• 9
  • 1 minute read

अटक ते तमिळनाडू आणि गुजरात ते ढाकापर्यंत स्वराज्यविस्तार करणारे छत्रपती शाहू महाराज (पहिले)* (१८ मे १६८२ – १५ डिसेबर १७४९)

अटक ते तमिळनाडू आणि गुजरात ते ढाकापर्यंत स्वराज्यविस्तार करणारे छत्रपती शाहू महाराज (पहिले)* (१८ मे १६८२ - १५ डिसेबर १७४९)

—————————-
-डॉ.श्रीमंत कोकाटे
—————————-
 
                               आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा इतिहास माहिती असतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, संभाजीपुत्र शाहू महाराज यांचा इतिहास बहुतांश लोकांना माहीत नसतो, असला तरी अत्यंत त्रोटक पद्धतीने माहित असतो. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करून त्याला विशाल अशा मराठा साम्राज्यात रूपांतरित करण्याचे आणि शक्यतो कोणाचेही मन न दुखवता, सर्वांना अत्यंत मायेने, ममतेने, प्रेमाने, शक्यतो अंतर्गत संघर्ष टाळून त्यांनी ते निर्माण केले, हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आहे.
 
                                 संभाजीराजांच्या निर्दयी हत्येनंतर जवळ जवळ शिवरायांनी निर्माण केलेले रयतेचे स्वराज्य संपुष्टात आले, असे मोगलांना वाटत असतानाच छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी यांनी त्या स्वराज्याला सावरले, पण त्या स्वराज्याचे विशाल अशा म्हणजे अटकेपासून बंगालपर्यंत आणि  त्रिचिरापल्लिपासून लखनौपर्यंत विशाल मराठा साम्राज्यात रूपांतर करण्याचे महान कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांना एकूण 67 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील एकूण 19 वर्ष मोगलांच्या कैदेत गेली. त्यांनी एकूण 41 वर्ष  राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या कुटुंबाला, सहकाऱ्यांना, रयतेला आणि शत्रूलादेखील अत्यंत प्रेमाने वागवले. अनेक प्रसंगी शत्रूंना देखील प्रेमाने वागवणारा दिलदार मनाचा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहेत.
 
                                  छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 18 मे 1682 रोजी रायगडाजवळील गांगवली (माणगाव) येथे झाला. त्यांच्या बालपणातील सात वर्ष रायगडावर गेली. क्रांतिकारक पिता संभाजीराजे आणि दूरदृष्टीच्या मातोश्री येसूबाई यांनी त्यांची जडणघडण केली. परंतु त्यांना वडिलांचा सहवास फक्त सात वर्ष लाभला. 11मार्च 1689 रोजी संभाजीराजांची अत्यंत निर्दयपणे हत्या झाली. त्याप्रसंगी शाहू महाराज फक्त सात वर्षाचे होते. महाराणी येसूबाई, बाळ शाहूराजे, छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई हा सर्व राजपरिवार रायगडावरती होता. मोगल सरदार झुल्फिकारखान याने रायगडाला वेढा टाकला. स्वराज्य रक्षणासाठी राजाराम महाराजांनी जिंजीला जायचे व येसूबाईंनी रायगडावर थांबून मोगलांशी लढा द्यायचा, असे निश्चित झाले. परंतु मोगलांनी मातोश्री येसूबाई, बाळशाहू आणि राज परिवाराला कैद केले व पुढे अठरा वर्षे शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते. कैद म्हणजे तुरुंगवास नव्हता, तर अत्यंत मानसन्मानाने स्वतंत्र अशी राजपरिवाराची व्यवस्था होती. औरंगजेबाने सर्व राजपरिवाराला, त्यांच्या सैन्याला सन्मानाने वागविले. शाहू महाराजांचे जन्म नाव “शिवाजी” असे होते. आजोबांचे-पणजोबांचे नाव नातवंडांना ठेवण्याचा प्रघात पूर्वी होता, आजही काही प्रमाणात तो आहे. औरंगजेब शाहूंना उद्देशून म्हणाला “हा तर खूपच ‘साव’ (सज्जन) आहे. सावचा सावू अर्थात शाहू असा नामोल्लेख झाला. हेच ते संभाजीपुत्र पहिले छत्रपती शाहू महाराज!
 
                                      औरंगजेबाची कन्या बेगम झिनतुनिसाने शाहूंना अत्यंत प्रेमाने वागविले. बेगम शाहूला मुलाप्रमाणे सांभाळत असे. शाहूच्या सोबतचे मराठा सरदार, सैन्य, सेवक, हुजरे, मातोश्री येसूबाई इत्यादी राज परिवारांचा उपमर्द होणार नाही, याची काळजी मोगल छावणीत  घेतली. छत्रपतींच्या वारसदाराला नजर कैदेत ठेवून स्वराज्य चिरडून टाकण्याचा मोगलांचा डाव होता. त्यांचा हा डाव उधळून टाकण्याचा प्रयत्न राजाराम महाराज, सरसेनापती धनाजी-संताजी आणि नंतर महाराणी ताराराणी करत होते.
 
                               मोगलांच्या छावणीत असतानाच शाहू महाराजांचे दोन विवाह झाले. जाधवराव यांची कन्या राजसबाई आणि कण्हेरखेडच्या शिंदे यांची कन्या अंबिकाबाई या त्यांच्या दोन महाराण्या आणि पुढे शिर्के यांच्या सकवारबाई आणि मोहित्यांची सगुनाबाई अशा चार महाराण्या होत्या. बिरूबाई ही त्यांची दासी होती. मातोश्री येसूबाई यांनी त्यांच्यावर उदात्त विचारांचे संस्कार केले. प्रतिकूल परिस्थितीत संकटावर मात करण्याचे बाळकडू मातोश्री येसूबाई यांनीच शाहू महाराज यांना दिले. त्यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागले. प्रत्यक्ष तुरुंगवास जरी नसला तरी मोगलांची छावणी म्हणजे शाहू महाराजांसाठी सोन्याचा पिंजरा होता. मोगलांच्या छावणीतून मातोश्री येसूबाई, शाहू महाराज यांची सुटका करण्याचा प्रयत्न राजाराम महाराजांनी केला, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. इस 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेबाचा अहमदनगर येथे मृत्यू झाला. खुलताबाद येथे त्याचे दफन झाल्यानंतर मोगल छावणी उत्तरेकडे जात असताना बेगम झिनत-उन-निसाच्या आग्रहाने औरंगजेबपुत्र आजमशहा याने शाहू महाराजांची 8 मे 1707 रोजी भोपाळजवळ सुटका केली.
 
                                 शाहू महाराज आपल्या निवडक सैन्यासह माळवा, खान्देश, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे मार्गे 1 जानेवारी 1708 रोजी साताऱ्यात आले, परंतु वाटेत त्यांना खूप संघर्ष करावा लागला.  महाराणी ताराराणी हिमतीने राज्यकारभार करत होत्या. त्यांच्याशी संघर्ष करायची शाहू महाराजांची इच्छा नव्हती. शाहू महाराज मुळातच प्रेमळ अंतःकरणाचे, कुटुंबवत्सल होते. शक्यतो संघर्ष टाळून एकोपा वाढवावा हा त्यांचा स्थायीभाव होता. संघर्ष टाळावा व उत्तरेकडील आक्रमकांना प्रतिकार करावा, या हेतूने अहमदनगर येथे राजधानी करायची हाही शाहू महाराजांचा विचार होता, परंतु नंतर त्यांनी तो बदलला, कारण सह्याद्री रांगातील डोंगरदऱ्या, गड, किल्ले राजधानीसाठी अत्यंत सुरक्षित आणि महत्त्वपूर्ण आहेत, हे त्यांनी ओळखले.
 
                              खानदेशातून अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर शाहू महाराज पारदगढी येथे आले असता, तेथील सयाजी लोखंडे यांनी शाहू महाराजांच्या सैन्याला प्रतिकार केला, तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. त्या छोट्याशा लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला, परंतु सयाजी लोखंडे या लढाईत मृत्युमुखी पडले, तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांचे लहान मूल शाहू महाराजांच्या पालखीत टाकले व म्हणाली   “यास वाचवावे. अन्यायी होते ते मारले गेले. हे मूल आपणास वाहिले आहे”   शाहू महाराजांना त्या लढाईत यश मिळाले. फत्ते झाले म्हणून शाहू महाराजांनी त्या बाळाचे नाव फत्तेसिंह भोसले असे ठेवले. ही इतिहासाची पुनरावृत्ती होती. शिवरायांनी ज्याप्रमाणे दक्षिण दिग्विजयाच्या प्रसंगी बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांना अभय देऊन त्यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दूध पाजले व अभय दिले, तसेच शाहू महाराजांनी लोखंडे परिवाराला अभय दिले. पारदगढीच्या लोकांना अभय दिले. त्या मुलाला पुत्रवत वाढविले. त्याला स्वतःचे आडनाव दिले व कुटुंबातील सदस्य केले. त्यांना पुढे अक्कलकोटचे राजे केले. इतक्या विशाल अंतःकरणाचे छत्रपती शाहू महाराज होते.
 
                                  तिकडे ताराबाईने तोतया शाहू म्हणून आवई उठवली. त्यांनी शाहूंना प्रतिकार करण्यासाठी त्यांच्यावर सैन्य पाठविले. बालपणापासूनच शाहू महाराजांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले होते, परंतु शाहू महाराज अत्यंत संयमाने, धीरोदात्तपणे त्या संकटावर मात करत पुढे जात होते. शाहू महाराज भीमा नदी काठावरील पुणे जिल्ह्यातील खेड येथे आले असता ताराबाईच्या सैन्याने त्यांना प्रतिकार केला. या संघर्षात शाहू महाराज विजयी झाले. अनेक मातब्बर सरदार येऊन शाहू महाराजांच्या पक्षाला मिळाले. त्यामध्ये परसोजी भोसले, हैबतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे, सयाजी भोसले, खंडोबल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव, संताजी जाधव, कांहोजी आंग्रे, खंडेराव दाभाडे, हैबतराव बंडगर, खंडोजी मानकर इत्यादी मातब्बर सरदार होते.
 
                                     महाराणी ताराबाई यांनी शाहू महाराज यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व संकटावर मात करून शाहू महाराज खेड, जेजुरी, वीर, वाईमार्गे 1 जानेवारी 1708 रोजी साताऱ्यात पोहोचले. त्यांनी सातारा राजधानी केली. 12 जानेवारी 1708 रोजी शाहू महाराजांनी सातारा येथे राज्याभिषेक केला. शाहूनगर वसविले. जनतेच्या पाण्याची, सुरक्षिततेची व्यवस्था केली. महाल बांधला व त्यानंतर ते मोहिमेवरती निघाले.
 
                          महाराणी ताराराणी आपला पुत्र शिवाजी (दुसरा) यांना गादीवर बसवून पन्हाळा या ठिकाणी स्वतः राज्य कारभार करत होत्या. पन्हाळा, विशाळगड, रांगणा हा सर्व भाग महाराणी ताराराणी यांच्या अधिपत्याखाली होता. शाहू महाराजांनी त्या भागावर मोहीम काढली, दरम्यान शिवाजीराजांचा (दुसरा) मृत्यू झाला. त्यानंतर ताराबाईनी आपली सवत राजसबाईचा पुत्र संभाजीराजे (दुसरा) यांना गादीवर बसवून राज्यकारभार करू लागल्या. शिवाजीराजे यांना पुत्र होता. त्याचे नाव रामराजे ठेवले. शाहू महाराज पन्हाळगडावरती चालून आल्याबरोबर महाराणी ताराराणी यांनी रांगणा, कोकण, मालवण या भागाचा आश्रय घेतला व शाहू महाराजांना प्रतिकार केला. शाहू महाराजांनी बराचसा भाग जिंकून घेतला, परंतु त्यानंतर जिंकून घेतलेला भाग महाराणी ताराबाई, चुलत बंधू संभाजीराजे यांना परत केला व त्यांना अभय दिले.*”संभाजीराजे बंधुच आहेत”* असे शाहू महाराज नेहमी म्हणायचे. महाराणी ताराबाई आणि संभाजीराजे यांच्या प्रति आदर आणि प्रेमळपणा त्यांनी कायम ठेवला.
 
                                शाहू महाराज सुमारे अठरा वर्ष मोगलांच्या छावणीत राहिले होते. स्वराज्यापासून दूर होते, त्यामुळे माणसांचे महत्त्व त्यांना माहीत होते. प्रजेबद्दल ते प्रचंड कनवाळू होते. शक्यतो कोणाला दुखवायचे नाही, सबुरीचे धोरण ठेवून कार्यभाग साधायचा, यासाठी ते प्रयत्नशील असायचे. मोगल, पोर्तुगीज, सिद्धी यांच्याकडे गेलेल्या सरदारांना स्वराज्यात घेण्यासाठी ते अत्यंत समजुतीच्या भाषेत प्रयत्न करत असत. आजोबा शिवाजीराजे, पिता संभाजीराजे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी सचोटीने राज्यकारभार केला.
 
                                   शाहू महाराज हे उत्तम संघटक होते. अनेक सरदारांना त्यानी स्वपक्षात सामील करून घेतले. दमाजी थोरात, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव इत्यादी कांही अपवाद सोडले तर बहुतांश सरदार त्यांनी स्वपक्षात आणले. आपल्या सहकाऱ्यांना ते अत्यंत आपुलकीने वागवत. त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवत असत. तसेच त्यांनी त्यांना पराक्रम गाजवायची आणि नवीन मुलूख जिंकायची संधी दिली. त्यांचे कौतुक केले. शाहू महाराज हे उदार अंतःकरणाचे राजे होते. त्यांच्याकडे सहकार्याबद्दल संशय, असूया, असा कोणताही भाव नव्हता. गुजरात, दिल्ली, अटक, बंगाल, त्रिचिरापल्ली, कोकण इत्यादी भाग जिंकणाऱ्या सरदारांना त्यांनी कधीही स्पर्धक समजले नाही. त्यांनी मराठा सरदारांना चौफेर घोडदौड करून मुलुक जिंकण्याची संधी दिली, त्यामुळे खेड्यापाड्यातून सर्व समाजघटकातून अनेक कर्तृत्वान वीरपुरुष उदयाला आले.
 
                                     शाहू महाराज यांनी संताजी जाधव यांना सेनापती केले. बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते केले. संताजी जाधव यांच्यानंतर खंडेराव दाभाडे यांना सरसेनापती केले. इस 1719 साली आपले सैन्य पाठवून मोगल बादशहाकडून शाहू महाराजांनी चौथाईचे अधिकार मिळविले व मातोश्री येसूबाई, सावत्रबंधू मदनसिंग, सेवक, राजपरिवार यांची सुटका करून घेतली. याकामी सरसेनापती खंडेराव दाभाडे, संताजी भोसले, बाळाजी विश्वनाथ, उदाजी पवार आणि सय्यद बंधू इत्यादी वीरांनी मोलाची जबाबदारी पार पाडली. याकामी संताजी भोसले दिल्ली येथे शहीद झाले.
 
                              मुलुखगिरी करावी आणि मराठा साम्राज्याचा विस्तार करावा, हे शाहू महाराजांचे धोरण होते, यासाठी त्यांनी फत्तेसिंग भोसले यांना दक्षिण मोहिमेवर पाठविले. त्यांनी तामिळनाडूतील त्रिचिरापल्लीपर्यंतचा भाग जिंकून घेतला. कानोजी आंग्रे आणि त्यांच्या पुत्राने कोकणभूमी जिंकली. त्यांचे आरमारावती वर्चस्व होते. रघुजी भोसले यांनी बंगालपर्यंतचा भाग जिंकला. सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ, त्यानंतर बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर यांनी दिल्लीपर्यंतचा भाग अधिपत्याखाली आणला. खंडेराव दाभाडे, त्रिंबकराव दाभाडे, उमाबाई दाभाडे, पिलाजी गायकवाड यांनी गुजरात राजस्थानचा भाग जिंकून घेतला. जवळजवळ 75% भारत देश छत्रपती शाहू महाराजांनी जिंकला. ज्या मोगलांनी स्वराज्याला सळो कि पळो करून सोडले-शाहू महाराजांना कैदेत ठेवले, त्याच मोगलांसाठी आता शाहू महाराज आधारस्तंभ होते. नादिरशाहाच्या संकटापासून मोगल बादशाहीचे संरक्षण करण्यासाठी शाहूमहाराजांनी दिल्लीला सैन्य रवाना केले. पण ते वेळेवर पोहोचू शकले नाही. सेनाकर्ते बाजीराव पेशवे यांचे परतीच्या प्रवासात वाटेतच 28 एप्रिल 1740 रोजी निधन झाले. शाहू महाराजांनी दिलेल्या संधीमुळे मराठा सरदारांनी जवळजवळ संपूर्ण भारत देश जिंकून घेतला. आजच्या पाकिस्तानातील अटके पर्यंतचा भाग मराठा सैन्याने जिंकून घेतला. शाहू महाराज दूरदृष्टीचे, धोरणी, धैर्यशाली आणि प्रजावत्सल राजे होते.
 
                                   विजयी घोडदौड चालू असताना गृहकलह नसावा, आपण जेष्ठ असल्यामुळे सर्व कुटुंबाला आधार देणे, ही आपली जबाबदारी आहे, अशी शाहूमहाराजांची भावना होती, त्यामुळे चुलती ताराबाई आणि सावत्र बंधू संभाजीराजे यांच्याशी तह करावा व अंतर्गत वाद (गृहछिद्र) कायमचा मिटवावा, ही शाहू महाराजांची प्रांजळ भूमिका होती. महाराणी ताराबाई आणि चुलतबंधु संभाजीराजे यांनी त्यांना अनेक वेळा त्रास दिला, पण त्यांच्या बद्दल त्यांनी कधीही राग, द्वेषभाव ठेवला नाही. त्यांना सन्मानपूर्वक बोलावून कराड जवळील जखिणवाडी येथे शाहू महाराजांनी संभाजीराजांचे स्वागत केले. संभाजीराजांनी ज्येष्ठ बंधू शाहू महाराजांना वंदन केले. वारणा नदीच्या उत्तरेकडील राज्य शाहू महाराजांचे व दक्षिणेकडील राज्य संभाजीराजांचे असा तह झाला यालाच वारणेचा तह असे म्हणतात. हा तह 13 एप्रिल 1731 रोजी सातारा येथे झाला.
 
                           वारणेच्या तहानुसार शाहू महाराजांनी स्वतः जिंकलेला काही भागदेखील संभाजीराजांना दिला. त्यांचा खूप आदर सन्मान केला. वारणेचा तहामुळे कुटुंबातील अंतर्गत कलह शाहूमहाराजांनी कायमचा संपविला. चुलती ताराबाईबद्दल थोडाही राग, द्वेष, ठेवला नाही. ताराबाई, बंधू संभाजीराजे यांना साताऱ्यात आणून त्यांचे आदरातिथ्य केले. तेव्हापासून ताराबाई कायमच्या साताऱ्यातच राहिल्या. संभाजीराजांना सन्मानपूर्वक पन्हाळ्यावर पोहोच केले, पुढे त्यांचे कायमचे ऋणानुबंध राहिले. शाहू महाराजांनी ताराबाईंना-संभाजीराजांना कायमचे सन्मानपूर्वक वागविले. ताराबाईंना अत्यंत आदराने सांभाळले. चुलतपणाचा भाव कधी ठेवला नाही. त्यांच्याप्रती सूडबुद्धी ठेवली नाही.
 
                            शाहू महाराजांनी राजेशाहीचा कधी बडेजाव बाळगला नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी असायची. अंगावरती असणाऱ्या किमती शाली नेहमी ते अनेक कर्तृत्ववान लोकांना भेट द्यायचे, बक्षीस देऊन सत्कार करायचे. त्यांनी आपल्या मराठा साम्राज्याचा गर्व बाळगला नाही. परंतु गर्विष्ठ, अहंकारी, बडेजाव मिरवणाऱ्या सरदारांचे त्यांनी न बोलता गर्वहरण केले. असेच एकदा मोगल सरदार इंद्रोजी कदम शाहू महाराजांच्या भेटीस आले होते. त्यांना सरदारकी, संपत्ती, सरंजाम याचा प्रचंड गर्व होता. ते मोठा भरजरी पोशाख करून दागदागिने परिधान करून, भलामोठा लवाजमा सोबत घेऊन शाहू महाराज यांच्या भेटीला साताऱ्याला आले. भेटीसाठी त्यांनी शाहू महाराजांकडून आगाऊ परवानगी घेतली होती, तेव्हा शाहू महाराजांनी अत्यंत साधा पेहराव परिधान केला आणि त्यांचा लाडका कुत्रा खंड्या याला भरजरी पेहराव, झुली, मौल्यवान दागदागिने घातले व त्याला शेजारी बसविले. इंद्रोजी कदम आले, त्यांनी शाहू महाराजांना मुजरा केला. शाहू महाराजानी त्यांचे स्वागत केले. इंद्रोजी कदम यांनी शाहू महाराजांचा साधेपणा आणि खंड्या कुत्र्याचा बडेजाव पाहिला, तेव्हा इंद्रोजी कदम खजील झाले. इतका मोठा राजा, पण साधेपणाने वागतो आणि आपण संपत्तीचा गर्व बाळगतो, या भावनेने इंद्रोजी कदम लज्जित झाले. अशाप्रकारे न बोलता महाराजांनी इंद्रोजी कदमांचे गर्वहरण केले. प्रजेला-सहकाऱ्यांना सन्मानाने वागवणे, स्वतः अत्यंत साधेपणाने वर्तन करणे, हे शाहू महाराजांचे वैशिष्ट्य होते. इतकी मोठी सत्ता पण त्यांनी त्याचा कधी अहंकार, गर्व बाळगला नाही.
 
   *शत्रूवर प्रेम करणारा दिलदार मनाचा राजा*-                 
                                शाहू महाराजांना शिकारीचा मोठा छंद होता. ते नियमित आपल्या सहकाऱ्यांना शिकारीसाठी घेऊन जात असत. त्यांना पशु, पक्षी, प्राणी यांचीदेखील खूप आवड होती. ते पक्षीप्रेमी असल्याची साक्ष एका अस्सल चित्रावरून होते. इस 1730 च्या सुमारास शाहू महाराज आपल्या फौजेसह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ परिसरात शिकारीसाठी गेले होते, त्यावेळेस तेथे अथणीवरून उदाजी चव्हाण पुंडावा करण्यासाठी आले होते. उदाची चव्हाण हे नेहमी शाहू महाराजांच्या राज्यात येऊन पुंडावा करत असत. शाहू महाराजांच्या सैनिकांना त्यांचा सुगावा लागला. सैनिक शाहू महाराजांना म्हणाले  “महाराज आम्हाला आज्ञा करा. उदाजीला धरून आणतो”  तेव्हा शाहू महाराज सैनिकांना म्हणाले  ” ते काही आपल्यावर चालून आलेले नाहीत. आपण त्यांच्यावर चालून निघालेलो नाही. अचानक भेटले म्हणून धरून आणून त्यांना शिक्षा करणे हा कसला पुरुषार्थ आहे?  याउलट त्यांना बोलवा. एकत्र शिकार करू. नंतर ते जातील आणि आपण जाऊ. नंतर पाहिजे तर  लढाई करू ”  असे म्हणून ओळखीसाठी हातातील मुद्रांकची अंगठी पाठवून उदाजीला बोलावले. शिकार खेळले. त्याला वस्त्रे, विडे देऊन निरोप दिला. या प्रसंगावरून स्पष्ट होते की शाहु महाराज हे दिलदार मनाचे राजे होते. आपल्या विरोधकावरदेखील त्यांनी प्रेम केले. स्वराज्यापासून दूर असणाऱ्या सरदारांना जास्तीत जास्त प्रेमाने वागवुन सोबत घ्यायचे, हे त्यांचे धोरण होते. तावडीत सापडला म्हणून त्याचा विश्वासघात करायचा, या वृत्तीचे शाहू महाराज नव्हते. शेवटपर्यंत सुधारण्याची संधी द्यायची हे त्यांचे धोरण होते.
 
                             एकदा भल्या पहाटे शाहू महाराज जंगलात शिकारीसाठी गेले होते. पालखी, सैन्य आणि अंगरक्षक यांना लांब ठेवून महाराज पाखरे धरण्यासाठी दाट जंगलात गेले, तेव्हा त्यांना अचानक दोन बंदुकधारी दिसले. महाराजांनी त्यांना विचारले “तुम्ही कोण आहात? ”  तेव्हा ते म्हणाले  “आम्ही मारेकरी असून तुम्हाला मारायला आलोय ”  महाराजांनी विचारले  “मग का मारले नाही?”  मारेकरी म्हणाले “महाराज आपणास पाहताच हातपाय गळाले, हिम्मत झाली नाही”  महाराज म्हणाले  “बंदुका टाका आणि निघून जावा, अन्यथा श्रीपतराव आणि सैन्य तुम्हाला जीवे मारेल”  मारेकऱ्यांनी बंदुका टाकल्या. महाराजांना मुजरा केला आणि निघून गेले. याप्रसंगी शाहू महाराज मारेकर्‍यांना ठार मारू शकले असते. इतके ते सामर्थ्यशाली होते, परंतु त्यांनी त्यांच्यावर दया दाखवून सुधारण्याची संधी दिली. शाहू महाराज हे दयावान राजे होते. शत्रूवर देखील प्रेम करणारे दिलदार मनाचे राजे होते. शाहू महाराजांची दयाशीलता ही एका महान वीराची दयाशीलता होती.
 
  *प्रजावत्सल राजा -*
                             शाहू महाराजांनी आपले आजोबा शिवाजीराजे, वडील संभाजीराजे यांच्याप्रमाणेच प्रजेवर जिवापाड प्रेम केले. प्रजा हेच आपले दैवत आहे. प्रजेला संकटसमयी मदत करणे, हेच खरे पुण्य आहे. त्यांनी या विचारांचे पदोपदी पालन केले. प्रजेवर अन्याय, अत्याचार करणार्‍यांचा त्यांनी कधीही मुलाहिजा बाळगला नाही. जानराव निंबाळकर हे सातारा प्रांतातील प्रजेला त्रास द्यायचे. तेव्हा शाहू महाराजांनी 10 मार्च 1726 रोजी पत्र लिहून निक्षून सांगितले  “गावाचा सत्यानाश करावा व उत्पात करावा हे गोष्टी बरी नव्हे, ऐसी वर्तणूक न करणे”  म्हणजे शाहू महाराजांचे स्वराज्यातील गावावर, प्रजेवर किती प्रेम होते, हे स्पष्ट होते. प्रजेला त्रास देणाऱ्या सरदारांनादेखील त्यांनी निक्षून सांगितले. शाहू महाराज जेंव्हा आपली फौज घेऊन मोहिमेवर निघाले, तेव्हा त्यांनी आपल्या फौजेतील सैनिक-अधिकाऱ्यांना आज्ञा केली  “कोणी एक कही कबाड घास लकडी सुद्धा उपद्रव करू नये. जे घेणे ते विकत घ्यावे. यात जो बकैदी करील त्याचा हात पाय तोडीला जाईल”  अशी ताकीद दिली. कोणीही रयतेच्या चारा, लाकूडफाटा, धान्य यांना उपद्रव देऊ नये. हवे असेल तर प्रजेकडून विकत घ्या, प्रजेला लुटू नका. यात जर कोणी गैरवर्तन केले तर त्याचा हात पाय तोडला जाईल, असे शाहू महाराज आपल्या सैनिकांना ताकीद देतात, यावरून स्पष्ट होते की शाहू महाराज आपल्या राज्यातील रयतेवर मुलाप्रमाणे प्रेम करत होते. ते प्रजावत्सल राजे होते. जसे ते प्रेमळ होते, तसेच ते करारी होते. सामान्य प्रजेवर ते खुप प्रेम करायचे. प्रजेवर अन्याय करणाऱ्यांना ते कठोर शिक्षा करत असत.
 
*मानवी मूल्य जोपासणारे शाहू महाराज-*
                        शाहू महाराज हे मध्ययुगीन काळातील राजे होते. मध्ययुगात स्वातंत्र्य, समता, मानवतावाद, स्त्रीवाद अशा आधुनिक संकल्पना अजून विकसित झालेल्या नव्हत्या, तरी देखील शाहू महाराज प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यांनी आपल्या राज्यात भेदभाव केला नाही. त्यांना सरंजामीवृत्ती मान्य नव्हती. त्यांनी महिलांचा आदर सन्मान केला. आपल्या सेवक, दास यांना अत्यंत सन्मानाने वागविले. मानवतावादी मूल्यं त्यांनी सतत जोपासली. शाहू महाराजांना गुलामगिरी, वर्चस्ववाद, अंधश्रद्धा मान्य नव्हती, हे पुढील प्रसंगावरुन स्पष्ट होते.
 
                             कर्नाटकातील एक कुष्ठरोग झालेला ब्राह्मण गृहस्थ सातार्‍याला शाहू महाराजांकडे आला आणि म्हणाला “मला असा दृष्टांत झाला आहे की, तुम्ही स्नान केलेल्या पाण्याने जर मी स्नान केले, तर माझा कुष्ठरोग पूर्णत: नष्ट होईल. तरी तुम्ही स्नान केलेले उदक मला द्यावे ”  त्यावेळेस शाहू महाराजांना त्याचे हे म्हणणे पटले नाही, कारण आपण केलेल्या स्नानाचे पाणी इतरांना स्नानासाठी देणे, हे मानवी मूल्यांना धरून नाही, ही एक प्रकारची गुलामगिरी, अंधश्रद्धा अर्थात मानवी सन्मानाची अवहेलना आहे, असे शाहू महाराजांचे मत होते. कुष्ठरोगी ब्राह्मण हा स्नानाच्या उदकासाठी आग्रही आहे, हे लक्षात आल्यावर त्याला नाराज करायचे नाही, म्हणून शाहू महाराजांनी बाळकृष्णाची मूर्ती मागवली, स्वतःच्या हाताने त्या मूर्तीला स्नान घातले व ते पाणी त्या कुष्ठरोगी ब्राह्मणाला दिले, अशा पाण्याने कुष्ठरोग बरा होणार नाही, हे शाहू महाराजांना ज्ञात होते, परंतु त्याला नाराज करायचे नाही, स्वतः स्नान केलेले पाणी त्याला देऊन मानवी मूल्ये पायदळी तुडवायला नाहीत, यासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालून, ते पाणी त्या कुष्ठरोगी ब्राह्मणाला दिले, या प्रसंगावरून स्पष्ट होते की शाहू महाराज मानवी मूल्य जोपासणारे महान असे मानवतावादी राजे होते.
 
* एकोपा कायम राहावा, यासाठी सतत प्रयत्नशील असणारा राजा *-
                    शाहू महाराजांना गृहकलह मान्य नव्हता, तसाच स्वराज्यातील कलह देखील त्यांना मान्य नव्हता. *गृहछिद्र हाती घेऊन कोणी युद्ध पुकारत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे* असे ते म्हणत. गृहकलह मिटवून एकोपा कायम ठेवण्यासाठी ते अत्यंत उदार अंतकरणाने प्रयत्नशील असत.  चुलती ताराबाई,  बंधू संभाजीराजे यांनी शाहू महाराजांच्या विरुद्ध अनेक वेळा कागाळ्या केल्या. संभाजीराजे, चंद्रसेन जाधव यांनी नबाबाला हाताशी धरून त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील शाहू महाराजांनी त्यांच्या विरुद्ध टोकाचे पाऊल उचलले नाहीत. एका लढाईत संभाजीराजांना पकडणे शक्य असताना देखील त्यांना सोडून दिले, “ते आपले बंधूच आहेत ” असे शाहू महाराज नेहमी म्हणत. संभाजीराजांना त्यांनी सन्मानपूर्वक बोलावून घेतले आणि स्वतः जाऊन जखीनवाडी येथे संभाजीराजे यांचे स्वागत केले. त्यांना पोटाशी धरले. साताऱ्यात आणून बक्षीसे दिली. सन्मान केला. चुलती ताराबाईचा सन्मान केला. संभाजीराजे- शाहू महाराजांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. शाहू महाराजांचा पुत्र लहानपणीच वारल्यामुळे संभाजी राजाला सातारच्या गादीवर दत्तक घेण्याचा शाहू महाराजांचा मानस होता, परंतु चुलती ताराबाई यांच्या आग्रहामुळे ताराबाईचा नातू (शिवाजी-भवानीचा पुत्र) रामराजे यांना शाहू महाराज यांनी दत्तक घेतले. सातारा आणि कोल्हापूर गादी असा भेदभाव न ठेवता दोन्ही कुटुंबातील ऐक्य कायम ठेवण्याचे काम शाहू महाराजांनी केले. पुढे कोल्हापूरकर संभाजीराजे अनेक वेळा साताऱ्याला शाहू महाराजांच्या भेटीसाठी नियमित येत. चुलती ताराबाई या तर वारणा तहापासून (1731) शाहू महाराजांकडे राहिल्या. त्यांना महाराजांनी अत्यंत सन्मानाने वागविले. पूर्वग्रह न ठेवता उदार अंतकरणाने सांभाळले.
 
                                   सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर त्रिंबकराव दाभाडे सरसेनापती झाले. गुजरात मोहिमेवर असताना बाजीराव पेशवा आणि त्रिंबकराव दाभाडे यांच्यात एक चकमक झाली. त्या चकमकीत बाजीरावाकडून सरसेनापती त्रिंबकराव दाभाडे मारले गेले, त्यामुळे त्यांची मातोश्री उमाबाई दाभाडे बाजीरावावर प्रचंड चिडल्या. दाभाडे – पेशवे असा टोकाचा संघर्ष उभा राहिला. बाजीरावाची चूकच होती. पण या अंतर्गत संघर्षाने मराठा साम्राज्याचे मोठे नुकसान होणार आहे, त्यामुळे शाहू महाराज प्रचंड अस्वस्थ झाले. शाहू महाराज स्वतः सातारावरून तळेगावला गेले. सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचे सांत्वन केले. त्यांना घेऊन साताऱ्याला आले. बाजीरावाला साताऱ्यात बोलावून घेतले. उमाबाई दाभाडे, बाजीराव पेशवे यांना जवळ बोलावून “आपसातील कलह अयुक्त (अयोग्य) आहे” असे महाराजांनी समजावून सांगितले. बाजीरावाला मातोश्री उमाबाई दाभाडे यांचे पाय धरून माफी मागायला लावली आणि दुःखी झालेल्या उमाबाई बाजीरावाच्या माफीनंतर शांत झाल्या. शाहूमहाराजांनी दाभाडे – पेशवे यांच्यात तह घडवून आणला (4 नोव्हेंबर 1734). स्वराज्यात एकोपा राहावा, आपापसात तंटा -बखेडा, गैरसमज नसावा, यासाठी शाहू महाराज सतत प्रयत्नशील असत. अंतर्गत वादाकडे महाराजांनी कधीही कानाडोळा केला नाही. अंतर्गत गटबाजी निर्माण करून त्याचा गैरफायदा महाराजांनी घेतला नाही. कुटुंबात आणि सार्वजनिक जीवनात ऐक्य खूप महत्त्वपूर्ण असते, ही शाहू महाराजांची भूमिका होती.
 
                                        शाहू महाराजांनी संपत्तीची अभिलाषा बाळगली नाही. आपल्या प्रजेला, सहकाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. शाहूमहाराजांच्या या धोरणामुळेच नागपूरकर भोसले, बडोद्याचे गायकवाड ,नांदेड-दिवे-वाघोलीचे जाधवराव, पुण्याचे पेशवे, इंदोरचे होळकर, ग्वालियरचे शिंदे, अक्कलकोटचे भोसले, तळेगावचे दाभाडे, खानदेशातील कदमबांडे इत्यादी घराणी उदयाला आली. महाराजांनी निस्वार्थ भाव ठेवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले. वसंतराव कासुर्डे हा शाहू महाराजांचा सेवेकरी होता. तो आयुष्यभर साठवलेले धन शाहू महाराजांना देऊ लागला, तेव्हा महाराजांनी त्याला ते धन दान करण्यास सांगितले. त्या धनाचा उपयोग त्यांनी श्री शंभू महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी केला.
 
                                शाहू महाराज हे कुटुंबवत्सल राजे होते. आपल्या मातोश्री येसूबाई, मातोश्री ताराबाई, मातोश्री राजसबाई यांना अत्यंत सन्मानाने -आदराने वागवले . सावत्र बंधू मदनसिंग, संभाजीराजे यांना प्रेमाने वागवले. शाहू महाराजांना गजराबाई नावाची कन्या होती. त्यांचा विवाह त्यांनी मल्हारराव बांडे यांच्याबरोबर केला. लोखंडे यांच्या मुलाला पुत्रवत सांभाळले. त्यांना फत्तेसिंह भोसले हे नाव देऊन त्यांना कर्नाटक मोहीमेवर पाठवले व अक्कलकोट संस्थानचे अधिपती केले. मातोश्री ताराबाई यांचे नातू रामराजे भोसले (यांचे बालपण बार्शी तालुक्यातील पानगाव येथे गेले) यांना दत्तक घेतले.
 
                                       शाहू महाराज शूर, पराक्रमी, प्रजावत्सल, प्रेमळ, उदात्त विचारांचे, अजातशत्रू, कर्तव्यकठोर, दूरदृष्टीचे राजे होते. बालपणातील महत्त्वाचे दिवस मोगलांच्या नजरकैदेत गेलेले होते. वडिलांच्या अत्यंत निर्दयी हत्येनंतर त्यांच्या बालमनावर मोगल छावणीत काय परिणाम झाला असेल? याची कल्पना न केलेली बरी, अशा अत्यंत जीवघेण्या संघर्षमय वातावरणात देखील त्यांनी आपला समतोल ढळू दिला नाही. अत्यंत संयमाने, धैर्याने त्यांनी सर्व संकटाला तोंड दिले. मोगलांच्या छावणीत त्यांची सत्वपरीक्षा होती. बेगमेच्या आणि औरंगजेबाच्या मनात आपुलकी निर्माण होईल इतक्या समजदारपणे ते राहिले. मातोश्री येसूबाई, अनेक मराठा सरदार, महाराण्या, बेगम यांनी त्यांना खूप मोठा आधार दिला.
 
                                   शाहू महाराज जेव्हा मोगलांच्या छावणीतून सुटले, तेव्हा त्यांचे वय फक्त पंचवीस वर्षाचे होते. इतक्या तरुण वयात कोणताही उथळपणा, उर्मटपणा न दाखवता अत्यंत समजदारपणे, संयमाने, दूरदृष्टीने त्यांनी राज्यकारभार केला. आबालवृद्धांचा मानसन्मान ठेवून स्वराज्याचे गतवैभव त्यांनी मिळविले. मराठा साम्राज्य वृद्धिंगत केले. अशा उदात्त अंतःकरणाच्या शाहू महाराजांचा मृत्यू 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा या ठिकाणी झाला, अशा लोककल्याणकारी शाहू महाराजांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
 
*-डॉ.श्रीमंत कोकाटे*
0Shares

Related post

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी  *पोलीस अधीक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करा : राहुल डंबाळे*

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी *पोलीस अधीक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करा : राहुल डंबाळे*

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करा : राहुल डंबाळे पुणे :…
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी-महाराष्ट्र विदर्भ कमिटी बरखास्त

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी-महाराष्ट्र विदर्भ कमिटी बरखास्त

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी-महाराष्ट्र विदर्भ कमिटी बरखास्त मुंबई: महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी…
रतन आनंदराव सुरडकर यांचे दु:खद निधन

रतन आनंदराव सुरडकर यांचे दु:खद निधन

रतन आनंदराव सुरडकर यांचे दु:खद निधन धुळे :* (१३ डिसेंबर)             …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *