Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » मोदींना जबाबदारीने बोलण्यास सांगा- मनमोहन सिंग यांचे राष्ट्रपतींना पत्र

मोदींना जबाबदारीने बोलण्यास सांगा- मनमोहन सिंग यांचे राष्ट्रपतींना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काँग्रेस नेत्यांबद्दल धमकीची भाषा वापरली होती. त्यासंदर्भात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून मोदींच्या भाषेबद्दल आक्षेप नोंदवला आहे. मोदींना जबाबदारीने बोलण्यास सांगा असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

६ मे रोजी कर्नाटकात हुंबळी येथे झालेल्या मोदींच्या सभेचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांनी कान खोलून ऐकावे, जर तुम्ही तुमची मर्यांदा ओलांडणार असाल तर हा मोदी आहे, तुम्हाला किंमत चुकवावी लागेल असे मोदी या सभेत म्हणाले होते.
पंतप्रधानांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल जी धमकीची भाषा वापरली त्याचा निषेध केला पाहिजे. लोकशाही देशातील पंतप्रधानाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात अशा प्रकारचे भाषण योग्य नाही असे या पत्रात म्हटले आहे.

या पत्रावर मनमोहन सिंग यांच्याबरोबरीने मल्लिकार्जून खर्गे, पी. चिंदबरम, अंबिका सोनी, आनंद शर्मा, मोतीलाल व्होरा, करण सिंह, अहमद पटेल आणि कमल नाथ या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पत्राच्या प्रारंभी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची जी शपथ घेतली होती त्याचा उल्लेख आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg