Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Videos » म्हादई नदी पाणीवाटप वाद: कर्नाटकात बंद, मोदींनी हस्तक्षेप करण्याची मागणी

म्हादई नदी पाणीवाटप वाद: कर्नाटकात बंद, मोदींनी हस्तक्षेप करण्याची मागणी

बेंगळुरु – गोवा आणि कर्नाटकमधील म्हादई नदीचा वाद आता पेटला असून गुरुवारी कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. राज्यातील बहुसंख्य शाळा, बाजारपेठा बंद असून राज्यातील डॉक्टरांनी काळी फित लावून बंदला पाठिंबा दिला. तर भाजपने बंदमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे.
कर्नाटक व गोवा यांच्यात म्हादई नदीच्या पाणीवाटपावरून वाद असून या नदीला गोव्यात मांडवी म्हणतात. पाणी वाटप लवादापुढे हा प्रश्न सुनावणीसाठी आहे. कळसा भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने ७.५६ हजार दशलक्ष घनफूट पाणी मागितले आहे. तर गोव्याने याला विरोध दर्शवला आहे. उत्तर कर्नाटकात शेतकऱ्यांना पाणी लागते ते या नदीतून घेण्यात येईल असे कर्नाटकचे म्हणणे आहे. तर कर्नाटक धरणे व कालव्यात जादा पाणीसाठा करण्याची भीती गोव्याने व्यक्त केली असून हे पाणी मलप्रभा खोऱ्यातून कर्नाटकातील पाटबंधाऱ्यांना दिले जाऊ शकते, असे गोवा सरकारने म्हटले आहे.
कर्नाटकने म्हादई नदीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून कर्नाटकमध्ये गुरुवारी बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असून, कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने बंदमध्ये सहभाग घेतानाच एक दिवसाचे वेतन देण्याचे ठरवले. कर्नाटकातील प्राथमिक व माध्यमिक शाळाही आज बंद असून यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेण्यात अडचणी येणार आहेत. पण यापुढे जादा वर्ग घेऊन हे नुकसान भरून काढले जाणार आहे.गुरुवारच्या बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. काही ठिकाणी मॉलही बंद ठेवण्यात आले आहे. वाहतुकीवरही बंदचा परिणाम झाला असून रस्त्यावर वाहनांची तुरळक वर्दळ आहे. राज्यातील परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने परिवहनच्या बसेस आगारातच आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता केली जात आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेंगळुरु जवळ रेल रोकोचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना तिथून हुसकावून लावले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg