- 191
- 1 minute read
अण्णाभाऊ यांच्या प्रमाणेच सुभाष थोरातच्या साहित्यातून ही आंबेडकर व मार्क्स एक साथ बोलायचे..!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 132
व्यक्त होण्याची ही केवळ एक प्रक्रिया नव्हती, तर ती मास मूव्हमेंट होती.
काहींनी जाण्याची इतकी घाई करू नये, त्या घाई करणाऱ्यांमधील एक नाव सुभाष थोरात. त्या अगोदर भारत सातपुते असाच घाईने निघून गेला. या दोघांमधील भारत हा माझा 1988 _ 89 पासूनचा मित्र. सुभाष तसा काही माझा मित्र नव्हता. पण भारतमुळे त्याच्याशी माझा परिचय चांगलाच झाला. त्या परिचयातून तो इतका प्रभाव पाडून गेला की, त्याच्याकडून नेहमीच काहीतरी शिकावे असे वाटत राहिले. अन नुसते वाटत राहिले नाहीतर शिकत ही राहिलो. भारत व सुभाषमधील कवी पाहून मला ही कविता लिहाव्या असे वाटू लागले. लिहिल्या ही पण त्यांच्या इतकी समज व उंची आपली नाही, ही मर्यादा माहित असल्याने ती ओलांडण्याचे धाडस कधी झाले नाही. केले नाही. आज ही होत नाही.
सिद्धार्थ विहार हॉस्टेल, वडाळा. आंबेडकरी चळवळीचा बाल्लेकिल्ला. 1986 ला दहावी पास होऊन मी गावावरून आलो. डॉ. आंबेडकर कॉलेज कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. त्या बेसवर हॉटेलमध्ये प्रवेश घेतला. अन मग तेथे आयुष्य घडविणारे अनेकजण भेटले. कधी पोटभर जेवण असायचे, कधी नसायचे, कधी अर्धपोटी राहावे लागायचे. पण संपन्नाता खूप असायची. त्यावेळी भेटणारे काही लोक भेटले की, आपल्याकडे काहीच कमी नाही, असे वाटायचे. पोटात काही असो की नसो विचारांचे मंथन व्हायचे. दृष्टिकोन व प्रगल्भता जी काही असते ती येथेच येत होती. येथे खूप मोठे लोक ही होते, पण ते प्रभाव पाडू शकले नाहीत. ते नेहमी थकलेले व थांबलेले वाटायचे. अन ते जे वाटायचे ते पुढे खरे ठरले. थोडक्यात गावाकडून आलेल्या माझ्यात एक उत्तम समज होती. माणसं ओळखायची. ती ओळखायला सिद्धार्थ विहार हॉस्टेलध्ये शिकलो. याचा अभिमान आज मागे वळून पाहताना होतो.
स्वतः विषयी इतकेच. हे सांगणे गरजेचे एवढ्यासाठी आहे की, हे सांगितले तरच सुभाष थोरातचा माझ्यावरील प्रभावा विषयी बोलता येईल. अगदी सहज, सोप्या शब्दात तो आंबेडकर सांगायचा, मार्क्सवाद सांगायचा. शोषण व्यवस्थेवर बोलायचा. लगेच समजायचे. शब्द व भाषा जड नसायची. कुणी पाहिलं असेल की नाही, मला माहित नाही. पण सुभाषला खळखळून हसताना, खूप रागवताना अथवा खूपच गंभीर अवस्थेत मी कधीच पाहिले नाही. पण त्यांच्यामधील आत्मविश्वास त्याच्या शब्दातून जसा बाहेर पडायचा तसाच चेहऱ्यावर ही दिसायचा. अनेक वेळा भेटी व्हायच्या. पण त्यास थकलेला मी कधीच पाहिला नाही. अगदी जीवघेण्या आजाराशी तो संघर्ष करीत असताना त्याला कॉ. राजू देशपांडेच्या घरी भेटलो. अनेक साथी, कॉम्रेड तेथे होते. खूप गप्पा झाल्या. कविता वाचन ही झाले. मी पण एक कविता वाचली. त्याला ती आवडली. यावेळी तो थकलेला दिसला नाही. तो आजारी आहे, असे वाटले नाही. तोच जोश 1990 च्या आसपास पाहिलेला त्याच्यात होता.
सुभाषचा परिचय झाला त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळून व या स्वतंत्र देशाने लोकशाही राज्य व्यवस्था आणि संविधान स्विकारून चार दशके पूर्ण झाली होती. शहीद भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि साम्यवादी, समाजवादी विचारांच्या चळवळीला अपेक्षित असे हे स्वातंत्र्य नव्हते. भाषा, प्रांतच्या अस्मिता यासाठी संघर्ष सुरु झाले होते. कामगार, मजदूर आपल्या न्याय, हक्कासाठी लढत होते. देशाने धर्मनिरपेक्ष तत्व स्विकारले असले तरी धर्मांध व जातीयवादी शक्तींचे स्तोम कायम होतेच. किंबहुना ते स्वतंत्र्य भारतात वाढले होते. डाव्या आणि समाजवादी पक्षांच्या नेतृत्वाखाली कामगार, किसान, मजदूर आपल्या न्याय, हक्क व अधिकारासाठी संघटित होऊन आंदोलन करू लागला होता. संविधानात्मक अधिकारासाठी शासन व प्रशासनाच्या विरोधात संसद से सडक तक ” संघर्षमय वातावरण त्या काळात असायचे. स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या वेळी भगतसिंग आणि क्रांतिकारकांना या आंदोलनाने जशी भुरळ घातली, तशीच डाव्या, समाजवादी व सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या आंबेडकरी विचार व चळवळींनी अनेक तरुणांना भुरळ घातली.सुभाष थोरातसारखे अनेक तरुण त्यापैकीच. तो जातीं अंतासाठी सुरु असलेल्या संघर्ष व मोर्च्यात असायचा. कामगारांच्या लढ्यात दिसायचा. या दलित, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कविता व लेखामधून धर्मांध, जातीयवादी व भांडवली व्यवस्थेवर हल्ले करायचा.
५० ,६०,७०, ८०, ९० या पाच दशकांचा काळ म्हणजे डाव्या, समाजवादी व आंबेडकरी विचारांच्या पक्ष, संघटनांचा उभारता काळ. संवैधानिक हक्क, अधिकार व न्यायासाठी लढणाऱ्या वेगवेगळ्या समूहाकडून सुरू असलेल्या आंदोलनाचा काळ. या पाच शतकांच्या काळानंतर मात्र या सर्व लढे, संघर्ष व आंदोलनाला ग्रहण लागले. कामगारांचा वर्ग संघर्ष क्षीण होताना दिसत होता. डाव्या, समाजवादी व आंबेडकरी पक्ष, संघटनांची ताकद कमी होताना दिसत होती. राजकीय क्षेत्रातील अस्तित्वासाठी हे पक्ष कसरत करीत होते. आज ही करीत आहेत. सामाजिक न्याय व समान संधीसाठी उभी राहिलेली आंबेडकरी चळवळ अनेक गटात उभी राहत अस्थित्व हरवत होती. यास पर्याय म्हणून नव्या पिढीतील तरुणांनी आफ्रिकेतील ब्लॅक पँथरपासून प्रेरणा घेऊन दलित पँथरची स्थापना केली. ती ही गटातटातून सुटली नाही. स्थापनेनंतर दोनच वर्षात तिची दाहकता संपली. पुढे जे चालू होते, ते प्रस्थापितांच्या आश्रयाने सुरू होते. याच काळात आंबेडकरी चळवळीची दशा, दिशा याबाबतीत वक्त्यांची भाषणे व्हायची. Kk कार्यक्रम व्हायचे. तेथे सुभाष भेटायचा. याच काळात आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्याची निर्मिती झाली. साहित्य क्षेत्रातील तो एक प्रवाह झाला व प्रस्थापितांसमोर या प्रवाहाने आव्हान उभे केले.
या प्रवाहामुळे अनेक लोक लिहू लागले. अनेक समाज घटकातील तरुणांचा त्यात समावेश होता. त्यांच्या लिखाणात विद्रोह होता. व्यक्त होण्याची ही केवळ एक प्रक्रिया नव्हती, तर ती मास मूव्हमेंट होती. साहित्यांची निर्मिती होत होती. चळवळीची गाणी, कविता लिहिणाऱ्यांची संख्या ही वाढत होती. सुभाष थोरात त्यात असायचा. नेमके याच वेळीस प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात या लिहित्या तरुणांची विभागणी सुरू झाली. लिहिते तरुण प्रस्थापितांच्या विरोधात लिहित आहेत, याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करीत, त्यांचे साहित्य, निर्मिती ही तागड्यात टाकले जाऊ लागले. साहित्य निर्मिती आंबेडकरी प्रेरणेची की मार्क्सवादाच्या प्रेरणेची. मग या लिहित्या तरुणांवर शिक्कामोर्तब होऊ लागले. नामदेव ढसाळ यांच्या आंबेडकरी निष्ठेवर ही प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. वर्ग आणि वर्ण लढ्याची फारकत करण्याचा उद्योगच काही रिकाम टेकड्या लोकांनी त्या काळात सुरू केला. तो बऱ्यापैकी चालला ही. अशा वातावरणात सुभाष कुठल्या तागड्यातील आहे. याचा ही शोध सुरू होता. त्याचे साहित्याची प्रेरणा कोणती. आंबेडकर की मार्क्स ? पण सुभाषला यात अडकविता आले नाही. त्याच्या लेखातून, कवितेमधून आंबेडकर आणि मार्क्स ही एक साथ बोलायचे. जसे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रत्येक साहित्य कृतीतून बोलायचे तसे.
आज सुभाष थोरातची अभिवादन सभा होत आहे. पण तो आपल्यात नाही, असे नाही. तो आपल्या सोबत आहेच. त्याने केलेल्या चळवळीच्या माध्यमातून, त्याने लिहिलेले लेख व कवितांच्या माध्यमातून. निर्मिती करणारे लोक कधीच मरत नाहीत. काळाचा पडदा त्यांना गायब करू शकत नाही.
( कॉ. सुभाष थोरातच्या अभिवादन सभे निमित्त….!)
……………………….
राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
0Shares