अपरिचितांचा परिचय व परिचितांचाही ‘परिचय’ ★★★★★★★★★★★★★★★★★★★★
शिक्षण, नोकरी-व्यवसाय व राहण्याची जागा यातून स्त्री-पुरुष एकमेकांना नित्य ‘दर्शन सुलभ’ होतात. या दर्शनयोगातून स्वपुढाकाराने जुळलेली लग्ने ही प्राय: प्रेमविवाह या सदरात जमा होतात. ते एकमेकांना चांगले परिचित ‘होते’ अशी सर्वसाधारण धारणा !
परिचयोत्तर विवाहात याहून दृढ परिचय अपेक्षित आहे. आपल्या संभाव्य जोडीदाराशी आपले व्यक्तित्व व व्यक्तिमत्त्व कुठल्या निकषांनी ताडून पाहायचे, याचा सुस्पष्ट आराखडा ‘परिचयोत्तर विवाह’ संकल्पनेत येतो. त्यामुळे जुजबी परिचय असो वा संपूर्णत: अपरिचित व्यक्ती असो, या पद्धतीत अधिकचा सर्वंकष परिचय शक्य आहे.
‘परिचयोत्तर विवाह मंडळ’ विहित नमुन्यातील जी तपशीलवार माहिती नोंदवून घेईल ते रकाने कितीही सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केले तरी त्याला त्या पद्धतीच्या म्हणून काही अंगभूत मर्यादा आहेत.
अशा (बायोडाटा) तपशिलाव्यतिरिक्त, आपल्या संचित व्यक्तीविशेषानुसार प्रत्येकाने स्वतःची वेगळी व अनन्य (युनिक) प्रश्नावली तयार करावयाची आहे. ही अर्थातच प्राथमिक निवड निश्चितीनंतर उभयतांनी एकमेकांना द्यावयाची आहे. त्यात गरज पडली तर उपप्रश्नांची भरही घालायची आहे.
अशी उभयतांना समजून घेणारी प्रश्नावली तयार करण्यात विवाहेच्छू सक्षम व्हावेत यासाठी ‘परिचयोत्तर विवाह मंडळा’ने आपली व्यवस्थापकीय संरचना कशी अद्ययावत करावी, याचे एकेक तपशील पुढील काही लेखात ! वाचा.