- 52
- 1 minute read
आटपाट नगरची एक कथा !
भारत नावाच्या देशात एक आटपाट नगर होते. तिथे जनता गुण्या गोविन्द्यानी राहत होती. सर्व जनता प्रामाणिक होती. अगदी घराचे दरवाजे उघडे ठेवले तरी चोऱ्या होत नसत. दूर देशात एक ठगांची टोळी होती. उत्पात करणे , लुटणे हाच त्यांचा धंदा होता. त्यांना आटपाट नगरा बद्दल कळले. तेही ह्या नगरात दाखल झाले. लोकांच्या घराचे दरवाजे उघडे आणि तरी चोऱ्या होत नाही हि गोष्ट त्यांच्या समजण्या पलीकडील होती. एक दिवस त्यांच्यातील एकाने गण्याच्या येथे एका हिऱ्याची चोरी केली … आणि चोरी झाली हि वार्ता आटपाट नगरात पोहोचली. सर्वाना मोठा धक्का बसला. चोरी झालीच कशी? सर्वत्र शोधा शोध सुरु झाली . ठगांच्या टोळीच्या लक्षात आले .. हि शोधाशोध आपल्या घरापर्यंत येणार .. आणि म्हणून त्यांनी तो हिरा त्याच नगरातील एका मन्या नावाचा दुसऱ्या व्यक्तीच्या घरातील आंगणात फेकून दिला. आणि टोळीच्या प्रमुखानेच हि गोष्ट गण्याच्या लक्षात आणून दिली. मन्या नि गण्या ला सांगितलं कि हा हिरा मी चोरला असता तर घरात लपवून ठेवला असता ; असा उघड्यावर आंगणात ठेवला नसता. गण्याला हे पटलेही परंतु त्याच्या मनात आता मन्या बद्दल शंका निर्माण निर्माण झाली. काच फुटला नाही परंतु काचावर तडा गेली. ठगांची टोळी आपल्या नगरात दाखल झाल्यावर हा प्रकार घडला आणि त्यास ठग प्रमुख हि जिम्मेदार असू शकतो हे त्यांच्या ध्यानामानात हि आले नाही. प्रामाणिक लोक हि भोळी असतात ; आणि म्हणून त्यांच्या भोळे पनाचा फायदा घेतला जातो. असो. ह्यानंतर आटपाट नगरात अश्या अनेक चोऱ्या व्हायला लागल्या. ह्या वर प्रतिबंध म्हणून आम सभा घेण्यात आली. ह्या वेळेस ठग प्रमुखाने प्रत्येकाने आपल्या वस्तीत सुरक्षा रक्षक नेमावा असे सुचविले व त्यासाठी आपण सुरक्षा रक्षक पुरवू असे सांगितले. भोळ्या भाबड्या आटपाट नगरच्या नागरिकांना हि गोष्ट पटली. काही दिवस सुरक्षा रक्षक रात्रीचे शिट्ट्या मारत फिरत व काही काळा साठी चोऱ्या थांबल्या. काही महिने गेले .. आणि एका घरी मोठा दरोडा पडला … पुन्हा आमसभा झाली. त्या वस्तीतील सुरक्षा रक्षकाला बरखास्त करण्यात आले. हि शिक्षा ठग प्रमुखाने च दिली. नागरिकांना बरे वाटले. आता एखाद्या वस्तीत चोरी झाली कि त्या वस्तीतील सुरक्षा रक्षकाला बरखास्त करण्याचा नियमच बनला; परंतु चोऱ्या मात्र थांबल्या नाही. तेव्हा सन्या ने विचार केला … कि ह्या गोष्टीचा आपणच तपास करावा आणि तो वेशभूषा बदलून तो रात्रीचा फिरायला लागतो…आणि कुठे आणि कश्या व कोण चोरी करतो ह्या साठी काही चोऱ्यांचा अभ्यास केला. तेव्हा त्याच्या लक्षात आले कि काही आधीचे बरखास्त केलेले सुरक्षा रक्षकच आता चोऱ्या करीत आहेत. विचार करता त्याच्या लक्षात आले कि ठग प्रमुखाने फक्त सुरक्षा रक्षक पुरविणारी सुरक्षा दल हीच संघटना जाहीर केली होती; परंतु त्यांनी एक गुप्त अशी चोर दल हि संघटना हि निर्माण केली होती आणि त्यामुळे सुरक्षा दलातील बरखास्त चोर दलात समाविष्ठ व्हायचा आणि लोकांची आठवण क्षमता मर्यादित असल्यामुळे त्यांना कळायचे हि नाही कि काही वर्षानंतर पुन्हा चोर दलाची मंडळी सुरक्षा दलात सामील व्हायची आणि हे सर्व ठग प्रमुख करायचा. कुठल्याही चोरी मध्ये सुरक्षा रक्षक आणि चोर ह्यांची मिलीभगत असायची. आता पर्यंत ठग प्रमुख ह्यास विशेष दर्जा प्राप्त झाला होता. आटपाट नगरातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्याचा नाव लौकिक होता. त्याच्या विरुद्ध उघड बोलले तर आपल्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही असे सन्या ला वाटले. म्हणून त्याने पुढील आमसभेत प्रस्ताव ठेवला कि आता ह्या पुढे सुरक्षा दलात आटपाट नगरातील युवक सुद्धा सामील होतील कारण आटपाट नगरच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची सुद्धा आहे. ठगप्रमुख ह्या प्रस्तावाचा विरोध करू शकला नाही ; त्यानंतर सुरक्षा रक्षकात ५० % आटपाट नगरातील युवक आणि ५०% टोळीतील माणस असे सुरक्षा दलाचे स्वरूप झाले आणि मोठ्या प्रमाणात चोऱ्यांची संख्या कमी झाली. ५०% आटपाट नगरातील युवक रात्रीचे चोऱ्या रोखण्यासाठी जागे राहू लागले.
सारांश : जागृत समाज हाच आपल्या संपत्तीची राखण करू शकतो.
– प्रदिप ढोबळे