून घालून मामाच्या हस्तरेषा पुसून गेल्यात
अन आयुष्य ताणलं गेलंय रबरासारखंच घर ते मुर्दाघर

मामाला विहारात येवू देत नाहीत आपलीच पांढरपेशी लोकं
त्याला पंचशील सांगतात
त्याला 22 प्रतिज्ञा सांगतात
पण तो या कानाने ऐकून त्या कानाने देतो सोडून
तो म्हणतो मुर्दाघर हेच माझं विहार
आणि माझा बुध्द मुडद्यांमध्ये गेलाय चिरनिद्रेत
मात्र त्याला सैतान समजतात वरची लोकं
मृत्यूला न भिणार्या मामाला आळीतून जाताना मात्र झेलावी लागते जिवंत माणसांची भिती

मामा म्हणतो,
लहानपणी आजी शिवायची गोधडी
जुन्या पुराण्या लुगड्यानी
ओव्या गात, गाणी गात
तशी मी बॉडी शिवतो
आजीचा, आईचा वारसा असा चालवतो
माझा वारसा नाहीच काही
माझ्या अंगाला वास येतो
मला कुणी हात मिळवत नाही
माझ्या घरात कुणी वाटीभर साखर मागत नाही
मामा बोलत जातो, मी ऐकत जातो

बॉडीचा कट असतो,
माणूस मेला की त्याची बॉडी बनते
नी त्याला दोनशे रुपये देते
अर्धा वाटेकरी त्याचा हमाल बनतो
मामा म्हणतो,
माणसानं मरावं तर अॅक्सिडंटनं मरावं,
नॅचरल मरूच नये

मला मामाचे तंबारलेले डोळे पहावेसे वाटतात नुसते
नजर मेलेली जीवंत माणसाचे डोळे!
कसंलही स्वप्न नाही, ना कशाची भिती
निर्विकार निर्विकल्प
हाताचा आकार सतत कटर पकडल्याचा
नी हातच्या रेषाही फिक्कट साल्या
मामा त्याच्या मुलाशी बोलत नाही
अपराध्या सारखा वावरत रहतो घरात
मुलाला कसलाच वारसा न दिल्याची शिक्षा
स्वतःतच भोगत राहतो
एक दिवस त्यानं युनियन बनवून जावं संपावर
असं स्वप्न त्याला द्यायचा मी करतोय विचार
खरंच जर हा मुर्दाघरातला मामा संपावर गेला तर…?

वैभव छाया
………

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »