- 29
- 1 minute read
अस्पृश्यांचा शोध किंवा अस्पृश्य पूर्वी कोण होते? क्रमशः…
महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३२
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संशोधनात असे स्पष्ट केले की, प्रारंभीक आणि आधुनिक समाजामध्ये दोन बाबतीत भिन्नता आढळून येते.
१. प्रारंभीक समाजामध्ये भटक्या जातींचा सांमवेश असे. परंतु, आधुनिक समाजामध्ये मात्र फक्त स्थायी जमातींचा समावेश आहे.
२. प्रारंभीक समाजातील जमाती रक्ताच्या नात्यांवर आधारलेल्या टोळ्यांनी बनलेल्या होत्या. तर, आधुनिक समाजात प्रादेशिक संबंधांवर आधारित स्थानिक जमातींचा समावेश आहे.
दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, प्रारंभीक समाजाची उत्क्रांती होऊन त्याचे आधुनिक समाजात रूपांतर होत असतांना दोन दिशांनी त्यांचा विकास झाला. एका दिशेच्या उत्क्रांतीमधून भटक्या जमाती ऐवजी प्रादेशिक जमातींचा उदय झाला. तर, प्रारंभीक समाजामध्ये असलेल्या भटक्या जमातींच्या जागी उत्क्रांतीच्या दुसऱ्या प्रवाहाणे स्थायीजमाती निर्माण झाल्या.
प्रारंभीक समाज नि:संदेह भटका होता. कारण, गुरे ही आदिम समाजाची प्रमुख संपत्ती होती. त्यामुळे तो समाज भटक्या प्रवृत्तीचा बनला होता. त्यांचे धन अर्थात गुरे हे स्थलांतरकारी होते. नव-नवीन कुरणांच्या शोधत त्यांना फिरावे लागत असे. त्यामुळे, जिकडे गुरे जातील तिकडे या प्रारंभीक समाजासही जावे लागत असे. परंतु, “जमीन”, हा संपत्तीचा नवीन प्रकार जेव्हा शोधून काढण्यात आला, तेव्हा हा आदिम समाज आपल्या घरांमध्ये स्थिर झाला. म्हणजेच तो स्थायी बनला. शेती करण्याची कला जेव्हा आदिम समाजाला अवगत झाली, तो गुरांऐवजी जमीन असे संपत्तीचे स्वरूप बदलले आणि त्यांची संपत्ती एका ठिकाणी स्थिर झाली. यावरुन आदिम समाज का भटका होता व नंतर तो का व कसा स्थायी झाला हे स्पष्ट होते.
भटक्या अवस्थेतून आदिम समाजाची उत्क्रांती स्थायी समाजामध्ये होत असतांना त्याला मुख्यत: दोन समस्यांना तोंड द्यावे लागले. पहिली समस्या स्थायी जनतेसमोर उद्भवली, तर दुसरी समस्या पराभूत होऊन विखुरलेल्या लोकांसमोर, कारण आश्रयचा व स्वरक्षणाचा प्रश्न त्यांच्यापुढे होता. अशा प्रकारच्या समस्या का निर्माण झाल्या, त्याचे स्पष्टीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर खालील प्रमाणे देतात:
१. सुरवातीला सर्वच भटक्या जमातींनी एकाच वेळी स्थायी जीवन स्वीकारले नाही. काही जमाती स्थायी झाल्या, तर काही भटक्या अवस्थेतच राहिल्या. त्यामुळे, स्थायी जमाती व भटकत राहिलेल्या जमाती, दोन प्रकारच्या जमाती अस्तित्वात आल्या.
२. या जमाती अर्थात टोळ्या परस्परांत कधीही शांतिपूर्वक राहिल्या नाहीत, त्यांच्या नेहमीच लढाया होत असत. सर्व टोळ्या जेव्हा भटक्या अवस्थेत होत्या तेव्हा गुरे चोराने, स्त्रिया पळविणे आणि दुसऱ्या टोळीच्या मालकीच्या कुराणात जबरदस्तीने गुरे चारणे, ही त्याच्या परस्परांमधील युद्धाची कारणे होती.
ज्यावेळी काही जमाती स्थायी झाल्या तेव्हा त्यांच्यावर स्वारी करणे भटक्या जमातींना अधिक सोपे व वन्य भटक्या जमातींशी युद्ध करण्यापेक्षा अधिक फायद्याचे ठरले. स्थायी जमातींकडे अधिक संपत्ती, गुरे व भरपूर अन्न-धान्य साठा असल्याने, भटक्या जमाती संघटीत होऊन स्थायी जमातीची संपत्ती लुटण्यासाठी त्यांच्यावर स्वाऱ्या करू लागल्या.
३. तिसरी गोष्ट म्हणजे, नैतिकदृष्ट्या हितकारी उद्योगांमध्ये व्यस्त असल्यामुळे व संरक्षणाची साधने नसल्याने स्थायी जमाती, भटक्या जमातींच्या रानटी हल्ल्यांना तोंड देण्यास व त्यांच्या स्वाऱ्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यास असमर्थ ठरत होत्या.
समाजाच्या आदिम अवस्थेमध्ये वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये सतत चालू असलेल्या युद्धांमुळे एखाद्या टोळीचा संपूर्ण नाश न होता, तिचा पराभव झाल्यास तिची वाताहत होत असे. अनेक प्रसंगी पराभूत टोळीची वाताहत होऊन तिचे लहान लहान गट होत असत. पराभूत लोकांचा प्रश्न निर्माण होण्याचे कारण समजून घेण्यासाठी आदिम समाज मूलत: टोळ्यांनी बनला होता, हे लक्षात घेतले पाहिजे. क्रमशः..
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (१०९-११०) या ग्रंथातून)