Sunday , 16 December 2018
Breaking News
Home » Breaking News » मुलं चोरणारी टोळी समजून जमावानं केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू;

मुलं चोरणारी टोळी समजून जमावानं केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू;

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर जवळ राईनपाडा येथील घटना

मुलं चोरणारी टोळी समजून जमावानं केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील राईनपाडा परिसरात ही घटना घडली. हे पाचही जण सोलापूरचे आहेत. या घटनेनंतर राईनपाडा येथे कर्फ्युसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारत शंकर भोसले (45), दादाराव शंकर भोसले (36), राजू भोसले (47), अगणू श्रीमंत हिंगोळे (20), भारत शंकर मावळे (45) या पाच जणांचा मारहाणीत मृत्यू झाला. ते सोलापूरमधल्या मंगळवेढे येथे राहणारे होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी सांगितलं की, “दुपारी 1 वाजता STच्या बसमधून पाच लोक गावात उतरले. त्यांच्याविषयी शंका आल्यानं लोकांनी त्यांची चौकशी सुरू केली. त्यांनी योग्य उत्तरं दिली नाहीत म्हणून जमावानं त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. नंतर पाचही लोकांना एका खोलीत बंद करून बांबू आणि दगडांनी मारहाण केली.

हत्या झालेले गोसावी समाजाचे

हत्या झालेले पाचही जण हे नाथपंथी गोसावी समाजाचे आहेत.

“भिक्षा मागण्यासाठी ही मंडळी या गावात गेली होती, पहिल्यांदाच असं काही घडलं आहे. नंदुरबार, धुळे, साक्री, वणी, सटाण्यात आम्ही फिरून आता परत गावाकडे जात होतो,” असं जगन्नाथ गोसावी यांनी सांगितलं आहे.

राज्याच्या काही भागात सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना पीक आलं आहे. मुलं चोरणारी टोळी गावागावात फिरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरली आहे.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात या अफवांचं प्रमाण वाढलं आहे. या अफवा रोखण्यासाठी पोलिसांकडून पत्रकं सुद्धा वाटण्यात आली होती, पण अफवा पसरणं सुरुच आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg