- 35
- 1 minute read
आधुनिक भारताचे वाङ्मयीन आदर्श शिल्पकार पं.जवाहरलाल नेहरू
पंडीत जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारतातील २० व्या शतकाच्या मध्यभागी एक राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष , मानवतावादी म्हणुन भारतातील मध्यवर्ती थोर व्यक्तीमत्व होते. नेहरू काश्मीरी पंडित समुदायातून होते त्यामुळे त्यांना पंडित नेहरू म्हटले जात.
जवाहरलाल नेहरू उच्च शिक्षणासाठी १९०५ मध्ये ब्रिटनला गेले व त्यांनी तेथील कॅम्ब्रिज विद्यापीठातून लॉ चे शिक्षण घेतले व देशात परतले. इंग्लिश , हिंदी आणि संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान असलेले जवाहरलाल नेहरू राजकीय व्यक्तीशिवाय एक उत्तम व दर्जेदार वाङ्मयीन लेखक देखील होते. नेहरूंचे ग्रंथलेखन इंग्रजीत असून ते त्यांनी कारागृहातच बंदी असतांना लिहिलेले आहे. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आणि ‘ग्लिम्प्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ हे त्यांचे दोन प्रसिद्ध ग्रंथ विशेष महत्त्वाचे मानले जातात. हे दोन ग्रंथ म्हणजे एकाच विषयावरचे दोन स्वतंत्र भाग म्हणता येतील. पहिल्यात नेहरूंनी जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन घडवले आहे तर दुसऱ्यात भारतीय इतिहासाचे विवेचन केले आहे. इतिहासासारख्या विषयातही त्यांच्या काव्यात्मक व रसिक शैलीने जिवंतपणा आणला आहे. ‘ग्लिम्प्स ऑफ दि वर्ल्ड हिस्ट्री’ हा ग्रंथ त्यांनी मुख्यतः आपली कन्या प्रियदर्शिनी इंदिरा हिच्यासाठी लिहिला होता. तुरूंगवास भोगतांना जेलमधून लिहिलेल्या पत्रांचे ते संकलन आहे. त्यात त्यांची इतिहासाकडे पाहण्याची शैक्षणिक दृष्टी दृग्गोचर होती.
वर्तमान काळाची पूर्ण जाणीव असल्याशिवाय भूतकाळातील इतिहासातून आपल्याला काहीही शिकता येणार नाही, याची योग्य जाणीव त्यांना होती. या ग्रंथात इतिहासाबरोबर त्यांनी कला, विज्ञान, ऐतिहासिक व्यक्ती,संस्कृती यांचाही परामर्श घेतला. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथात नेहरूंनी अतिप्राचीन काळापासून सद्यःस्थितीपर्यंतचा संगतवार इतिहास संक्षिप्तपणे मांडलेला असून भारताच्या इतिहासातील प्रेरणांचे धागेदोरे जुळवून त्यांची तात्विक पार्श्वभूमी काय आहे, याचा शोध घेतला आहे. त्यातून भविष्यकाळ घडविण्याचे मार्गदर्शन लाभावे हा हेतू दिसतो म्हणजे इतिहास कसा घडवावा यासंबंधीचे मार्गदर्शन शोधणे, हे या ग्रंथामागील उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक घटनांची व व्यक्तींची शोधक चिकित्सा त्यात आढळते. या ग्रंथाचा पूर्वार्ध ब्रिटिशपूर्व कालखंडाचे ऐतिहासिक विवेचन हा आहे व उत्तराधार्त इंग्रजीचा अंमल, जागतिक अधिभौतिक व वैचारिक क्रांती, दोन महायुद्धे, भारतीय आर्थिक व राजकीय आंदोलने, काँग्रेसची वृद्धी, लो.टिळक, म.गांधी, टागोर वगैरेंची थोरवी व कार्य, हिंदु-मुसलमान यांची दुही, समाजवादाचा उदय, स्वातंत्र्याची इष्टता व अपरिहार्यता, सामाजिक पुनरर्चना, धर्म, तत्त्वज्ञान, भौतिक शास्त्रे इ. अनेक विषयांचे तात्त्विक व ऐतिहासिक विवेचन केलेले आहे.
नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात अगदी पहिल्यापासून आदर्शवाद व वास्तवता यांच्यातील द्वंद्व कायम राहिले. त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाची मीमांसा या द्वंद्वाच्या आधारेही केली जाणे शक्य आहे तथापि राष्ट्रीय दृष्टीने पाहता, महात्मा गांधींनी आपला वारस निवडून पंडीतजीच्या कर्तृत्वावर जो विश्वास प्रकट केला होता, तो पंडीतजींनी आपल्या कर्तुत्वाने सार्थ असल्याचे सिद्ध केले यात संदेह नाही.
महात्मा गांधींच्या सहवासात नेहरूंच्या राजकीय वाटचालीला निर्णायक वळण मिळाले. काही क्षेत्रांत त्यांची दृष्टी वेगळी असली तरी नेहरूंवर गांधींच्या अहिंसक प्रतिकार आणि सविनय कायदेभंगाच्या तत्त्वज्ञानाचा खूप प्रभाव होता.
त्यांचा इंग्रजांच्या विरोधात असलेला असहकार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या धोरणांचा आधारस्तंभ बनला. त्यांनी एकत्रितपणे जनआंदोलनांना उभारी दिली.
१९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली करण्यास सुरूवात केली. १९१९ मध्ये महात्मा गांधींच्या संपर्कात आले व गांधींच्या विचारांमुळे प्रभावित झाले.१९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे ते प्रमुख राष्ट्रीय नेते बनले. १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलना दरम्यान त्यांना ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती आणि अहमदनगर येथील तुरूंगात ठेवण्यात आले. पंडित जवाहलाल नेहरूंच्या आयुष्याचा तीस वर्षे पेक्षा जास्त काळ ब्रिटिश साम्राज्य व भारतातील काही संस्थानांच्या विरोधातील चळवळी लढण्यात गेला. तर ९ वर्षापेक्षा जास्त काळ नेहरू तुरुंगात राहिले. कारावास भोगतांनाच त्यांची पत्नी कमला नेहरू यांचे आजाराने निधन झाले. हा धक्का सहन करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या नेहरूंचे देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान दिसून येते.
१९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले व ते १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत सलग भारताचे पंतप्रधान राहिले. संसदेत राजकीय तत्वविरोधी नेत्यांशी त्यांचे राजकारण बाह्य व सौहार्दपुरक नाते असायचे .म्हणूनच विरोधक समाजवादी नेते राम मनोहर लोहीया यांनी ‘मी पाहीलेले नेहरू’ , मधू लीमये यांनी ‘ Who afterNeharu’ ‘ (नेहरू नंतर कोण) सारखी नेहरूंवर गौरवपर पुस्तके लीहीली तर जनसंघाचे अटल बिहारी बाजपेयी यांनी संसदेत स्तुतीपर काव्य करीत त्यांचेप्रती अनेकदा गौरवपर भाषणे केलीत.यातूनच त्यांचे आदर्श राजकीय व्यक्तिमत्त्वाची महानता दिसून येते.
पंडित नेहरूंना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते.पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर या मोठ्या लोकसंख्येच्या देशात त्या काळात वैज्ञानिक पायाभरणी करून देश उभा केला.देशाचा कालबद्ध विकास व्हावा म्हणून पंचवार्षिक योजना अमलात आणली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारत बरीच वर्षे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. भारत स्वयंपूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त अन्नधान्य उत्पादन झाले पाहिजे हे नेहरूंचे धोरण होते. त्या काळात सिंचनाच्या सोयी नव्हत्या, शेतीसाठी आधुनिक औजारे नव्हती, वीज नव्हती. अशा परिस्थितीही भारत अन्नधान्याने स्वयंपूर्ण झाला पाहिजे याचा ध्यास नेहरूंनी घेतला होता.
अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी नेहरूंनी योजना आखली . सिंचन योजना,वीज प्रकल्प हाती घेतले. भाक्रा-नांगल हि त्यापैकीच एक मोठी सिंचन व जलविद्युत योजना. भारतीय बनावटीची यंत्रसामग्रीची निर्मितीचे ध्येय ठरवले. उच्च तंत्रज्ञानाची पाच IIT सुरू केले. उ.प्र.(आताचे उत्तराखंड) येथे देशातील पहीले “गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ” या प्रमुख कृषी विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली. मोठमोठ्या अवजड यंत्रांच्या निर्मितीसाठी ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स’ या नावाने एक दुसरा सार्वजनिक उद्योग सुरु करण्यात आला. त्यातून देशाच्या रेल्वेला लागणाऱ्या इंजिन्सची आणि त्यासारख्या अनेक अवजड यंत्रांची निर्मिती होऊ लागली. स्वातंत्र्याच्या एक वर्षानंतर नेहरूंनी या सर्व योजनाची अंमलबजावणी सुरू केली व देश स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होण्याचे दिशेने प्रगतीपथावर जाऊ लागला.
भारताच्या राज्यकारभारात शासन कसे असावे यासाठीची राज्यघटनेची निर्मिती चालू होती, देशाने कोणत्या दिशेने प्रवास करायचा त्याचे लेखन चालूच होते. परंतु जसा महात्मा गांधींच्या स्वप्नातला एक भारत होता तसा नेहरूंच्या सुद्धा स्वप्नातला एक विज्ञान-तंत्रज्ञान व विविध उद्योगांनी, लोककल्याणाच्या सोयींनी युक्त असा भारत होता आणि त्याला आकार देण्यासाठी त्यांना उसंतच नव्हती. नेहरूंच्यापुढे शेतीसारख्याच शिक्षण, आरोग्य, तेल व विविध खनिज उद्योग,सिंचन,वीजनिर्मिती,दळणवळण इत्यादी विविध क्षेत्रातील संशोधन असा कामांचा रेटा होता.
आज नेहरूजी विषयी खाजगी, राजकीय जीवनातील असत्य गोष्टी सोशल मिडीयावर प्रसारित करून, नव तरुणांच्या डोक्यात विष पेरून या महान नायकाविषयी काही प्रवृती कडून नियोजन पद्धतीने गैरसमज व द्वेष निर्माण करण्यात येत आहेत. तरुणांच्या डोक्यात भ्रम पसरविण्यात येत आहेत. नवीन पीढीने काँग्रेस, पं. नेहरू, म.गांधी, सरदार पटेल, यांचा खरा इतिहास वाचावा, जो खरा इतिहास तुमच्यापासून लपवून खोट्या व विकृत इतिहास तुमच्यापुढे ठेवला जातो आहे यातील सत्य त्यांना ज्ञात होईल. या थोर उद्धाराकांनी देश स्वातंत्र्यासाठी, देश स्वयंपूर्ण होणेसाठी, कुटुंब सुखाचा त्याग करून आपल्यासाठी काय काय व कीती श्रम घेतले ते समजून घ्या,म्हणजे त्यांची थोरवी कळेल.
नेहरूंचे निधन होऊन ६० वर्षे गेल्यानंतरही देशातील अशा विरोधकांना गांधी-नेहरूंवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, याचे कारण टीका करणार्यांजवळ सांगण्यासारखे दुसरे काहीही नाही व स्वतःचे तत्त्वज्ञानही नाही हेच नेहरूंचे सामर्थ्य आहे.
आपल्या आधुनिक व वैज्ञानिक विचारधारी तसेच त्यागी देशसेवेसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना १९५५ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अखिल भारतीय काँग्रेसचे पाच वेळा अध्यक्ष होणारे ते एकमेव नेते होते.
पं. जवाहरलाल नेहरू यांचे २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नेहरू स्वर्गवासी होऊन आज ६० वर्षे झालीत,पण ते आजही ‘अमर्त्य ‘ आहेत व देशवासियांच्या हृदयात आहेत हे विशेष. आज पं. नेहरू यांची पुण्यतिथी .
त्यांना विनम्र आदरांजली !
– वा.पां. जाधव
(अमरावती)