Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » राज्यात महाआघाडी भाजपला रोखण्यासाठी

राज्यात महाआघाडी भाजपला रोखण्यासाठी

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची मोट बांधण्यात येत असतानाच, महाराष्ट्रातही भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातील छोट्या-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

भाजपच्या पराभवासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी स्थापन करण्यावर जोर दिला आहे. समाजवादी पक्ष असो की आरपीआय, सर्वांनी एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात, असं त्यांचं मत आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी याआधीच भाजपविरोधी महाआघाडीत सहभागी होण्याची घोषणा केली आहे. याशिवाय बहुजन विकास आघाडी आणि पेजन्ट्स वर्कर्स पार्टीही या महाआघाडीत सहभागी होऊ शकते.

‘मतांची विभागणी होऊ नये यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबतचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना पाठवला आहे,’ अशी माहिती अशोक चव्हाण यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिली. मतांची विभागणी झाल्यास त्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आघाडी करायला हवी. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. जर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला यश मिळाले तर, त्यांना सत्तेत येण्यापासून रोखणे कठीण होणार आहे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशात भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी लहान-मोठ्या पक्षांशी केलेल्या महाआघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर महाराष्ट्रातही काँग्रेस आणि    राष्ट्रवादीनं महाआघाडी स्थापण्याचा विचार सुरू केला आहे 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg