Breaking News
Home » Breaking News » राज्यात काँग्रेसचीच सत्ता येणार – नाना पटोले

राज्यात काँग्रेसचीच सत्ता येणार – नाना पटोले

पक्षाने जबाबदारी दिली तर मी नागपूरमधून लढणार आणि आगामी काळात राज्यात काँग्रेसचीच सत्ता येणार असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापैकी कोणालाही आपण टक्कर देण्यास तयार आहोत अशी गर्जनाच नाना पटोले यांनी केली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला जर नागपुरातून लढण्याची संधी दिली तर गडकरी किंवा फडणवीस यांना टक्कर देण्यास मी तयार आहे असे पटोले यांनी म्हटले आहे.  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी थेट गडकरी आणि फडणवीस या दोन दिग्गजांनाच आव्हान दिले आहे.

निवडणुकांचे घोडामैदान जवळ येते आहे तसे काँग्रेसने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. २०१९ ला भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस हवे ते सगळे प्रयत्न करणार असा अंदाज आहे. नितीन गडकरींची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने खेळी करत नाना पटोलेंना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच पक्षाने मला नागपुरातून लढण्यास सांगितले तर मी नक्की लढणार आणि गडकरींना हरवून दाखवणार असा आत्मविश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे. भाजपा सत्तेवर आल्यापासून त्यांनी लोकांना काय वागणूक दिली आहे ते सगळ्यांनाच ठाऊक आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा लोक त्यांना निवडून देणार नाहीत. २०१९ मध्ये काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात परत येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारच्या कृषी धोरणावरून नाराज होत भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनी भाजपाला सोडचिट्ठी दिली . तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना वेळ देत नाहीत त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत असे म्हणत त्यांच्यावरही टीका केली होती. नोटाबंदीचा निर्णय आणि जीएसटी यावरही त्यांनी टीकेचे ताशेरे ओढले होते. आता त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये गडकरींसोबत सामना करण्याचीही तयारी दर्शवली आहे. आगामी काळात नेमकी काय राजकीय गणिते मांडली जाणार हे स्पष्ट होईलच. तूर्तास तरी काँग्रेसकडून भाजपाची कोंडी करण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरु असल्याचे दिसते आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »