Monday , 15 October 2018
Breaking News
Home » Breaking News » लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा

लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा

रांची – राजदचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना रांची येथील सीबीआय कोर्टाने चारा घोटाळाप्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५ लाख रूपयांचा दंडही ठोठावला आहे. ३० डिसेंबरला झालेल्या सुनावणीत त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. तब्बल २१ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच ६९ वर्षीय लालूप्रसाद यांना अटक करण्यात आली होती. यानंतर लालूंच्या शिक्षेची सुनावणी तीनवेळा टळली होती. त्यानंतर अखेर आज लालूप्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्यात आली. चारा घोटाळ्याप्रकरणी साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
चारा वितरणाच्या नावाखाली महसूल विभागाच्या देवघर कोषागारातून १९९१ ते १९९४ या वर्षांत ८९ लाख २७ हजार रुपयांचा हा गैरव्यवहार झाला होता. पाटणा उच्च न्यायालयाने १९९६मध्ये या घोटाळ्याच्या तपासाचे आदेश दिले होते. २७ ऑक्टोबर १९९७ ला देवघर कोषागारातील गैरव्यवहारावरून ३८ जणांवर आरोपपत्र दाखल झाले होते. त्यातील ११ जणांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला, तीनजण साक्षीदार बनले तर २००६-०७ मध्ये दोघांनी गुन्हा स्वीकारून शरणागती पत्करली. लालूप्रसाद यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी तीन प्रकरणे दाखल आहेत.

चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना किमान सात वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच लालूप्रसाद यादव यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत आपल्याला कमीत कमी शिक्षा सुनावली जावी अशी विनंती कोर्टाला केली होती. त्यानुसार कोर्टाने लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना जामीन मिळणार नाही असेही स्पष्ट केले आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg