Breaking News
Home » Breaking News » सरकारवर आश्‍वासन पाळत नसल्‍याचा भाजपच्‍या तीन आमदारांचा आरोप

सरकारवर आश्‍वासन पाळत नसल्‍याचा भाजपच्‍या तीन आमदारांचा आरोप

नागपूर- नाराज भाजप आमदारांची संख्या वाढत असून आमदार आशीष देशमुख यांच्या पाठोपाठ आमदार विकास कुंभारे, आमदार नागो गाणार यांनीही आपापल्या मुद्यांवर केंद्र तसेच राज्य सरकारवर तोफ डागली आहे. सरकार हलबा समाजाला दिलेले आश्वासन पाळत नसल्याने समाजासाठी आपली कुठलाही त्याग करण्याची तयारी असल्याचा इशारा भाजपचे नागपुरातील आमदार विकास कुंभारे यांनीही दिला आहे.

आमदार आशीष देशमुख यांची सातत्याने सरकार तसेच सरकारमधील नेतृत्वावर टीका सुरुच आहे. या मालिकेत आता आणखी दोन आमदारांनी सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त केला असल्याने पक्षापुढील अडचणी वाढल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हलबा समाजाच्या हजारो शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हलबा समाजाचा हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर हा प्रश्न सुटला नाही.

चार वर्षांचा कालावधी उलटूनही काहीच होत नसल्याने हलबा समाजात असंतोषाचे वातावरण तयार झाले असल्याचे आमदार कुंभारे यांनी नमूद केले. आपल्यासाठी समाज महत्वाचा असल्याचे सांगताना कुंभारे म्हणाले की, समाजासाठी आपण कुठलाही त्याग करायला तयार आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनित्व करणारे आमदार कुंभारे हे प्रामुख्याने त्यांच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या हलबा मतदारांच्या पाठिंब्यावर दोनदा निवडून आले आहेत. काही महिन्यांपूर्वी आमदार कुंभारे यांनी राजीनामा देण्याचा इशारा पक्षाला दिला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढून काहीतरी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले कुंभारे यांनी माघार घेतली होती. विदर्भातील आणखी काही आमदार विविध कारणांवरून पक्षावर नाराजी बाळगून असल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, त्याची जाहीर वाच्यता न करता नाराजी दाखवून देण्याची भूमिका या आमदारांनी घेतली आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »