आम्ही लहानपणी क्रिकेटचे नियम फारसे माहीत नसताना जो क्रिकेट खेळायचो तो खरा जंटलमन क्रिकेट होता ! १) पहिल्याच चेंडूवर बाद झाला की आमचा फलंदाज हिरमुसला होई. मग वयाने आमच्यात थोराड (सिनियर नाही बरं का) असलेला मुलगा उदारपणे त्याला पूर्ण ओव्हर किंवा तीन ओव्हर खेळवायचा. त्यातही तो एक दोन वेळा पुन्हा बाद व्हायचा. २) मग नियमच केला की तीन वेळा आऊट झाल्यानंतरच आऊट धरायचा ! खेळ आनंदासाठी आहे हे महान तत्त्व इतक्या लहान वयात आम्ही आत्मसात केले होते ते असे ! ३) गोलंदाजी ज्यांना येत नाही त्यांनीही ती जशी जमेल तशी करायची परवानगी होती. ४) त्रिफळा वाऱ्याने पडला आहे की चेंडू लागून हे कधीतरी कळायचेच नाही. मग आम्ही संशयाचा फायदा देऊन आऊट धरायचो नाही. ५) आमच्या टीम मधल्या खेळाडूला गिरणीत दळण टाकायचे वॉरंट घेऊन त्याची आई आली तर आम्ही त्याला तेवढा वेळ मैदान सोडून जायची परवानगी द्यायचो. तो परत आला की त्याचा खेळ पूर्वलक्ष्यी प्रभावाने निरंतर चालू ठेवण्याची महत्त्वाची तरतूद आम्ही नियमावलीत केली होती ! ६) असे अनेक कालसुसंगत बदल व दुरुस्ती आम्ही आमच्या क्रिकेटच्या घटनेत करायचो. आमची क्रिकेटची घटना अत्यंत लवचिक व खेळाचा आनंद वाढविणारी जगातील पहिली सर्वसमावेशक उदारता असलेली क्रीडा- घटना होती. ७) आमच्या संघात घरातून परवानगी घेऊन आलेले व गावावरून ओवाळून टाकलेले, ज्यांना परवानगीचे सोपस्कार करावे लागत नसे अशा सर्व प्रकारच्या मुलांचा समावेश असल्याने आमचा संघ सर्व समाजाचे व्यवस्थित प्रतिनिधित्व करायचा. ८) एखादी मुलगी आली तर लिंगभावी समतेचा अत्यंत स्वाभाविक पुरस्कार करून आम्ही तिलाही संघात घ्यायचो. (तिची बॅटिंग झाली की ती पळून जाणार आहे, हे माहित असूनही आम्ही पुन्हा पुन्हा फसायचो !) ९) आमच्या क्रिकेटवर कुणी जिंकण्या हरण्याची कधी बेट लावली नाही. जुगारमुक्त क्रिकेट देणारा तो आमचा जगातील एकमेव संघ होता. १०) मॅच फिक्सिंग करण्याइतकी आमची नियत खराब नव्हती. ११) पैशासाठी तर आम्ही खेळतच नव्हतो ! आम्ही ‘खेळासाठी खेळ’ नाही तर ‘जीवनासाठी खेळ’ या जीवनवादी सौंदर्यशास्त्रातील महान तत्त्वाने खेळत होतो !